मालदीवमध्ये आतंकवादी संघटनांना साहाय्य करणार्‍या २९ आस्थापनांवर अमेरिकेने लादला प्रतिबंध !

अमेरिकेचे परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर

वाशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेने इस्लामिक स्टेट आणि अल्-कायदा यांसारख्या जिहादी आतंकवादी संघटनांना मालदीवमध्ये साहाय्य करणार्‍यांच्या विरोधात मोठी कारवाई केली आहे. यांतर्गत आतंकवादी संघटनांना आर्थिक साहाय्य करणार्‍या २० व्यक्ती आणि २९ आस्थापने यांच्यावर बंदी घालण्यात आली आहे.

अमेरिकेचे परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर यांनी ३१ जुलै या दिवशी सांगितले की, ज्या लोकांवर प्रतिबंध लादण्यात आला आहे, ते पत्रकार आणि स्थानिक प्रशासकीय अधिकारी यांच्यावर आक्रमण करण्याची योजना आखत होते. मालदीवमध्ये आतंकवादी आक्रमण करण्यासाठी आर्थिक आणि अन्य स्तरांवर साहाय्य करणार्‍यांच्या विरोधात अमेरिका कारवाई करत राहील. प्रतिबंधित व्यक्तींमध्ये महंमद अमीन याचे नावही असून त्याच्यावर मुसलमानांना ‘इस्लामिक स्टेट-खुरासान’मध्ये भर्ती करण्याचा आरोप आहे. अमेरिकेने अमीनला वर्ष २०१९ मध्ये आतंकवादी घोषित केले होते. आजचे इराण, अफगाणिस्तान, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान, उझबेकिस्तान आणि उत्तर अफगाणिस्तान या देशांच्या भूभागाला ‘खुरासान’ म्हटले जाते.