इंद्रायणी नदीच्‍या प्रदूषणामुळे वारकर्‍यांच्‍या आरोग्‍याला धोका ! – दिलीप मोहिते पाटील, आमदार, राष्ट्रवादीकाँग्रेस

प्रतिकात्मक चित्र

मुंबई, २६ जुलै (वार्ता.) –आळंदी तीर्थक्षेत्रातील इंद्रायणी नदीमध्‍ये पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून प्रक्रिया न करता सांडपाणी सोडले जात आहे. आळंदी येथे येणार्‍या लाखो वारकर्‍यांना हे दूषित पाणी प्‍यावे लागते. इंद्रायणी नदीच्‍या तिरावरील आळंदी, पिंपळी, मूळी आदी गावांतील ग्रामस्‍थांनाही दूषित पाणी पुरवले जात आहे. इंद्रायणी नदीच्‍या प्रदूषणामुळे वारकर्‍यांच्‍या आरोग्‍याला धोका निर्माण झाला आहे, अशी समस्‍या आळंदी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी २६ जुलै या दिवशी औचित्‍याच्‍या सूत्राच्‍या अंतर्गत विधानसभेत मांडली. महाराष्‍ट्र सरकारने ‘नमामि गंगा’ या अभियानाप्रमाणे ‘नमामि इंद्रायणी’ हे अभियान सरकारने घोषित केले आहे. त्‍यावर तातडीने कार्यवाही करणे आवश्‍यक आहे, अशी मागणी या वेळी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी केली.