कळवा (ठाणे) येथील रुग्‍णालयात एका दिवसात १८ रुग्‍णांचा मृत्‍यू !

कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्‍णालय

ठाणे – ठाणे महापालिकेच्‍या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्‍णालयात १२ ऑगस्‍टच्‍या रात्रीपासून १३ ऑगस्‍टच्‍या सकाळपर्यंत १८ रुग्‍णांचा उपचारांच्‍या काळात मृृत्‍यू झाला. या प्रकरणी राष्‍ट्रवादी काँग्रेसह ठाकरे गट आणि मनसे यांचे नेते आक्रमक झाले आहेत. मृत झालेल्‍या १८ रुग्‍णांंपैकी १३ रुग्‍ण हे अतीदक्षता विभागातील होते, तर ५ रुग्‍ण हे सामान्‍य वॉर्डमधील आहेत. मृतांमध्‍ये ८ पुरुष आणि १० महिलांचा समावेश असून यातील १२ रुग्‍ण हे ५० ते ८० वर्षे वयोगटातील आहेत, तर उर्वरित ६ रुग्‍ण हे ५० वर्षे वयाखालील आहेत. यांपैकी काहींना अल्‍सर, तसेच यकृत खराब होणे, न्‍यूमोनिया, विष प्राशन, डायलिसीस, मूत्रसंसर्ग, ऑक्‍सिजनची कमतरता, रक्‍तदाब अल्‍प होणे, ताप आदींमुळे मृत्‍यू झाल्‍याचे रुग्‍णालय प्रशासनाने स्‍पष्‍ट केले आहे.

या प्रकरणी रुग्‍णालयाचे अधिष्‍ठाता राकेश बारोट म्‍हणाले, मृतांमध्‍ये चार वर्षांचा मुलगा होता. त्‍याने मोठ्या प्रमाणात रॉकेल प्‍यायले होते. त्‍यामुळे आम्‍ही त्‍याला वाचवू शकलो नाही. बाकीचे काही रुग्‍ण मागील काही दिवसांपासून उपचार घेत होते. कुणी ३ दिवस, तर कुणी ४ दिवसांपासून उपचार घेत होते. एका रुग्‍णाच्‍या डोक्‍याला मार लागला होता. त्‍याचा मृत्‍यू झाला. अन्‍य एका रुग्‍णाच्‍या मेंदूला मार लागला होता, त्‍याचाही मृत्‍यू झाला. दोन रुग्‍णांची फुफ्‍फुसे खराब होती. त्‍या रुग्‍णांना संसर्ग होऊन मृत्‍यू झाला. इतर ३-४ रुग्‍णांना मल्‍टी ऑर्डर डिस्‍फंक्‍शन झाले होते. कुणाला हृदयाची समस्‍या होती, तर कुणाला अनियंत्रित मधुमेह होता. या रुग्‍णांना प्रयत्न करूनही आम्‍ही वाचवू शकलो नाही.

रुग्‍णालयात असुविधा असल्‍याचा रुग्‍णांच्‍या नातेवाईकांचा आरोप !

‘रुग्‍णालयात प्राथमिक टप्‍प्‍याच्‍या प्रक्रियेला एकेका रुग्‍णाला ४ ते ५ घंटे लागतात. अनेकदा आधुनिक वैद्यच उपलब्‍ध नसतात. त्‍यामुळे रुग्‍णांना रांगेत ताटकळत उभे रहावे लागते. खाटा उपलब्‍ध नसल्‍याचे कारण सांगून रुग्‍णांना भरती करून घेतले जात नाही. परिणामी दूरवरून आलेल्‍या रुग्‍णांवर उपचार होतच नाहीत’, असे आरोप रुग्‍णांच्‍या नातेवाईकांकडून होत आहेत.

मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांच्‍या सूचनेनुसार राज्‍य आरोग्‍य सेवा समितीचे आयुक्‍त यांच्‍या नेतृत्‍वाखाली एक चौकशी समिती नेमण्‍यात आली आहे. – ठाणे महानगरपालिकेचे आयुक्‍त अभिजित बांगर

<

अहवाल आल्‍यावर कारवाई करू !- आरोग्‍यमंत्री तानाजी सावंत

या प्रकरणी आरोग्‍यमंत्री तानाजी सावंत म्‍हणाले, ‘‘संबंधित घटनेची आम्‍ही माहिती घेत आहोत. रुग्‍णांच्‍या मृत्‍यूमागील कारणांचा अहवाल दोन दिवसांत येईल आणि कारवाई केली जाईल. रुग्‍णाच्‍या जिवाशी होणारी हेळसांड आम्‍ही सहन करणार नाही.’’

रुग्‍णांच्‍या अधिकच्‍या संख्‍येत वैद्यकीय यंत्रणा अनुपलब्‍ध ! – कळवा रुग्‍णालयातील आधुनिक वैद्य

ठाणे जिल्‍हा शासकीय रुग्‍णालयाच्‍या जागी सुपर स्‍पेशालिटी रुग्‍णालय उभारणीचे काम चालू असल्‍याने कळवा येथील रुग्‍णालयात अनेक रुग्‍ण येतात. त्‍या तुलनेत येथील वैद्यकीय यंत्रणा अल्‍प पडते. ‘दिवसेंदिवस मलेरिया आणि डेंग्‍यू, तसेच अन्‍य रुग्‍ण वाढत असल्‍यामुळे कामाचा प्रचंड ताण वाढत आहे’, असे आधुनिक वैद्यांनी सांगितले आहे.