श्रीलंकेने तमिळांच्या प्रश्‍नांवर बोलावली सर्वपक्षीय बैठक !

कोलंबो (श्रीलंका) – श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांनी देशातील अल्पसंख्य तमिळांच्या समस्येवर चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक आयोजित केली आहे. त्यांनी सर्व पक्षांना या संदर्भातील चर्चेत सहभागी होऊन यावर एकमत निर्माण करण्याचे आवाहन केले आहे. काही दिवसांपूर्वी भारताच्या दौर्‍यावर येऊन गेलेले राष्ट्रपती विक्रमसिंघे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी श्रीलंकेत रहाणार्‍या तमिळांसमवेतचे संबंध सुधारण्याविषयी चर्चा केली होती.

याविषयी बोलतांना श्रीलंकेतील विरोधी पक्षनेते साजिथ प्रेमदासा म्हणाले की, आम्हाला या बैठकीच्या कार्यसूचीविषयी माहिती देण्यात आलेली नाही; मात्र आम्ही लोकांसाठी यात सहभागी होणार आहोत. जर ही बैठक प्रत्यक्ष प्रयत्न करण्याऐवजी केवळ राजकीय नाटक ठरली, तर आम्ही यातून बाहेर पडू. काही राजकीय पक्षांनी मात्र या बैठकीत सहभागी होण्यास नकार दिला आहे.