सनातनचे १०२ वे संत पू. शिवाजी वटकर (वय ७६ वर्षे) यांचा साधनाप्रवास
‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा अध्यात्मप्रचार दौरा, परात्पर गुरु डॉ. आठवले घेत असलेल्या जाहीर सभांची वैैशिष्ट्ये आणि परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने अध्यात्माचा प्रचार करण्यासाठी पू. शिवाजी वटकर यांना लाभलेले सहसाधकांचे साहाय्य’, यांविषयी आपण २०.७.२०२३ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या भागात पाहिले. आजच्या भागात ‘परात्पर गुरु डॉक्टरांनी ‘सूक्ष्म जगता’ची करून दिलेली ओळख, तसेच अन्य राज्यांत प्रचार करतांना परात्पर गुरु डॉक्टरांची अनुभवलेली अपार कृपा आणि अनिष्ट शक्तींपासून झालेले रक्षण’ यांविषयीची सूत्रे पाहूया.
(भाग ७)
भाग ६ वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/703058.html
१६. परात्पर गुरु डॉक्टरांनी ‘सूक्ष्म जगता’ची करून दिलेली ओळख
१६ अ. परात्पर गुरु डॉक्टरांनी अभ्यासवर्गात घेतलेल्या सूक्ष्मातील प्रयोगांमुळे ‘सूक्ष्म’ विषय कळू लागणे : साधनेत येण्यापूर्वी ‘सूक्ष्म जग असते’, हे मला ठाऊकच नव्हते. परात्पर गुरु डॉक्टरांनी अभ्यासवर्गात सूक्ष्मातील अनेक प्रयोग घेतल्यामुळे मला त्याविषयी ठाऊक झाले आणि थोडेफार कळूही लागले. मला कधी वाईट शक्ती दिसली नाही. त्यामुळे मी कुठेही गेलो, तरी मला त्यांची भीती वाटत नाही. माझ्याभोवती गुरुकृपेचे संरक्षककवच असल्यामुळे मी सुरक्षित आणि स्थिर राहू शकत आहेे.
१६ आ. अध्यात्मप्रचाराच्या सेवेत वाईट शक्तींचे आलेले अडथळे
१. वर्ष १९९३ – १९९४ मध्ये मी अध्यात्माच्या प्रचारासाठी संभाजीनगर, पुणे, रायगड इत्यादी ठिकाणी जात होतो. प्रचारासाठी बाहेरगावी जातांना मला अनिष्ट शक्तींचा विरोध होत असे.
२. वर्ष २००१ मध्ये मला अकस्मात् हृदयविकाराचा त्रास चालू झाला. तेव्हा परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने घाटकोपर (मुंबई) येथील प.पू. विजय जोशीबाबा यांनी माझ्यासाठी आध्यात्मिक स्तरावरील उपाय केले. त्यामुळे मी वाईट शक्तींच्या प्राणघातक आक्रमणातून वाचलो.
३. वर्ष २०१० पासून वाईट शक्तींच्या आक्रमणामुळे आमच्या कुटुंबात काही कौटुंबिक प्रश्न निर्माण झाले. वर्ष २०१२ पासून माझ्या कुटुंबियांवर ७ – ८ न्यायालयीन खटले चालू झाले. ‘वाईट शक्तींनी मी आणि माझे कुटुंबीय यांच्या साधनेत आणलेले हे अडथळे आहेत’, असे मला वाटते. परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने मला वाईट शक्तींच्या आक्रमणावर मात करता आली आणि माझ्या सेवेत खंड पडला नाही.
१७. अन्य राज्यांत प्रचार करतांना परात्पर गुरु डॉक्टरांची अनुभवलेली अपार कृपा आणि अनिष्ट शक्तींपासून झालेले रक्षण
परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने मला वर्ष १९९६ ते २००० पर्यंत प्रत्येक शनिवारी आणि रविवारी सोलापूर, कर्णावती (अहमदाबाद), बडोदा, तसेच भाग्यनगर (हैद्राबाद) येथे अध्यात्म प्रचारासाठी जाण्याची संधी मिळाली.
१७ अ. परात्पर गुरु डॉक्टरांनी भाग्यनगर जाण्यास सांगणे आणि त्यांच्या कृपेने अनोळखी प्रदेशात निवास, भोजन, प्रवास इत्यादींची सोय होणे : परात्पर गुरु डॉक्टरांनी आरंभी भाग्यनगर येथे मला एकट्यालाच अध्यात्म प्रचारासाठी जाण्यास सांगितले होते. ‘गुरुदेव सांगत आहेत, म्हणजे तेच माझ्याकडून अपेक्षित अशी सेवा करून घेणार आहेत’, असा विचार करून मी भाग्यनगर येथे प्रचारासाठी गेलो. ‘परात्पर गुरु डॉक्टरांनी तिथे माझ्यासाठी अगोदरच सर्व नियोजन केले होते’, याची मला अनुभूती आली. मी भाग्यनगरला पूर्वी कधीही गेलो नव्हतो, तरीही गुरुकृपेने तेथे माझी निवास, भोजन, प्रवास आणि संपर्क या सगळ्यांची सोय झाली. अन्य राज्यांत जाऊन एकट्यानेच प्रचार चालू केल्याने माझी तन-मन-धनाने सेवाही झाली. कार्याला विरोध करणार्यांकडे साक्षीभावाने पाहून मला त्यांना टाळता येऊ लागले.
१७ आ. बडोदा (गुजरात) येथे सेवा करतांना परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने वाईट शक्तींपासून रक्षण होणे
१७ आ १. बडोदा येथे एका व्यक्तीने ग्रंथप्रदर्शन कक्षावर साहाय्य करून जवळीक करणे : आरंभी मी बडोदा (गुजरात) येथे अध्यात्म प्रचारासाठी एकटाच जात असे. मी तेथील मंदिराबाहेर सनातन-निर्मित ग्रंथांचे प्रदर्शनकक्ष लावत असे. एकदा तिथे आलेल्या एका व्यक्तीने मला ‘‘तुम्हाला काही साहाय्य हवे का ?’’, असे विचारले आणि साहाय्यही केले. असे काही वेळा झाल्यावर ‘मंदिरात येणारी ती व्यक्ती धार्मिक आहे’, असे मला वाटले आणि माझी तिच्याशी चांगली ओळख झाली.
१७ आ २. मंदिरात भेटलेल्या व्यक्तीने सहसाधकाशी ओळख वाढवून त्यांना घरी नेऊन जेवू घालणे आणि नंतर सहसाधकाला आध्यात्मिक त्रास होऊ लागणे : त्यानंतर पनवेल, रायगड येथील साधक श्री. प्रमोद बेंद्रे माझ्या समवेत बडोदा येथे सेवेसाठी येऊ लागले. त्यांचीही त्या व्यक्तीशी ओळख झाली. ती व्यक्ती श्री. बेंद्रे यांना तिच्या घरी जेवायला घेऊन जात असे; पण त्यामुळे श्री. बेंद्रेना आध्यात्मिक त्रास होऊ लागला.
१७ आ ३. ‘मंदिरात भेटलेली व्यक्ती अघोरी विद्येचे प्रयोग करणारी आहे’, असे कळणे; मात्र परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने सुरक्षित रहाणे : नंतर मला कळले, ‘ती व्यक्ती अघोरी विद्येचे प्रयोग करणारी आहे.’ त्या व्यक्तीने मला ग्रंथ प्रदर्शनासाठी साहाय्य केले आणि बडोद्यातील तिच्या ओळखीच्या धार्मिक व्यक्तींचे संपर्क क्रमांकही दिले होते. ती व्यक्ती आरंभी कोणताही त्रास न देता ‘धर्मप्रचारासाठी साहाय्य करत आहे’, असेे दाखवत होती आणि नंतर त्रास देत होती; मात्र परात्पर गुरु डॉक्टरांच्या संरक्षक कवचामुळे मी पूर्णपणे सुरक्षित राहिलो.
अध्यात्मप्रचाराच्या कार्यात वाईट शक्ती अनेक अडथळे आणत; मात्र तेथील स्थानदेवता, दैवी शक्ती, संत आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चैतन्याचे माझ्याभोवती कवच निर्माण होत असे. अन्य राज्यांतील अध्यात्मप्रचाराचे कार्य मी केवळ परात्पर गुरु डॉक्टरांचा संकल्प आणि कृपाशीर्वाद यांमुळेच करू शकलो. त्यांनी माझ्या साधनेतील केवळ स्थुलातीलच नाही, तर सूक्ष्मातील अडथळेही दूर केले. त्यामुळे मी थोडीफार सेवा करू शकलो. त्याबद्दल त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
(क्रमशः)
– (पू.) शिवाजी वटकर (सनातनचे १०२ वे संत), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२.५.२०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |