यवतमाळ येथे हिंदुत्वनिष्ठांचे पोलिसांना निवेदन !
यवतमाळ, २ ऑगस्ट (वार्ता.) – आर्णी रोडवरील बळवंत मंगल कार्यालय येथे २९ जुलै या दिवशी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने पू. भिडेगुरुजी यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानाच्या प्रचारार्थ आर्णी मार्गावर २ ते ३ कि.मी. अंतरावर आणि शहरातील अन्य भागांत फलक लावण्यात आले होते. त्या फलकावर छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचे छायाचित्र होते, तसेच भगवे ध्वजही लावण्यात आलेले होते. कार्यक्रम प्रारंभ होण्याच्या काही घंट्यांपूर्वी काही समाजकंटकांनी ते फलक फाडून भगव्या ध्वजांना क्षतिग्रस्त केले. या संदर्भात हिंदुत्वनिष्ठांनी पोलिसांना संबंधितांवर कारवाई करण्याविषयी निवेदन दिले.
‘वरील कृत्य हे देशद्रोह स्वरूपाचे असून हिंदु धर्माचा अपमान करणारे आहे, तसेच हे कृत्य गांभीर असून दोन समाजांत तेढ निर्माण करणारे आहे. या अयोग्य कृतीसाठी उत्तरदायी असणार्या समाजकंटकांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी’, या मागणीचे निवेदन शहरातील हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी ३० जुलै या दिवशी शहर पोलीस ठाणे आणि अवधूतवाडी पोलीस ठाणे येथे देण्यात आले. निवेदन देतांना विश्व हिंदु परिषदेचे अध्यक्ष श्री. मनोज औदार्य, भाजपचे युवा नेते श्री. सूरज गुप्ता, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सर्वश्री सागर लुटे, अजिंक्य शिंदे, अक्षय शहाडे, आयुष सोनार, स्वप्नील उलंगवार उपस्थित होते.