श्री गणेशमूर्तीचे विडंबन नकोच !

सप्‍टेंबरमध्‍ये गणेशोत्‍सव चालू होणार…! त्‍याची लगबग काही मास आधीच चालू होते. ठिकठिकाणी सिद्ध केल्‍या जाणार्‍या श्री गणेशमूर्ती गणेशभक्‍त आपापल्‍या घरी किंवा जेथे गणेशोत्‍सव साजरा केला जातो, त्‍या ठिकाणी घेऊन जातात. मध्‍यंतरी एका रेल्‍वेगाडीतून २-३ हिंदु तरुण श्री गणेशाची मूर्ती घेऊन कोकणात जात होते. मूर्ती साहजिकच मोठी असल्‍याने २ आसनांवर मिळून त्‍यांनी तेथे २ मूर्ती ठेवल्‍या होत्‍या. काही वेळ ते उभे राहिले आणि नंतर मूर्तीच्‍या समोरील आसनावर येऊन बसले. थोड्या वेळाने ते मूर्ती ठेवलेल्‍या आसनावर पाय पसरून बसले. गणेशोत्‍सवात ज्‍या श्री गणेशाची पूजा करायची, त्‍याच्‍याच मूर्तीसमोर पाय ठेवणे हे किती अयोग्‍य आहे ? रेल्‍वेतील जागरूक हिंदूंनी त्‍या तरुणांना याची जाणीव करून दिल्‍यावर तरुणांनी काही वेळ पाय खाली ठेवले; पण पुन्‍हा ‘ये रे माझ्‍या मागल्‍या !’ नंतर त्‍यातील एकाने तर तंबाखू खाऊन त्‍याची पुडी मूर्तीच्‍या शेजारी खोचून ठेवली. याविषयीही जागरूक हिंदूंनी त्‍यांना खडसावले. त्‍यानंतर त्‍यांनी ती पुडी टाकली. एखाद्या व्‍यक्‍तीलाही आपण पाय लागल्‍यावर तिची क्षमा मागतो किंवा कोणत्‍याही प्रवाशाच्‍या शेजारी कुणीही तंबाखूची पुडी ठेवणार नाही; परंतु ही नैतिकताही समाजातून नष्‍ट होत आहे, हे यातून अधोरेखित झाले. श्री गणेशमूर्तीची अशा प्रकारे हिंदूंकडूनच उघड उघड विटंबना होणे, हे हिंदूंना धर्मशिक्षण नसल्‍याचेच द्योतक आहे.

श्री गणेशमूर्ती घेऊन जाणार्‍यांमध्‍ये आदरभाव नसला, तरी गाडीमध्‍ये असणार्‍या धर्मप्रेमी हिंदूंमध्‍ये मात्र नक्‍कीच भाव होता. या धर्मप्रेमींकडून ‘प्रवासात आपल्‍यासमवेत गणपति आहे. त्‍यामुळे प्रवास निर्विघ्‍न होणार’, असे मनोमन वाटून कृतज्ञता व्‍यक्‍त करत त्‍याला प्रार्थनाही करत होते. अशा धर्मप्रेमी हिंदूंमुळेच सध्‍या धर्म टिकून आहे. गणेशोत्‍सव हा श्री गणेशाची कृपा आणि आशीर्वाद संपादन करण्‍यासाठी आहे, याची जाणीव ठेवून कोणत्‍याही प्रकारे श्री गणेशाचे विडंबन होणार नाही, याकडे हिंदूंनी लक्ष द्यायला हवे. श्री गणेशमूर्तीचे विडंबन म्‍हणजे साक्षात् श्री गणेशाचेच विडंबन आहे. हिंदूंची धर्माविषयीची निद्रिस्‍तता दूर करण्‍यासाठी सतर्क हिंदूंनी प्रयत्न करून श्री गणेशाची कृपा होण्‍यासाठी केलेले प्रयत्न श्री गणेशाला आवडणार आहेत. प्रवासातील घटना हे एक प्रातिनिधिक उदाहरण आहे; परंतु कमी अधिक प्रमाणात हिंदूंकडूनच देवतांची विटंबना होण्‍याचे प्रमाण वाढत आहे. हे थांबवण्‍यासाठी हिंदूंनी संघटितपणे प्रयत्न करणे काळाची आवश्‍यकता आहे !

– सौ. नम्रता दिवेकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.