|
रत्नागिरी – येथील उच्च तंत्रज्ञानावर आधारित रखडलेल्या एस्.टी. बसस्थानकाचे काम ठेकेदार करण्यास सिद्ध नसल्याने त्याच्यावर कारवाई म्हणून त्याचा ठेकाच रहित करण्यात आला आहे. लवकरच फेरनिविदा काढून नवीन ठेकेदार नियुक्त केला जाईल. ६ वर्षांमध्ये बांधकामाची किंमत वाढल्याने १० कोटी रुपयांऐवजी आता १४ कोटी रुपयांचा प्रस्ताव व्यवस्थापन संचालकांकडे पाठवण्यात आला आहे, अशी माहिती एस्.टी. महामंडळाच्या विद्या भिलारकर यांनी दिली.
विद्या भिलारकर पुढे म्हणाल्या की,
१. प्रारंभी ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा !’ या तत्त्वावर बसस्थानकाचे काम करण्यात येणार होते. एस्.टी. महामंडळानेच यामध्ये पुढाकार घेऊन राज्यातील ७१ एस्.टी. बसस्थानके बांधण्याचा निर्णय झाला. रेंगाळलेल्या या कामाला अद्यापही गती मिळालेली नाही. यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.
२. दहा कोटी रुपयांच्या या प्रकल्पाचे सादरीकरण तत्कालीन पालकमंत्री आणि जिल्हाधिकार्यांसमोर झाले. वर्ष २०१८ मध्ये या कामाला प्रारंभ झाला. कोल्हापूर येथील ठेकेदाराला या कामाचा ठेका देण्यात आला. हे काम प्रारंभी चांगल्या पद्धतीने चालू होते.
३. प्रारंभी एका गाळाधारकाने एस्.टी.च्या या जागेविषयी न्यायालयात दाद मागितली होती. त्यामुळे दीड वर्ष या कामाला स्थगिती देण्यात आली होती. त्यानंतर कोरोना महामारीच्या काळातही हे काम रखडले. त्यामुळे १० कोटी रुपयांच्या या कामाविषयी ठेकेदाराने वाढीव रकमेची मागणी केली होती.
४. ठेकेदाराला वाढीव रक्कम देण्यास शासन सिद्ध असल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले होते. आता एम्.आय्.डी.सी.कडून निधी घेऊन एस्.टी. बसस्थानकाचे काम करण्यात येणार असल्याचेही सामंत यांनी स्पष्ट केले होते. आतापर्यंत १ कोटी ७५ लाख रुपयांचे काम झाले असून, ठेकेदाराचे अजूनही ६० लाख रुपयांचे देणे आहे.