प्राणशक्‍तीवहन उपायपद्धतीच्‍या संदर्भात गोव्‍याच्‍या श्रीमती जयश्री मुळे यांना आलेली अनुभूती

श्रीमती जयश्री मुळे

१. सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी पंचतत्त्वांचे उपाय दिल्‍याबद्दल कृतज्ञता व्‍यक्‍त होणे

‘१५.७.२०२० मध्‍ये मी पू. देसाईकाका करत असलेल्‍या नामजपाच्‍या वेळी उपायांना बसले होते. प्राणशक्‍तीवहन पद्धतीप्रमाणे उपाय शोधत असतांना देवाने अग्‍निदेवतेचा उपाय सुचवला. मणिपूरचक्र आणि आज्ञाचक्र यांवर मधले बोट अन् अंगठा यांची टोके एकत्र करून अशी मुद्रा करून ‘श्री अग्‍निदेवाय नमः ।’, हा जप करू लागले. त्‍यापूर्वी प.पू. डॉक्‍टरांना (सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांना) प्रार्थना केली. ‘हे गुरुदेवा, आम्‍हाला आपल्‍याच कृपेने हे पंचतत्त्वांचे उपाय मिळाले आहेत. आपणच हा नामजप परिणामकारक, एकाग्रतेने आणि भावपूर्ण करून घ्‍या.’ प्रार्थना करतांना माझी भावजागृती होत होती. पू. देसाईकाकांच्‍या चरणीसुद्धा कृतज्ञता व्‍यक्‍त झाली.

अग्‍निदेवाला प्रार्थना केल्‍यावर पुढील श्‍लोक सुचला –

अहं वैश्‍वानरो भूत्‍वा प्राणिनां देहमाश्रितः ।
प्राणापानसमायुक्‍तः पचाम्‍यन्‍नं चतुर्विधम् ॥ – श्रीमद़्‍भगवद़्‍गीता, अध्‍याय १५, श्‍लोक १४

अर्थ : मीच सर्व प्राण्‍यांच्‍या शरिरात रहाणारा प्राण आणि अपान यांनी संयुक्‍त वैश्‍वानर अग्‍निरूप होऊन चार प्रकारचे अन्‍न पचवतो.

२. श्री सूर्यदेवाचा जप चालू होऊन प्रकाशतत्त्वाची अनुभूती येणे

नामजप चांगला झाला. नंतर आपोआप श्री सूर्यदेवाचा नामजप चालू झाला. सूर्यदेवाच्‍या चरणी आर्ततेने प्रार्थना झाली, ‘हे सूर्यदेवते, माझ्‍यातील स्‍वभावदोषांना तुझ्‍या तेजाने जाळून टाक आणि गुणांना उजळून टाक.’ त्‍या वेळी सगळीकडे पिवळा तेजस्‍वी प्रकाश दिसू लागला. मला माझे शरीरही हलके जाणवू लागले.

३. लहानपणापासून पचनासंबंधी असणार्‍या विकारांवर उपचार होणे

३ अ. पचनासंबंधी त्रास होतांना सहन करण्‍याची शक्‍ती मिळणे : ८ ते १५ दिवसांनंतर माझ्‍या लक्षात आले, ‘मला लहानपणापासून पचनासंबंधी पुष्‍कळ त्रास होता. थोडे जरी तिखट खाल्ले, तरी लगेच जुलाब किंवा आव व्‍हायची. अनेक औषधोपचार केले; परंतु गुण येत नव्‍हता. त्‍याही स्‍थितीत देव सहन करण्‍याची शक्‍ती देत होता.

३ आ. एका नाडी ज्‍योतिष्‍याने पोटाच्‍या विकारावर उपचारासाठी ५ सहस्र रुपयांची मागणी करणे; मात्र नंतर त्‍यांच्‍याकडे न जाणे : ५ ते ७ वर्षांपूर्वी मी एका नाडी ज्‍योतिषाकडे गेले होते. त्‍या वेळी ते म्‍हणाले होते, ‘‘तुम्‍हाला पोटाचा विकार आहे. तो तुम्‍हाला त्रास देत आहे. तुमच्‍यावर गुरूंची कृपा आहे; म्‍हणून वाचला आहात. तो त्रास जाण्‍यासाठी मी श्री महालक्ष्मीचे पूजन करून येतो. त्‍यासाठी ५ सहस्र रुपये व्‍यय करावे लागतील. मला कळवा आणि ५ सहस्र रुपये घेऊन या.’’ मी ‘‘ठीक आहे’’, असे म्‍हणून घरी आले; परंतु मला परत तिकडे जाता आले नाही.

३ इ. पू. देसाईकाकांंच्‍या उपायांनंतर तो विकार पूर्णपणे न्‍यून होणे : आता या उपायांनंतर जणू देवाने चमत्‍कारच केला. १५ ते २० दिवसांनंतर माझ्‍या लक्षात आले की, ‘माझा हा विकार न्‍यून झाला आहे. मी तिखट खाऊन पाहिले; पण मला त्रास झाला नाही.’

देवानेच माझा हा विकार न्‍यून केला. (देवाचे वचन आठवले की,) परम पूज्‍य नेहमी म्‍हणतात, ‘करून सवरून देव कसा नामानिराळा असतो.’ ‘देवा (सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले), आपल्‍या चरणी कितीही कृतज्ञता व्‍यक्‍त केली, तरी ती पूर्ण होणारच नाही. कोटीशः कृतज्ञता.’

– श्रीमती जयश्री मुळे (वय ७६ वर्षे), ढवळी, फोंडा, गोवा. (२४.९.२०२२)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक