ज्ञानवापी ही ऐतिहासिक चूक, हे मुसलमानांनी स्वीकारावे !

  • उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची स्पष्टोक्ती !

  • ज्ञानवापीमध्ये त्रिशूळ कसे ?, असाही विचारला प्रश्‍न !

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – ज्ञानवापीच्या आत देवतांच्या मूर्ती आहेत. आम्ही या मूर्ती ठेवल्या नाहीत. जर ज्ञानवापीला ‘मशीद’ म्हटले, तर वाद होईल. ही ऐतिहासिक चूक झाली आहे. ज्याला देवाने दृष्टी दिली आहे, त्याला ‘मशिदीच्या आत त्रिशूळ का आहे ?’, ते पाहू द्या. आम्ही ते ठेवलेले नाही, असे विधान उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ‘ए.एन्.आय.’ या वृत्तसंस्थेला मुलाखत देतांना केले. योगी आदित्यनाथ यांनी प्रथमच ज्ञानवापीविषयी अशा प्रकारचे थेट विधान केले आहे.

मुसलमानांकडून प्रस्ताव आला पाहिजे !

योगी आदित्यनाथ यांनी म्हटले की, ज्ञानवापीमध्ये ज्योतिर्लिंग आहे. देवतांच्या मूर्ती आहेत. संपूर्ण भिंती काय ओरडून सांगत आहेत ? मला वाटते की, मुसलमान समाजाकडून प्रस्ताव यायला हवा की, ही एक ऐतिहासिक चूक झाली आहे. आम्हाला त्या चुकीवर उपाय हवा आहे.

देशाला बंगाल बनवायचे आहे का ?

योगी आदित्यनाथ यांनी बंगालमध्ये पंचायत निवडणुकीच्या वेळी झालेल्या हिंसाचारावरूनही टीका केली. ते म्हणाले की, मी गेली साडेसहा वर्षे उत्तरप्रदेशचा मुख्यमंत्री आहे. वर्ष २०१७ पासून उत्तरप्रदेशात एकही दंगल झालेली नाही. जे लोक मोठमोठी वक्तव्ये करतात, ते बघू शकतात की, उत्तरप्रदेशात निवडणुका कशा होणार आहेत. बंगालमध्येही निवडणुका झाल्या. तिथे काय झाले, ते तुम्ही बघितले का ? देशाला बंगाल बनवायचे आहे का ? काही लोकांना सत्तेत येऊन संपूर्ण यंत्रणा बलपूर्वक स्वतःच्या कह्यात ठेवायची आहे. बंगालमध्ये विरोधी पक्षांच्या लोकांना मारले गेले. त्यावर कुणीच बोलत नाही. जे लोक लोकशाहीची हत्या करण्याचा प्रयत्न करत आहेत, तेच लोकशाहीचे गुणगान करत आहेत. काश्मीमध्ये वर्ष १९९० मध्ये जे घडले त्यावर सगळेच गप्प आहेत. हा दुटप्पीपणा का ?

तुमचा धर्म तुमच्या मशिदीपर्यंतच असेल, रस्त्यावर नाही !

दुसर्‍या एका प्रश्‍नाला उत्तर देतांना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, देश मत आणि धर्म यांद्वारे नव्हे, तर राज्यघटनेद्वारे चालवला जाईल. तुमचे मत, तुमचा धर्म तुमच्या पद्धतीने असेल, तुमच्या घरात असेल. तुमच्या मशिदीपर्यंत, तुमच्या प्रार्थनास्थळापर्यंत असेल. रस्त्यावर प्रदर्शन करण्यासाठी आवश्यकता नाही. ‘तुम्ही कोण आहात’, हे तुम्ही इतरांवर लादू शकत नाही. देश सर्वप्रथम आहे. कुणाला देशात रहायचे असेल, तर स्वत:चे मत, धर्म नव्हे, तर राष्ट्र हे सर्वांत वर आहे, हे मानले पाहिजे.