निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक २२०
‘सर्दी होऊन ताप येण्यासारखी स्थिती असेल, तर कानांच्या वरचा भाग (कानशिले), गळ्याभोवतीचा भाग किंवा सर्व अंग दुखू लागते. हातापायांना गळू झाले असल्यास मांडी, गुडघ्याच्या मागचा भाग (लवणी) किंवा काख यांत दुखू लागते. वातावरणात थंडी असल्यास किंवा पावसात भिजल्यास हे दुखणे अजून वाढते. अशा सर्व दुखण्यांवर ‘वाळूच्या पोटलीने शेकणे’ हा अत्यंत सोपा आणि प्रभावी उपचार आहे. शेकल्याने दुखणे लगेच न्यून होते. ही वाळूची पोटली अशी बनवावी.
दोन्ही हातांच्या ओंजळीत मावेल एवढी वाळू तव्यावर किंवा कढईत गरम करावी आणि ती गरम केलेली वाळू एखाद्या सुती कपड्यावर ओतून कपडा बांधून पोटली बनवावी. (वाळूची पोटली बनवण्यासाठी घरातील जुने बनियन उपयोगी पडते.) वाळू एकदा गरम केल्यावर पुष्कळ वेळ गरम रहाते. त्यामुळे अधिक काळापर्यंत अंग शेकणे सोपे जाते.
आपत्काळासाठी वाळूच्या २ पोटल्या बनवता येतील, एवढी वाळू प्रत्येकाने आपल्या घरी ठेवावी. ’
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२४.७.२०२३)
लेखमालिकेतील सर्व लेख एकत्र वाचण्यासाठी मार्गिका : bit.ly/ayusanatan