तमिळनाडूमध्ये भाजपच्या कार्यालयातून ‘भारतमाते’चा पुतळा प्रशासनाने हटवला !

अनुमती न घेतल्याने पुतळा हटवल्याची प्रशासनाची माहिती

चेन्नई – तमिळनाडूच्या विरूधुनगर जिल्ह्यातील भाजपच्या कार्यालयात बसवण्यात आलेला भारतमातेचा पुतळा पोलीस आणि महसूल अधिकारी यांनी हटवला. या कारवाईमुळे सत्ताधारी द्रमुक आणि भाजप यांच्यात नवीन राजकीय संघर्ष चालू झाला आहे. भाजपचे तमिळनाडू प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई यांनी राज्यात पदयात्रा चालू केली आहे.  त्यांची पदयात्रा विरूधुनगर येथे आल्यावर ते भारतमातेच्या पुतळ्याचे अनावरण करणार होते. सरकारी अधिकार्‍यांनी ‘हा पुतळा उभारण्याआधी भाजपच्या कार्यकर्त्यांनी अनुमती घेतली नव्हती’, असे सांगितले. पुतळा हटवल्याचा भाजपने निषेध केला आहे.

१. ‘पोलीस जिल्हा कार्यालयाच्या प्रवेशद्वाराचे कुलूप तोडून आत घुसले आणि त्यांनी पुतळा हटवला’, असा आरोप भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला.

२. अण्णामलाई यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला. ‘द्रमुकच्या भ्रष्ट राजवटीत भाजपला कार्यालयाच्या आवारात भारतमातेचा पुतळा बसवण्याची अनुमतीही दिली जात नाही’, असे अण्णामलाई यांनी म्हटले आहे. ‘आमच्या दौर्‍यामुळे द्रमुक सरकारचा भ्रष्टाचार उघड होत असल्याने जिल्ह्यातील द्रमुकच्या २ मंत्र्यांनी पुतळा हटवण्याचे पाऊल उचलले आहे’, असे अण्णामलाई म्हणाले.