२.७.२०२३ या दिवशी रात्री ११.१५ वाजता कराड (जिल्हा सातारा) येथील मिलिंद वडणगेकर यांचे निधन झाले. १.८.२०२३ या दिवशी त्यांचे पहिले मासिक श्राद्ध आहे. त्यानिमित्त त्यांच्या मुलाला त्यांच्या निधनापूर्वी आणि निधनानंतर जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.
१. मिलिंद वडणगेकर यांनी केलेल्या सेवा
‘वर्ष १९९७ पासून बाबा (मिलिंद वडणगेकर) सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करत होते. ते ‘सनातन पंचांग, दैनिक ‘सनातन प्रभात’च्या संदर्भातील सेवा आणि विज्ञापने आणणे’ इत्यादी सेवा करत होते.
२. शेवटचे आजारपण
२ अ. छातीत वेदना होणे, ‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊली’, असा धावा केल्यावर वेदना न्यून होणे आणि त्याच रात्री त्यांनी सनातन संस्थेला ‘ऑनलाईन’ पैसे अर्पण करणे : ९.३.२०२३ या दिवशी रात्री बाबांच्या छातीत पुष्कळ दुखत होते. ते संपूर्ण रात्र बसून ‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊली’, असा धावा करत होते. ‘या कालावधीत त्यांच्या वेदना न्यून झाल्या’, असे त्यांना जाणवले. त्या रात्रीच बाबांनी सनातन संस्थेला ‘ऑनलाईन’ पैसे अर्पण केले.
२ आ. ‘अँजिओप्लास्टी’ झाल्यावर ८ दिवसांनी सेवा पुन्हा चालू करणे : त्या रात्री त्यांनी मला सांगितले, ‘‘जर मी यातून बरा झालो, तर आणखी झोकून देऊन साधना करणार आहे.’’ त्याच मासात त्यांची ‘अँजिओप्लास्टी (टीप)’ करण्यात आली. आणि ८ दिवसांच्या विश्रांतीनंतर बाबांनी सेवा पुन्हा चालू केली.
टीप : अँजिओप्लास्टी – हृदयाच्या रक्तवाहिन्यांमधील अडथळा दूर करण्यासाठी केले जाणारे एक प्रकारचे शस्त्रकर्म
२ इ. ते आईला सांगत असत, ‘‘तू अधिकाधिक वेळ सेवा कर. मी घरी नातेवाइकांकडे लक्ष देतो. तू काळजी करू नकोस.’’
२ ई. रुग्णालयात भरती होईपर्यंत अखंड सेवा चालू असणे : २९.६.२०२३ या दिवशी आम्ही बाबांच्या तपासणीसाठी अकस्मात् कराड येथील कृष्णा रुग्णालयात गेलो असतांना आधुनिक वैद्यांनी बाबांना भरती होण्यास सांगितले. बाबांनी त्या दिवशी दुपारपर्यंतची सेवा परिपूर्ण करून ठेवली होती. ‘कृष्णा रुग्णालयातून पुढील उपचारांसाठी पुण्याला जायचे आहे’, हे कळल्यावर बाबांनी माझी पत्नी सौ. चैत्राली हिला सेवेविषयीची सर्व माहिती दिली आणि ती माहिती उत्तरदायी साधकाला सांगण्यास सांगितले.
२ उ. रुग्णवाहिकेत बसण्यापूर्वी कुटुंबियांची क्षमा मागणे : रुग्णवाहिकेत बसण्यापूर्वी बाबांनी आईची, माझी आणि माझी पत्नी चैत्राली यांची क्षमा मागितली. त्या वेळी ते आईला म्हणाले, ‘‘मी तुला कळत-नकळत काही बोललो असेल, तर मला क्षमा कर, तसेच कुणी घरी येतील-जातील, त्यांनाही सांग, ‘मी जर त्यांना दुखावले असेल, तर मला क्षमा करा.’’
२ ऊ. मुलाकडून साधना करण्याची शाश्वती घेणे : रुग्णवाहिकेतून पुण्याला जात असतांना बाबा मला म्हणाले, ‘‘शुभम्, काहीही झाले, तरी सनातन संस्थेने सांगितलेली साधना सोडायची नाही. जर मी यातून बरा झालो, तर आणखी जोमाने साधना करीन.’’
३. २.७.२०२३ या दिवशी रात्री ११.१५ वाजता बाबांचे निधन झाले.
४. निधनानंतर जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती
अ. समाजातील लोकांनाही ‘बाबांच्या मृतदेहातून चैतन्य येत आहे’, असे जाणवत होते आणि पिवळा प्रकाश दिसत होता.
आ. अंत्यविधी करणारे गुरुजी म्हणाले, ‘‘हा पुण्यात्मा असणार आहे. सामान्यतः इतके दिवस रुग्णालयात असल्यास शरीर पुष्कळ काळे पडते; पण यांच्या संदर्भात असे काही झालेले नाही.’’
इ. घरी भेटण्यासाठी आलेल्या व्यक्तींनी सांगितले, ‘‘आम्ही मृत व्यक्तीच्या घरी भेटायला आलो आहोत’, असे आम्हाला वाटत नाही; कारण घरात दाब जाणवत नसून सगळीकडे चैतन्य जाणवत आहे.’’
ई. बाबांच्या निधनानंतर १० दिवस लावलेल्या दिव्याच्या खाली कमळाचा आकार तयार झाला होता.’
– श्री. शुभम् वडणगेकर (कै. वडणगेकर यांचा मुलगा), कराड, सातारा. (११.७.२०२३)
रुग्णालयात जातांना ‘रामरूपातील गुरुमाऊली यजमानांच्या सभोवती पिवळा बाण फिरवून त्यांच्याभोवती संरक्षककवच निर्माण करत आहेत’, असे जाणवणे, यमदेवाचा चेहरा समोर दिसणे आणि यजमानांचे निधन झाल्याचे समजणे
‘मला रुग्णालयात अकस्मात् बोलावले असतांना मी गाडीतून जातांना ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’, हा नामजप करत होते. त्या वेळी ‘रामरूपातील गुरुमाऊली (परात्पर गुरु डॉ. आठवले) यजमानांच्या सभोवती पिवळा बाण फिरवत आहेत’, असे मला दिसले. ‘त्या बाणांनी यजमानांच्या भोवती संरक्षककवच निर्माण झाले आहे’, असे मला जाणवले. गुरुदेवांनी मला मोठे गडद कुंकू लावले. त्या वेळी माझ्या डोळ्यांसमोर अकस्मात् यमदेवाचा चेहरा आला अन् माझा नामजप थांबला. तोपर्यंत आम्ही रुग्णालयाजवळ पोचलो होतो. त्या वेळी यजमानांचे निधन झाल्याचे मला समजले.’
– श्रीमती उज्ज्वला वडणगेकर (कै. वडणगेकर यांच्या पत्नी), कराड, सातारा. (११.७.२०२३)