काँग्रेस-चिनी भाई भाई !

राहुल गांधी आणि केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर

स्‍वदेशातील माहिती शत्रूराष्‍ट्राला पुरवणे काय किंवा पैसे घेऊन शत्रूराष्‍ट्राची धोरणे स्‍वदेशात राबवणे काय, हा विश्‍वासघात असतो. असा विश्‍वासघात काँग्रेस नेहमीच करत आली आहे. भाजपने नुकतीच पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसची ही प्रवृत्ती पुन्‍हा एकदा समोर आणली. ‘न्‍यूज क्‍लिक’ नावाच्‍या चीनधार्जिण्‍या वृत्तसंकेतस्‍थळाच्‍या माध्‍यमातून चीन भारतात साम्‍यवादी पक्षांची भारतविरोधी धोरणे रेटत असून काँग्रेस या वृत्तसंकेतस्‍थळाला पाठीशी घालत आहे’, असा गंभीर आरोप भाजपचे नेते तथा केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केला. या आरोपावर काँग्रेसकडून अद्याप तरी कुठलेही उत्तर किंवा खुलासा आलेला नाही. नेहमीप्रमाणे तो येणारही नाही.

काँग्रेस-चीनची जुनी ‘मैत्री’ !

काँग्रेस आणि चीन यांचे अत्‍यंत सलोख्‍याचे संबंध आहेत. काँग्रेसला पक्ष चालवण्‍यासाठी मिळणार्‍या देणग्‍यांमध्‍ये चीनने दिलेल्‍या देणगीचा मोठा वाटा आहे, हे विशेष ! ही गोष्‍टही काही वर्षांपूर्वी भाजपनेच उघड केली होती आणि तेव्‍हाही काँग्रेसने आतासारखेच मौन बाळगले होते. भारताच्‍या मुळावर उठलेला चीन काँग्रेसचा देणगीदार असणे आणि अशा शत्रूकडून देणग्‍या स्‍वीकारायला काँग्रेसला काहीही न वाटणे, यातच सर्व काही आले. काँग्रेसचे चीनवर विशेष प्रेम आहे, तर चीनचे काँग्रेसवर विशेष लक्ष ! म्‍हणूनच की काय कुणास ठाऊक, मध्‍यंतरी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी चीनचा गुपचूप दौरा केला होता. तेव्‍हाही त्‍यांच्‍यावर आरोप झाले होते; परंतु त्‍यांनी थातुरमातुर उत्तर देऊन मूळ सूत्राला बगल दिली होती. काँग्रेसच्‍या पूर्वजांनाही चीनविषयी कमालीचा लळा होता. देशाचा मोठा भूभाग चीनच्‍या घशात घालतांना नेहरूंनी ‘त्‍या भूमीत काही उगवतच नसेल, तर तिचा काय उपयोग ?’, अशा आशयाचे वक्‍तव्‍य केले होते. आजही भारताचा मोठा भूभाग चीनच्‍या घशात आहे. एवढ्यावरच काँग्रेसचे चीनप्रेम थांबले नाही, तर याच काँग्रेसने ‘हिंदी-चिनी भाईभाई’ अशी घोषणा देत चीनच्‍या गळ्‍यात गळा घातला आणि नंतर चीनने युद्ध करून भारताचा गळा कापला. या सर्व घटनांवरून काँग्रेसचा चीनधार्जिणेपणा उघड होतोच; पण ‘काँग्रेस-चिनी भाई भाई’ असल्‍याचेही सिद्ध होते. पाकला भारतातील गुप्‍त माहिती मिळवण्‍यासाठी ‘हनी ट्रॅप’चा (महिलांच्‍या माध्‍यमातून भारतीय अधिकार्‍यांना प्रेमाच्‍या जाळ्‍यात ओढून त्‍यांच्‍याकडून हवी ती माहिती मिळवणे) आधार घ्‍यावा लागतो, तर चीनसाठी अशाच स्‍वरूपाचे काम काँग्रेस करत आहे, असे कुणाला वाटल्‍यास त्‍यात चूक ते काय ?

काँग्रेसचा दुटप्‍पीपणा !

नेविल रॉय सिंघम 

काँग्रेस ज्‍या ‘न्‍यूज क्‍लिक’ वृत्तसंकेतस्‍थळावरून केंद्र सरकारशी दोन हात करत आहे, ते वृत्तसंकेतस्‍थळ काही भारतात जनप्रबोधन करण्‍यासाठी चालू केलेले नाही. अनुराग ठाकूर यांनी दिलेल्‍या माहितीप्रमाणे ‘न्‍यूज क्‍लिक’ला चीनमधील ‘ग्‍लोबल मीडिया’कडून अर्थपुरवठा केला जातो. भारतीय यंत्रणांनी ‘न्‍यूज क्‍लिक’वर घातलेल्‍या धाडीत नेविल राय सिंघम याने हा अर्थपुरवठा केल्‍याचे उघड झाले. त्‍याचा संबंध चीनमधील सत्ताधारी ‘कम्‍युनिस्‍ट पार्टी ऑफ चायना’च्‍या भारतविरोधी काम करणार्‍या शाखेशी असल्‍याचे उघड झाले. हीच शाखा ‘भारत तोडा’ ही मोहीम राबवते. या सिंघमला चिनी आस्‍थापने अर्थपुरवठा करतात. या वृत्तसंकेतस्‍थळाच्‍या माध्‍यमातून बातम्‍यांच्‍या नावाखाली भारताची अपकीर्ती केली जात होती, तसेच चीनची भारतविरोधी धोरणे रेटली जात होती. संतापजनक म्‍हणजे याला आपल्‍याकडील काहींनी साथ दिली. अमेरिकेतील प्रथितयश ‘न्‍यूयॉर्क टाइम्‍स’ या वृत्तपत्रानेही ‘नेविल रॉय सिंघम आणि त्‍याचे ‘न्‍यूज क्‍लिक’ वृत्तसंकेतस्‍थळ अत्‍यंत धोकादायक असून ते चीनमधील सत्ताधारी ‘कम्‍युनिस्‍ट पार्टी ऑफ चायना’ची दूषित धोरणे जगभर पोचवण्‍यासाठी कार्यरत आहे’, हे उघड केले. एवढेच नव्‍हे, तर या वृत्तपत्राने पुढे म्‍हटले आहे की, ‘फार थोड्या जणांना ठाऊक आहे की, काही अशासकीय संस्‍था आणि आस्‍थापने यांच्‍या आडून नेविल रॉय सिंघम हा चीनच्‍या सरकारी माध्‍यमांसमवेत काम करून चीन सरकारची धोरणे जगभर प्रसारित करत आहे. त्‍याने हे जाळे भारत, ब्राझिल, दक्षिण आफ्रिका यांच्‍यासह अनेक देशांमध्‍ये विणले आहे. त्‍यासाठी त्‍याला मोठ्या प्रमाणात अर्थपुरवठाही केला जातो.’ या सर्व पार्श्‍वभूमीवर अंततः केंद्र सरकारने वर्ष २०२१ मध्‍ये ‘न्‍यूज क्‍लिक’ या संकेतस्‍थळावर कारवाईसाठी पावले उचलली. केंद्र सरकारच्‍या या कारवाईला काँग्रेसने ‘प्रसारमाध्‍यमांची गळचेपी केली जात आहे’, असे सांगत जोरदार विरोध केला. तथापि याच काँग्रेसने देशात आणीबाणी लागू करून प्रसारमाध्‍यमांचे कुठले स्‍वातंत्र्य जपले होते ?, हे ती सोयीस्‍करपणे विसरली. दुसर्‍यांवर आरोप करतांना आपली ३ बोटे नेहमी आपल्‍याकडे असतात, हे काँग्रेसने लक्षात ठेवले पाहिजे. चीनच्‍या पैशांवर नाचणार्‍या वृत्तसंकेतस्‍थळासाठी जीव तुटणार्‍या काँग्रेसने यापूर्वी देशातील अनेक वर्तमानपत्रांवर बंदी आणली आहे, हे लक्षात घेता काँग्रेसचा दुटप्‍पीपणा आणि खोटारडेपणा उघड होतो.

कारवाई हवी !

आतापर्यंत काँग्रेसने राष्‍ट्रहिताच्‍या अनेक सूत्रांमध्‍ये पाकिस्‍तान आणि चीन यांची भूमिका; म्‍हणजे विरोधी भूमिका बजावली आहे. आता तर देशविरोधी कृत्‍ये करणार्‍यांना उघडपणे पाठीशी घालण्‍यापर्यंत तिची मजल गेली आहे. हे कुठेतरी थांबले पाहिजे. भाजपनेही प्रत्‍येक वेळी केवळ देशद्रोह्यांची कृत्‍ये मांडत बसण्‍यापेक्षा त्‍यांच्‍यावर धडक कारवाई केली पाहिजे, मग ती काँग्रेस असो किंवा कुठलेही प्रसारमाध्‍यम ! अशी कारवाई भाजपने केली असती, तर कुणाचे देशद्रोही कृत्‍य करण्‍याचे धाडस झाले नसते. अजूनही वेळ गेलेली नाही. शत्रूराष्‍ट्रांची तळी उचलणार्‍या ‘चिनी-काँग्रेस’चे  भारतात काय काम ? सरकारने अशांची मान्‍यताच रहित करणे, यातच राष्‍ट्रहित आहे !

देशविरोधी कृत्‍ये करणार्‍या राजकीय पक्षांवर सरकारने वेळीच धडक कारवाई करणे आवश्‍यक !