राणा दांपत्यांच्या अनुपस्थितीविषयी न्यायालयाकडून अप्रसन्नता !
मुंबई – तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठण करण्याचा आग्रह केल्याप्रकरणी राणा दांपत्यांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी सध्या मुंबई सत्र न्यायालयात खटला चालू आहे. तथापि वारंवार नोटीस बजावूनही राणा दांपत्य सुनावणीसाठी अनुपस्थित रहात असल्याने न्यायालयाने १० ऑगस्ट या दिवशी तीव्र शब्दांत अप्रसन्नता व्यक्त केली आहे, तसेच याची गंभीर नोंद घेऊन ‘न्यायव्यवस्था म्हणजे गंमत नव्हे’, अशा शब्दांत जिल्हा आणि सत्र न्यायाधीश राहुल रोकडे यांनी राणा दांपत्यांसह अनुुपस्थित राहिलेल्या अधिवक्त्यांना सुनावले आहे.
‘मातोश्री’ बंगल्याबाहेर ‘हनुमान चालिसा’ पठणाचा दिखावा केल्यामुळे अडचणीत सापडलेल्या खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांना सत्र न्यायालयाने पुन्हा खडे बोल सुनावले.https://t.co/0okPM3Qfxk
— Saamana (@SaamanaOnline) August 11, 2023
विशेष म्हणजे या सुनावणीवेळी राणा दांपत्यांचे अधिवक्ता रिझवान मर्चंट, सरकारी अधिवक्ता सुमेर पंजवानी हेही अनुपस्थित होते. खटला अन्वेषणअधिकारीही सुटीवर असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे या प्रकरणाशी संबंधित कुणीच न्यायालयात उपस्थित नसल्याने न्यायाधीश संतप्त झाले. सुनावणीसाठी राणा दाम्प्त्यांच्या अधिवक्त्यांचे कनिष्ठ अधिवक्ता उपस्थित होते, तसेच सरकारी अधिवक्ता सुमेश पंजवानी धावपळ करून न्यायालयात पोचल्याचे पहाताच पंजवानी यांच्यावरही न्यायालयाने कठोर शब्दात अप्रसन्नता व्यक्त केली. आता या प्रकरणी पुढील सुनावणी २८ ऑगस्ट या दिवशी होणार आहे.