सोलापूर येथे पू. भिडेगुरुजींच्‍या समर्थनार्थ रस्‍त्‍यावर उतरलेल्‍या हिंदुत्‍वनिष्‍ठांवर पोलिसांचा अमानुष लाठीमार !


सोलापूर, २ ऑगस्‍ट (वार्ता.) – पू. भिडेगुरुजी यांच्‍या समर्थनार्थ छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे दुग्‍धाभिषेक आंदोलन करण्‍याचा निर्णय श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थानने घोषित केला होता. पोलिसांनी या आंदोलनाला अनुमती नाकारली. नियोजित आंदोलनानुसार श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थानचे धारकरी चौकामध्‍ये उपस्‍थित राहिले असता फौजदार चावडी पोलिसांनी काही धारकर्‍यांना कह्यात घेतले. उर्वरित धारकर्‍यांनी दुग्‍धाभिषेक आंदोलन पूर्ण केले; मात्र धारकर्‍यांना सोडवण्‍याच्‍या मागणीसाठी फौजदार चावडी पोलीस ठाणे येथे जमा झालेल्‍या धारकर्‍यांवर पोलिसांनी अमानुषपणे लाठीमार केला. (एम्.आय.एम्.च्‍या कार्यकर्त्‍याने ‘पू. भिडेगुरुजींचे पाय तोडल्‍यास २ लाख रुपये देतो’, अशी कायदा हातात घेण्‍याची भाषा करूनही त्‍यांच्‍यावर कोणतीही कारवाई न करता जाणीवपूर्वक केवळ हिंदुत्‍वनिष्‍ठांवर लाठीमार करणारे पोलीस ! – संपादक)

जाणीवपूर्वक केलेली हिंदुत्‍वनिष्‍ठ कार्यकर्त्‍यांवरील कारवाई कदापि सहन करणार नाही ! – राजकुमार पाटील, माजी नगरसेवक, भाजप  

सोलापूर शहरात काँग्रेस आणि एम्.आय.एम्. यांना पू. भिडेगुरुजींच्‍या निषेधार्थ आंदोलन करण्‍यासाठी अनुमती दिली जाते. या आंदोलनात ‘पू. भिडेगुरुजींचे पाय तोडल्‍यास २ लाख रुपये देतो’, अशी घोषणा करणार्‍यांवर कोणतीही कारवाई न करता केवळ हिंदुत्‍वनिष्‍ठ कार्यकर्त्‍यांना जाणीवपूर्वक तुडवण्‍याचा प्रयत्न आम्‍ही कदापि सहन करणार नाही, अशी चेतावणी भाजपचे माजी नगरसेवक राजकुमार पाटील यांनी या वेळी दिली.