लांजा येथे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानची पदयात्रेद्वारे मागणी
लांजा, १६ ऑगस्ट (वार्ता. ) – भारताची फाळणी होण्यापूर्वी अखंड भारताचा ध्वज भगवा झेंडा होता. खंडित भारताचे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताचा झेंडा ‘तिरंगा’ करण्यात आला. तिरंग्याचा मान राखून आम्ही ‘भारताचा झेंडा पूर्ववत् ‘भगवा’ करण्यात यावा, तसेच भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करण्यात यावे’, अशी मागणी करत आहोत. स्वातंत्र्यदिनी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने लांजा शहरातून पदयात्रा उत्साहात काढण्यात आली. या पदयात्रेत ही मागणी करण्यात आली.
१५ ऑगस्ट २०२३ या दिवशी योगी हॉटेल समोरील पटांगणातून ध्येय मंत्र म्हणून पदयात्रेला प्रारंभ झाला. पदयात्रेच्या पुढे भगवा झेंडा धरण्यात आला होता. घोषणा देत आणि देशभक्तीपर गीते म्हणत ही पदयात्रा साठवली रोड मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे नेण्यात आली. तेथे भगव्या झेंड्याचे पूजन करण्यात आल्यानंतर पदयात्रा बाजारपेठमार्गे बसवेश्वर सदन या ठिकाणी नेण्यात आली. संपूर्ण बाजारपेठ ‘भारतमातेचा विजय असो’, ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो’, ‘वन्दे मातरम्’ अशा देशभक्तीपर घोषणांनी दणाणून गेली. त्यानंतर बसवेश्वर सदन येथे गेल्यानंतर भारतमातेचे सामूहिक पूजन करण्यात आले आणि प्रतिवर्षी अशी स्वातंत्र्यदिनानिमित्त हिंदवी स्वराज्य स्वातंत्र्यदिन पदयात्रा काढण्याचे निश्चित करण्यात आले. या पदयात्रेत १५० धारकरी आणि धर्मप्रेमी सहभागी झाले होते.