सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावर निस्सीम श्रद्धा असणार्‍या ठाणे येथील ६७ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. नम्रता ठाकूर (वय ६२ वर्षे) !

सौ. नम्रता ठाकूर आणि श्री. नंदकिशोर ठाकूर

१. आजारी असूनही जन्मोत्सवाच्या कार्यक्रमाला यायची तळमळ असणे

‘११.५.२०२३ या दिवशी परात्पर गुरु डॉक्टरांच्या गोवा येथे झालेल्या ब्रह्मोत्सवाच्या कार्यक्रमाला येण्याआधी सौ. ठाकूरकाकूंची प्रकृती बरी नव्हती. त्यामुळे काका-काकूंचे आधी ‘यायचे नाही’, असे ठरले होते; मात्र काकूंची या कार्यक्रमाला यायची तळमळ एवढी होती की, ‘परात्पर गुरु डॉक्टरांचे दर्शन होणार आहे, तर मी येणारच’, असे त्यांनी सांगितले.

श्री. रोहित साळुंके

२. गाडीचा अपघात होणे, समोरील व्यक्तीने त्रास दिल्यानंतरही परात्पर गुरु डॉक्टर व्यवस्थित करणार असल्याचे काकूंनी सांगणे

सर्व कुटुंबीय गोवा येथे येत असतांना त्यांच्या गाडीला कराड येथे अपघात झाला. दुसर्‍या गाडीवाल्याने काही अन्य व्यक्तींना बोलावून त्यांना त्रास द्यायचा प्रयत्न केला. तसेच पोलीसही साहाय्य करत नव्हते. त्यामुळे सर्व परिस्थिती तणावपूर्ण झाली होती. या दरम्यान काकूंशी जेव्हा संपर्क झाला, तेव्हा काकू म्हणाल्या, ‘‘परात्पर गुरु डॉक्टर आहेत, ते सर्व व्यवस्थित करणार आहेत.’’ खरोखरच त्या रात्री या सर्व परिस्थितीतून परम पूज्यांनी त्यांना अलगद बाहेर काढले.

३. प्रतिकूल परिस्थिती निर्माण होताच ‘परम पूज्य’ असा धावा करणे आणि अनुकूल परिस्थितीत कृतज्ञता व्यक्त करणे

एकदा मी काकूंना विचारले, ‘‘तुमच्यावर एवढे प्रतिकूल प्रसंग येतात. त्या वेळी मनाची स्थिती डळमळीत होते का ?’’ तेव्हा काकूंनी सांगितले, ‘‘प्रसंग आले की, मलाही ताण येतो. मन अस्थिर झाले की, मी लगेच परम पूज्यांचा धावा करते. ‘परम पूज्य तुम्ही या, तुम्ही हे पहा, तुम्हीच सर्व करून घ्या’, असे माझे सतत चालू होते. त्यामुळे त्या परिस्थितीचे काही वाटेनासे होते. परिस्थिती अनुकूल असेल, तर ‘परम पूज्य आहेत; म्हणूनच मी हे अनुभवत आहे’, अशी कृतज्ञता व्यक्त करते.’’

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावर दृढ श्रद्धा असणारे ठाकूर कुटुंबीय !

‘अनेक वर्षांपासून ठाणे येथील ठाकूर कुटुंबियांशी आमची जवळीक आणि घनिष्ठ संबंध आहेत. या अनेक वर्षांत त्यांना प्रति काही वर्षांनी अत्यंत प्रतिकूल अशा घटनांना सामोरे जावे लागले. त्यांच्या जवळच्या नातेवाइकांचे अचानक निधन होणे, जवळच्या व्यक्तींकडून होणारा विरोध आणि त्यामुळे अनेक वर्षांपासून चालू असलेल्या कोर्टकचेर्‍या, तसेच अनेक दुर्धर व्याधी उद्भवणे आदी अनेक आघातांना श्री. नंदकिशोर ठाकूर आणि सौ. नम्रता ठाकूर यांना बर्‍याचदा अकस्मात् सामोरे जावे लागले आहे. एखादी व्यक्ती सलग १८ वर्षांत एकामागून एक घडत जाणार्‍या अशा घटनांनी खचून गेली असती; मात्र या सर्वांना ‘केवळ परात्पर गुरु डॉ. आठवले पाठीशी आहेत’, या एकाच दृढ श्रद्धेने ते सामोरे गेले. त्यांच्या मनात एकदाही ‘देवाचे एवढे करूनही अशा स्थितीला सामोरे का जावे लागत आहे ?’, असा नकारात्मक विचार आला नाही. केवळ परात्पर गुरु डॉक्टरच सर्व संकटांमधून आपल्याला अलगद बाहेर काढत आहेत, याविषयी त्यांना कृतज्ञता वाटायची आणि नेहमी ती त्यांच्याशी बोलतांना व्यक्त होत असे. काका आणि काकू यांच्यातील साधकत्वाचे गुण त्यांच्या दोन्ही मुलांतही आले आहेत. त्यांच्यामुळेच सुनेलाही साधनेची गोडी निर्माण होत आहे.’

– श्री. रोहित साळुंके (८.८.२०२३)

४. ‘विसरलो देहभान मी संसारी, दंग झाले माझे मन मंदिरी’, अशी अवस्था ठाकूरकाकू अनुभवत असणे

काकूंच्या नेहमीच्या बोलण्यातही ‘परम पूज्यांनी हे केले, परम पूज्य सर्व करवून घेत आहेत’, असे असायचे. इतक्या वर्षांचा हा दृढ संस्कार झाल्यामुळे आणि परम पूज्यांवरील श्रद्धेमुळेच आताच्या आजारपणात त्या सर्व विसरल्या असल्या, तरी त्या परम पूज्यांना मात्र विसरल्या नाहीत. ठाकूरकाकूंना आताच्या आजारपणात भेटल्यानंतर त्यांच्या मुखात सतत परम पूज्यांचे नाव असल्याचे लक्षात आले.

प.पू. भक्तराज महाराज यांच्या भजनपंक्तीमधील ‘विसरलो देहभान मी संसारी । दंग झाले माझे मन मंदिरी।’, अशी अवस्था ठाकूरकाकू अनुभवत आहेत’, असे वाटले. गुरुदेवांच्या सतत अनुसंधानात असणार्‍या अशा साधकांचा सत्संग मला वेळोवेळी उपलब्ध करून दिल्याबद्दल मी गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो.

‘हे गुरुराया, रामनाथीरूपी गुरुलोकातील तुझ्या गुरुरूपाच्या अखंड अनुसंधानात मला ठेव, अशी तुझ्या चरणी कळकळीची प्रार्थना आहे.’

– श्री. रोहित साळुंके, फोंडा, गोवा. (८.८.२०२३)

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक