परराज्‍यात गेलेल्‍या प्रकल्‍पांच्‍या श्‍वेतपत्रिकेविषयी उत्तर द्यावे ! – माधव भांडारी, भाजप प्रदेश उपाध्‍यक्ष

माधव भांडारी

मुंबई, ९ ऑगस्‍ट (वार्ता.) – फॉक्‍सकॉन, एअरबस, सॅफ्रन आणि बल्‍क ड्रग पार्क प्रकल्‍पांच्‍या गुंतवणूकदारांकडे कोणत्‍या मागण्‍या केल्‍यामुळे हे प्रकल्‍प राज्‍याबाहेर गेले, याचे उत्तर माजी मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी यांनी द्यावे, असे आव्‍हान भाजपचे प्रदेश उपाध्‍यक्ष माधव भांडारी यांनी ९ ऑगस्‍ट या दिवशी भाजपच्‍या प्रदेश कार्यालयात झालेल्‍या पत्रकार परिषदेत दिले. या वेळी माध्‍यम विभाग प्रमुख नवनाथ बन, सह-मुख्‍य प्रवक्‍ते अजित चव्‍हाण आणि प्रवक्‍ते ओमप्रकाश चौहान उपस्‍थित होते.

माधव भांडारी पुढे म्‍हणाले की,

१. पररराज्‍यातील प्रकल्‍पांविषयी राज्‍याच्‍या उद्योग विभागाने श्‍वेतपत्रिका प्रसिद्ध करून ५ दिवस उलटले, तरी उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्‍या नेते यांनी याविषयी ‘ब्र’ही काढलेला नाही. या श्‍वेतपत्रिकेतून महाविकास आघाडी सरकारच्‍या कार्यकाळात राज्‍यातून उद्योग कसे बाहेर गेले, हे कळून येते. अनेक मासांपासून उद्योग परराज्‍यात गेल्‍याविषयी महाविकास आघाडीचे नेते बिनबुडाचे आरोप करत होते.

२. प्रत्‍यक्षात महाविकास आघाडी सरकारचा ‘वसुली कारभार’ आणि निष्‍क्रीयता यांमुळेच उद्योग परराज्‍यात गेले. गुंतवणूकदारांनी महाराष्‍ट्राकडे पाठ फिरवत आपले उद्योग परराज्‍यात स्‍थापित का केले ? याची माहिती महायुती सरकारमधील उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सभागृहात सादर केलेल्‍या श्‍वेतपत्रिकेमध्‍ये आहे.

३. नाणार प्रकल्‍पात सर्वांत मोठी गुंतवणूक असलेल्‍या सौदी अराम्‍को या तेल आस्‍थापनाने आता पाकिस्‍तानातील ग्‍वादर शहराची निवड केली आहे. नाणार प्रकल्‍पाला विरोध करण्‍यामागचा नेमका उद्देश काय होता ?

४. महायुती सरकारच्‍या पारदर्शक आणि गतीमान कारभारामुळे आजमितीला महाराष्‍ट्रात मोठ्या प्रमाणात विदेशी गुंतवणूक होत आहे. आता गुंतवणूकदारांकडून कुणीही हप्‍ते मागत नसल्‍यामुळेच अधिकाधिक उद्योग राज्‍यात येत आहेत. त्‍यामुळे महाराष्‍ट्र राज्‍य औद्योगिक क्षेत्रात पुन्‍हा अव्‍वल क्रमांकावर आले आहे.