राज्‍यात ‘माझी माती, माझा देश’ अभियानाद्वारे राष्‍ट्रपुरुषांचे कार्य सर्वसामान्‍यांपर्यंत पोचवले जाणार !

प्रत्‍येक नागरिकाच्‍या मनात स्‍वदेश, स्‍वधर्म आणि स्‍वाभिमान जागवला जाईल !   मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे

क्रांतीकारकांच्‍या नावाच्‍या फलकाचे अनावरण करतांना मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे, समवेत उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्‍यमंत्री अजित पवार आणि सांस्‍कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई – अगणित हुतात्‍म्‍यांचा त्‍याग आणि बलीदान यांमुळे भारताला स्‍वातंत्र्य मिळाले. ‘माझी माती, माझा देश’ या अभियानाद्वारे स्‍वातंत्र्याच्‍या अमृत महोत्‍सवी वर्षाचा आपण समारोप करणार आहोत. प्रत्‍येक नागरिकाच्‍या मनात स्‍वदेश, स्‍वधर्म आणि स्‍वाभिमान जागवण्‍याचे काम या अभियानाच्‍या माध्‍यमातून होणार आहे, असे उद़्‍गार मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले. केंद्रशासनाच्‍या ‘आझादी का अमृत महोत्‍सवा’च्‍या सांगतेच्‍या निमित्ताने देशभरात ‘माझी माती, माझा देश’ हे अभियान राबवले जाणार आहे. अभियानाद्वारे राष्‍ट्रपुरुषांचे कार्य सर्वसामान्‍यांपर्यंत पोचवण्‍यासाठी राज्‍यात विविध उपक्रम राबवले जाणार आहेत.

या अभियानाच्‍या अंतर्गत ९ ऑगस्‍ट या क्रांतीदिनाच्‍या निमित्ताने देशासाठी हौतात्‍म्‍य पत्‍करलेल्‍या वीरांच्‍या नावाच्‍या शीलाफलकाचे अनावरण करण्‍यात आले. ऑगस्‍ट क्रांती मैदानावरील पुरातन वास्‍तूंच्‍या जतनाच्‍या विविध कामांचेही या वेळी लोकार्पण करण्‍यात आले. या वेळी मुख्‍यमंत्र्यांनी वरील वक्‍तव्‍य केले. या वेळी उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्‍थित होते.

या वेळी मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे म्‍हणाले…

१. क्रांतीकारकांनी केलेला त्‍याग आणि बलीदान यांमुळे आपण स्‍वातंत्र्याचे अमृतक्षण अनुभवत आहोत. ‘माझी माती माझा देश’ अभियानातून त्‍यांच्‍या प्रती कृतज्ञता व्‍यक्‍त करत हा ऐतिहासिक वारसा जोपासण्‍याचे काम आपण करत आहोत. स्‍वराज्‍याचा हुंकार महाराष्‍ट्राच्‍या मातीतून उमटला. प्रत्‍येकाने त्‍याचा अभिमान बाळगला पाहिजे.

२. महात्‍मा गांधी यांनी ब्रिटिशांना ‘चले जाव’चा नारा येथूनच दिला आणि तरुणांमध्‍ये चेतना जागवली. ब्रिटिशांच्‍या अन्‍यायाविरुद्ध लढण्‍याचे धारिष्‍ट्य क्रांतीकारकांनी दाखवले. महाराष्‍ट्राला शिवछत्रपतींचा वारसा आहे. यासह संत, समाजसुधारक आणि क्रांतीकारक यांची मोठी फळी या महाराष्‍ट्राने देशाला दिली.

३. कष्‍टकरी, शेतकरी, कामगार यांनी योगदान दिले. त्‍यामुळे केवळ त्‍यांच्‍या बलीदानाचे स्‍मरण करून त्‍यांची निष्‍ठा तरुणांपर्यंत पोचवली पाहिजे. याच उद्देशाने हे अभियान देशभरात राबवले जात आहे.

अभियानाच्‍या माध्‍यमातून गुलामगिरीच्‍या खुणा पुसण्‍याचे काम ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्‍यमंत्री

ऑगस्‍ट क्रांती मैदानाचे एक अनन्‍यसाधारण महत्त्व आहे. या ठिकाणी उचित व्‍यवस्‍था, नीटनेटकेपणा आणि हुताम्‍यांची स्‍मृती असावी, त्‍या दृष्‍टीने मुंबई महानगरपालिकेने चांगली व्‍यवस्‍था केली आहे. येत्‍या काळात ‘पंचप्रण मोहिमे’च्‍या माध्‍यमातून देशाला विकसित करण्‍याचे स्‍वप्‍न आपण पूर्ण करू. या अभियानाच्‍या माध्‍यमातून गुलामगिरीच्‍या खुणा पुसण्‍याचे काम चालू आहे.

 देशभक्‍ती आणि विकास पुढील पिढीपर्यंत पोचवण्‍याचे काम केले पाहिजे ! – अजित पवार, उपमुख्‍यमंत्री 

स्‍वातंत्र्यसैनिक आणि त्‍यांचे कुटुंबीय यांनी देशासाठी त्‍याग केला. ही देशभक्‍ती आणि विकासाची ज्‍योत तेवत राहील अन् ती पुढील पिढीपर्यंत पोचवण्‍याचे काम आपण सर्वांनी केले पाहिजे.

भारताला विकसित राष्‍ट्र करण्‍यासाठी घेण्‍यात आला ‘पंचप्रण’ ! 

भारताला विकसित देश करायचे आहे. वर्ष २०४७ पर्यंत भारताला विकसित देश बनवण्‍याचे स्‍वप्‍न साकार करायचे आहे. गुलामगिरीची मानसिकता मुळापासून उखडून टाकायची आहे. देशाच्‍या समृद्ध वारशाचा अभिमान बाळगायचा आहे. एकता आणि एकजूट यांसाठी कर्तव्‍यदक्ष रहायचे आहे. नागरिकांचे कर्तव्‍य बजावयाचे आहे. देशाचे रक्षण करणार्‍यांचा आदर ठेवायचा आहे, ही पंचप्रण (शपथ) सर्व उपस्‍थितांनी या वेळी घेतली.

संपादकीय भूमिका

स्‍वराज्‍यासाठी क्रांतीकारकांच्‍या बलीदानाच्‍या प्रेरणेतून आता सुराज्‍यासाठी तरुणांनी संघटित व्‍हावे !