परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या जाहीर सभांच्‍या वेळी पू. शिवाजी वटकर यांनी केलेल्‍या विविध सेवा

सनातनचे १०२ वे संत पू. शिवाजी वटकर (वय ७६ वर्षे) यांचा साधनाप्रवास

‘परात्‍पर गुरु डॉक्‍टरांचे निवासस्‍थान असलेल्‍या मुंबई सेवाकेंद्रात केलेल्‍या सेवा आणि साधकांकडून समष्‍टी साधना करून घेऊन त्‍यांना घडवणारे परात्‍पर गुरु डॉ. आठवले’, याiविषयी आपण १९.७.२०२३ या दिवशी प्रसिद्ध झालेल्‍या भागात पाहिले. आजच्‍या भागात ‘परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांचा अध्‍यात्‍मप्रचार दौरा आणि अध्‍यात्‍मप्रसाराची सेवा करतांना पू. शिवाजी वटकर यांनी सहसाधकांचे मिळालेले मोलाचे साहाय्‍य’ यांविषयीची सूत्रे बघणार आहोत. 

(भाग ६)

भाग ५ वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/702812.html


१४. परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांचा अध्‍यात्‍मप्रसार दौरा !

पू. शिवाजी वटकर

१४ अ. परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या दौर्‍याच्‍या वेळी चालक म्‍हणून सेवा करणे आणि त्‍यांचे अनेक गुण जवळून अनुभवता येणे : वर्ष १९९२ मधील डिसेंबरच्‍या पहिल्‍या आठवड्यात परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी रायगड जिल्‍ह्याचा पहिला अध्‍यात्‍मप्रसार दौरा केला. तेव्‍हा पू. (कै.) विनय भावे (सनातनचे ३५ वे संत) यांनी त्‍यांच्‍या दौर्‍याचे नियोेजन केले होते. मी परात्‍पर गुरु डॉक्‍टरांच्‍या समवेत चालक म्‍हणून आणि शिकण्‍यासाठीही गेलो होतो. हा ४ दिवसांचा दौरा होता. पहिले प्रवचन नागोठणे येथे, म्‍हणजे गुरुदेवांच्‍या जन्‍मस्‍थानी झाले. ६.१२.१९९२ या दिवशी दौर्‍यातील शेवटचे प्रवचन पाली येथे झाले. या प्रसारदौर्‍यात मला परात्‍पर गुरु डॉक्‍टरांच्‍या कृतीतून त्‍यांचे अनेक गुण शिकता आले. त्‍यांची साधी रहाणी, काटकसरीपणा, वक्‍तशीरपणा, इतरांचा विचार करणे, वागण्‍यामधील सहजता आदी अनेक गुण अनुभवता आले. ‘अध्‍यात्‍मप्रसाराची समष्‍टी सेवा कशी करायची ?’, हे त्‍यांनीच मला शिकवले.

१४ आ. परात्‍पर गुरु डॉक्‍टरांच्‍या जिल्‍ह्याजिल्‍ह्यांतील जाहीर सभांच्‍या निमित्ताने अनेक सेवा करण्‍याची संधी मिळणे : परात्‍पर गुरु डॉक्‍टर आरंभी प्रवचने आणि अभ्‍यासवर्ग घेत असत. प्रचारकार्य वाढत गेले, तसा समाजातून प्रतिसादही वाढत गेला. व्‍यापक जनजागृतीसाठी त्‍यांनी मैदाने आणि सभागृहे येथे जाहीर सभा घेण्‍यास आरंभ केला. त्‍यांच्‍यातील चैतन्‍यामुळे या सभांना चांगला प्रतिसाद मिळत असे. मुंबई, ठाणे, रायगड आणि सोलापूर येथे त्‍यांच्‍या सभा झाल्‍या. तेव्‍हा मला ‘त्‍या सभांचे नियोजन, सभेचा प्रचार, सभा चालू असतांना कराव्‍या लागणार्‍या सेवा आणि सभेनंतरच्‍या प्रसाराची सेवा’, अशा सेवा करण्‍याची संधी मिळाली.

१४ इ. परात्‍पर गुरु डॉ. आठवले घेत असलेल्‍या जाहीर सभांची वैशिष्‍ट्ये !

१४ इ १. सभेचे वैशिष्‍ट्यपूर्ण व्‍यासपीठ ! : या जाहीर सभा ‘सनातन भारतीय संस्‍कृती संस्‍थे’च्‍या वतीने घेण्‍यात आल्‍या. सभेच्‍या व्‍यासपिठावर वक्‍त्‍याच्‍या पाठीमागे श्रीकृष्‍णार्जुनाच्‍या रथाचा भव्‍य पडदा लावलेला असे. व्‍यासपिठाच्‍या उजव्‍या बाजूला श्रीराम आणि मारुति, तर डाव्‍या बाजूस श्रीकृष्‍ण आणि परशुराम यांची युद्धसज्‍ज असलेली भव्‍य चित्रे लावली जात. त्‍यामुळे सभेचे मैदान म्‍हणजे कुरुक्षेत्राची युद्धभूमी वाटत असे. सभेच्‍या ठिकाणी चैतन्‍यमय वातावरणही निर्माण होत असे.

१४ इ २. सभांच्‍या वेळी येणार्‍या वैशिष्‍ट्यपूर्ण अनुभूती

अ. ‘परात्‍पर गुरु डॉक्‍टरांच्‍या रूपात प्रत्‍यक्ष श्रीकृष्‍ण श्रोत्‍यांना ‘साधना म्‍हणजे कलियुगातील गीता’ सांगत आहे’, अशी अनुभूती शेकडो साधक आणि समाजातील व्‍यक्‍ती यांना येत असे. परात्‍पर गुरु डॉक्‍टरांचे लेखातून अथवा बोलण्‍यातून शिकवणे म्‍हणजे ‘कलियुगातील गीता’ अशी अनुभूती शेकडो साधक आणि समाजातील व्‍यक्‍ती यांना येते.

आ. परात्‍पर गुरु डॉक्‍टर प्रवचनाच्‍या वेळी नेहमी सांगायचे, ‘साधकांनी प्रवचनांतील शब्‍दांकडे लक्ष न देता ‘कोणती अनुभूती येते का ?’, ते पहावे.’ नेमके तसेच होत असे. ‘साधकांना प्रत्‍यक्ष भगवंत बोलत आहे’, अशी अनुभूती येत असे.

इ. मी परात्‍पर गुरु डॉक्‍टरांची शेकडो प्रवचने आणि अनेक जाहीर सभा यांतून त्‍यांचे मार्गदर्शन ऐकले आहे; मात्र ‘प्रत्‍येक वेळी मी ते प्रथमच ऐकत आहे’, असे वाटून मला आनंद मिळत असे. ‘नित्‍यनूतनः सनातनः ।’ म्‍हणजे ‘सनातन म्‍हणजे नित्‍यनूतन’, याचा मला अनुभव येत असे.

ई. परात्‍पर गुरु डॉक्‍टर यांची प्रवचन किंवा सभा यांच्‍याशी संबंधित सेवा करतांना साधकांना नेहमी उत्‍साह आणि आनंद वाटणे : प्रवचन किंवा सभा यांच्‍याशी संबंधित सेवा करतांना मला नेहमी उत्‍साह आणि आनंद वाटत असे. मायेतील एखादी आवडती गोष्‍ट पुनःपुन्‍हा केली, तर तिचा कंटाळा येतो; मात्र या सेवांतून कंटाळा न येता नेहमी आनंदच मिळत असे; कारण हेे सर्व कार्य परात्‍पर गुरु डॉक्‍टरांमधील चैतन्‍यशक्‍तीमुळे होत होते.

१५. परात्‍पर गुरु डॉक्‍टरांच्‍या कृपेने अध्‍यात्‍माचा प्रचार करण्‍यासाठी लाभलेले सहसाधक !

१५ अ. परात्‍पर गुरु डॉक्‍टरांप्रती पुष्‍कळ भाव असलेल्‍या आदर्श साधिका दादर येथील श्रीमती सावंतआजी ! : वर्ष १९९० ते वर्ष १९९२ या काळात परात्‍पर गुरु डॉक्‍टर दादर येथील संत ज्ञानेश्‍वर मंदिर, समर्थ व्‍यायाम मंदिर आणि बालमोहन शाळा येथे रविवारी दुपारी १ ते ५ या वेळेत अभ्‍यासवर्ग घेत असत. त्‍या अभ्‍यासवर्गाला दादर येथील श्रीमती सावंतआजी येत. त्‍यांना कथा, कीर्तने आणि प्रवचने आवडत. त्‍या गुरूंच्‍या शोधात होत्‍या. संत ज्ञानेश्‍वर मंदिरात परात्‍पर गुरु डॉक्‍टरांच्‍या अभ्‍यासवर्गाला आल्‍यावर त्‍यांचा गुरूंचा शोध संपला आणि त्‍यांना जे पाहिजे होते, ते मिळाले. त्‍यांचा परात्‍पर गुरु डॉक्‍टरांप्रती पुष्‍कळ भाव होता. परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी ‘त्‍यांची आध्‍यात्मिक पातळी ७० टक्‍के आहे’(म्‍हणजे त्‍या संत आहेत.), असे आम्‍हाला सांगितले होते. त्‍या आमच्‍यासाठी आदर्श साधिका होत्‍या.

१५ आ. साधनेत साहाय्‍य करणारे पू. (कै.) विनय भावे (सनातनचे ३५ वे संत) : पू. भावे यांच्‍या वरसई, (ता. पेण, जि. रायगड) येथील घरी अनेक संत आणि संप्रदायांचे प्रमुख यायचे. घाटकोपरचे प.पू. जोशीबाबा यांच्‍या समवेत मी अनेक वेळा पू. विनय भावे यांच्‍याकडे गेलो आहे. पू. भावे यांच्‍यात पुष्‍कळ प्रेमभाव होता. मला त्‍यांच्‍याकडून पुष्‍कळ शिकता आले आणि साधनेतही नेहमी साहाय्‍य झाले.

१५ इ. नोकरी सोडून पूर्णवेळ साधना करणारे मुंबईतील पहिले साधक – श्री. माधव देशपांडे : परात्‍पर गुरु डॉक्‍टर बांद्रा (मुंबई) येथे घेत असलेल्‍या अभ्‍यासवर्गाला श्री. देशपांडे आले होते. ते ‘जर्मन रेमेडीज्’ या औषध निर्मितीच्‍या कारखान्‍यात नोकरी करत होते. त्‍यांनी मला घरच्‍याप्रमाणे प्रेम दिले. त्‍यांच्‍यामुळे मला सेवा करण्‍यास आधार मिळाला. आम्‍ही दोघांनी एकत्रित साधना आणि प्रचारसेवा चालू केली. त्‍यांनी मला प्रचारात मोलाचे साहाय्‍य केले. गुरुदेवांच्‍या कृपेने आम्‍ही श्री. देशपांडे यांच्‍या वरळी (मुंबई) येथील घरी साप्‍ताहिक सत्‍संग चालू केला. त्‍यानंतर वरळी भागात अनेक सत्‍संग चालू झाले. नोकरी सोडून पूर्णवेळ साधना करणारे श्री. देशपांडे हे मुंबईतील पहिले साधक होतेे. त्‍यांच्‍या घरात मिळवतेे दुसरे कोणी नसल्‍यामुळे त्‍यांच्‍यावर कुटुंबियांचे दायित्‍व होते, तरीही त्‍यांनी पूर्णवेळ साधना करण्‍यासाठी नोकरी सोडली. तेव्‍हा परात्‍पर गुरु डॉक्‍टरांना पुष्‍कळ आनंद झाला. ते म्‍हणाले, ‘‘एक जीव मायेतून सुटला !’’

१५ ई. सनातनला पहिली गाडी अर्पण करणारे श्री. काली मेहेरनोश ! : श्री. मेहेरनोश ‘शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड’ या आस्‍थापनात माझ्‍याप्रमाणे उच्‍च पदावर कार्यरत होते. मी त्‍यांना सनातन संस्‍था आणि साधना यांविषयी सांगितल्‍यावर त्‍यांनी लगेच साधना करायला आरंभ केला. त्‍यांना चांगल्‍या अनुभूतीही आल्‍या. श्री. मेहेरनोश यांना त्‍यांची जुनी ‘फियाट’ गाडी सनातन संस्‍थेच्‍या प्रसारकार्यासाठी अर्पण करायची होती. तेव्‍हा परात्‍पर गुरु डॉक्‍टर श्री. मेहेरनोश यांना म्‍हणाले, ‘‘तुम्‍ही सनातनमध्‍ये असा किंवा नसा; पण तुम्‍ही साधना चालू ठेवणार असाल, तरच अध्‍यात्‍माच्‍या प्रसारासाठी गाडी अर्पण म्‍हणून घेऊ.’’ श्री. मेहेरनोश यांचा भाव चांगला होता. त्‍यांनी त्‍यांची ‘फियाट’गाडी सनातन संस्‍थेला अर्पण केली. तेव्‍हापासून वर्ष २००८ पर्यंत, म्‍हणजे १० वर्षे ते सनातन संस्‍थेमध्‍ये सेवा आणि साधना करत होते. मी नोकरी आणि प्रसार करत असतांना परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी मला श्री. मेहेरनोश यांच्‍या रूपात एक चांगला आध्‍यात्मिक आणि व्‍यावहारिक मित्र दिला होता. त्‍यांचा मी सदैव ऋणी आहे.

१५ उ. आध्‍यात्मिक मैत्री जपणारे श्री. तुकाराम लोंढे ! : वर्ष १९९५ पासून आतापर्यंत परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी श्री. तुकाराम लोंढे ( वर्ष २०२३ मधील आध्‍यात्मिक पातळी ६७ टक्‍के) यांच्‍याशी माझी आध्‍यात्मिक मैत्री करून दिली आहे.

परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी घरून विरोध असणार्‍या आणि आध्‍यात्मिक त्रास असलेल्‍या अनेक साधकांकडूनही साधना अन् सेवा करून घेतली आहे. साधना आणि अध्‍यात्‍मप्रसार सेवेत मला अनेकांचे अनमोल साहाय्‍य लाभले. सहसाधकांचे घर म्‍हणजे मला श्री गुरूंचा आश्रमच वाटायचा. मला मिळालेले सहसाधक हे परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी माझ्‍या साहाय्‍यासाठी दिलेले देवदूत होते. माझी संतपदापर्यंत वाटचाल होण्‍यात या सर्वांचा सिंहाचा वाटा आहे. त्‍यामुळे ‘माझ्‍या संपर्कातील सर्व साधकांची आध्‍यात्मिक प्रगती व्‍हावी’, असे मला मनापासून वाटते.

वर्ष २०१० पासून परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी मला देवद, पनवेल येथील सनातनच्‍या आश्रमात पूर्णवेळ निवास करण्‍याची संधी देऊन माझी साधना करून घेतली आहे. त्‍यातून ते माझ्‍याकडून नकळत एक प्रकारची संन्‍यासाश्रमाची साधना करून घेत आहेत. त्‍यासाठी मी त्‍यांच्‍या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’

(क्रमशः)

– (पू.) शिवाजी वटकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२.५.२०२०)

भाग ७ वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/709198.html

  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या/साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक
  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.