वैखरी वाणी
‘साधनेच्या आरंभी साधकाचा नामजप वैखरी वाणीत होतो; परंतु वैखरीतून मध्यमा आणि पश्यंती वाणींमध्ये जाण्यासाठी साधकाचे प्रयत्न सातत्याने होणे अपेक्षित आहे.
१. वैखरीतील नामजप व्यक्तीगत ठरणे
साधनेच्या आरंभी आपली स्वेच्छा जागृत असते. आपण स्वतःला स्वकोषात बांधून नामजपाच्या साधनेला प्रारंभ करतो. साधक साधना किंवा नामजप करतांनाही आपले व्यक्तित्व संकुचित ठेवतो. अशा साधकाची वैखरी वाणी त्याची व्यक्तीगत वाणी होते. त्यामध्ये ईश्वराचे महत्त्व फारसे रहात नाही.
२. ईश्वराच्या दृष्टीने स्वेच्छा किंवा स्वार्थ जागृत असलेली वैखरी सत्य नसणे
आपली स्वेच्छा किंवा स्वार्थ जागृत ठेवून वैखरी वाणीत नामजप करणारा साधक ईश्वराच्या (गुरूंच्या) सूचीत नसतो. तो गुरुकृपा किंवा ईश्वरकृपा याच्या प्राप्तीपासून दूर रहातो. त्यामुळे ‘ईश्वराच्या दृष्टीने ती वैखरी सत्य नसते’, असे म्हणू शकतो; परंतु वैखरीतून नामजप आणि साधना आरंभ करून नामजपाची वाणी उन्नत होणे, हेही आवश्यक असते. त्यासाठी स्वेच्छा आणि स्वार्थ यांची बंधने तोडून साधना किंवा नामजप करण्याचा प्रयत्न करणे आवश्यक ठरते.
३. स्वेच्छा आणि स्वार्थ यांचा त्याग आवश्यक
व्यावहारिक जीवन असो किंवा साधनाप्रवास असो, आपला स्वार्थ किंवा आपला वेगळेपणा जपल्यामुळे आपली नामजपाची वाणी वैखरीच्या पुढे जाऊ शकत नाही. त्यामुळे साधनेला आरंभ करून स्वेच्छा आणि स्वार्थ यांचा त्याग करण्याचा प्रयत्नच आपल्या नामजपाच्या वाणीला वैखरीतून पुढे पुढे घेऊन जाण्याचा एक अत्यंत महत्त्वाचा प्रयत्न असतो.’
– (सद्गुरु) डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती. (१३.१.२०२३)