मुंबई-गोवा महामार्गाच्या समस्येविषयी मनसेकडून रत्नागिरीत जनजागृती !

प्रलंबित मुंबई-गोवा महामार्गाची अवस्था

रत्नागिरी – १७ वर्षे प्रलंबित असणार्‍या मुंबई-गोवा महामार्गाच्या समस्येवर मार्ग काढण्यासाठी पनवेल येथे १६ ऑगस्ट या दिवशी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत ‘निर्धार’ मेळावा होत आहे. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी शहर मनसेच्या वतीने १४ ऑगस्ट या दिवशी येथील जिल्हाधिकारी कार्यालय आणि मारुति मंदीर परिसरात विविध फलक हातात धरून मुंबई-गोवा महामार्गाच्या परिस्थितीविषयी जनजागृती करण्यात आली. या फलकांद्वारे कोकणी माणसाला आपल्या अधिकारासाठी आवाज उठवण्याचे आवाहन करण्यात आले, तर सत्ताधार्‍यांचा निषेध व्यक्त करण्यात आला.

या वेळी मनसे शहरअध्यक्ष अद्वैत कुलकर्णी म्हणाले, ‘‘प्रलंबित मुंबई-गोवा महामार्गाची अशी अवस्था असतांना इतकी वर्षे होऊनही कोकणी माणूस अजून शांत का ? आपल्या आमदार- खासदार यांना कधीतरी तुम्ही जाब विचारणार कि नाही ?  मनसे याविषयी आता आवाज बुलंद करत आहे. जनतेनेही तिच्या हक्कासाठी सहभागी व्हावे.’’

शहरसंघटक अमोल श्रीनाथ यांनी ‘सत्तेतल्या लोकांचा अहंकार उतरवण्याची आता वेळ आली आहे. जनतेनेच याचा विचार करावा.’ असे म्हटले.या वेळी शहरसचिव अजिंक्य केसरकर, उपशहर अध्यक्ष गौरव चव्हाण, महिला उपशहर अध्यक्ष शिल्पाताई कुंभार, विभाग अध्यक्ष काका नागवेकर, पदाधिकारी आणि मनसैनिक उपस्थित होते.