केंद्रीय गृहमंत्र्यांचा घणाघात
नवी देहली – मणीपूरमधील हिंसाचाराचे कुणीच समर्थन करणार नाही. तेथील घटना लज्जास्पदच आहे; परंतु त्यावर राजकारण करणे हे त्याहून अधिक लज्जास्पद आहे. मणीपूरच्या घटनांवर विरोधी पक्ष समाजात भ्रम पसरवत आहे. गेली ६ वर्षे मणीपूरमध्ये भाजपची सत्ता असल्यापासून तेथे एकही हिंसाचाराची घटना घडली नाही. संचारबंदी लागू करावी लागली नाही, असा घणाघात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ९ ऑगस्टच्या सायंकाळी लोकसभेत केला.
शहा पुढे म्हणाले की,
१. मणीपूरवरून पंतप्रधानांवर नाकर्तेपणाचे आरोप करण्यात येतात; परंतु घटना घडल्याचे समोर येताच आम्ही ३६ व्हिडिओ कॉन्फरन्स घेतल्या. केंद्रीय राखीव पोलीस दलाचे ३६ सहस्र सैनिक पाठवले. तेथील पोलीस उपायुक्त पालटले, तसेच मुख्य सचिवांनाही पालटण्यात आले. हिंसाचार थांबवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न चालू आहेत. मी ३ दिवस, तर गृह राज्यमंत्री २३ दिवस मणीपूरमध्ये राहिले.
#WATCH | Union Home Minister Amit Shah gives a detailed response on what led to violence in Manipur and the measures taken by the government to control the situation in the state pic.twitter.com/PKscrHIyGn
— ANI (@ANI) August 9, 2023
२. वर्ष १९९३ मध्ये मणीपूरमध्ये झालेल्या नागा-कुकी यांच्या संघर्षामध्ये ७०० लोक मारले गेले होते. त्यावर तत्कालीन पंतप्रधान अथवा केंद्रीय गृहमंत्री यांनी नाही, तर गृह राज्यमंत्र्यांनी वक्तव्य जारी केले होते. मणीपूरमध्ये सर्वाधिक हिंसाचार काँग्रेसच्या सत्ताकाळातच झाला.
३. ४ मे या दिवशीची घटना लज्जास्पद आहेच, परंतु संसदेचे सत्र चालू होण्याच्या आदल्या दिवशीच तो व्हिडिओ समोर का आणण्यात आला ? ज्याने तो व्हिडिओ प्रसारित केला, त्याने तो पोलिसांना आधीच द्यायला हवा होता. ज्या दिवशी व्हिडिओ समोर आला, त्याच दिवशी ९ लोकांची ओळख पटवून त्यांना अटक करण्यात आली. आता त्यांच्या विरोधात खटला चालवला जात आहे.