चीनचे परराष्ट्र मंत्री गेल्या १ मासापासून बेपत्ता !

बीजिंग – मागील १ मासापासून चीनचे परराष्ट्र मंत्री किन गैंग हे बेपत्ता आहेत. गैंग हे चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचे विश्‍वासू म्हणून ओळखले जातात. याविषयी चीनच्या परराष्ट्र मंत्रालयानेही स्पष्टीकरण दिलेले नाही. यामुळे चर्चांना उधाण आले आहे. काही जणांच्या मते ५७ वर्षीय गैंग यांचे एका वृत्तवाहिनीच्या महिला सूत्रसंचालिकेशी प्रेमप्रकरण चालू होते. हे प्रकरण त्यांना महागात पडले. अन्य लोकांचे म्हणणे आहे की, गैंग यांच्या आक्रमक परराष्ट्र धोरणांमुळे त्यांची लोकप्रियता वाढत होती. यामुळे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांना ते ‘शत्रू’ वाटत होते. यामुळेच ते ‘बेपत्ता’ झाले आहेत. मागील १ मासापासून गैंग हे कुठल्याही सार्वजनिक कार्यक्रमात दिसले नाहीत.

अमेरिकेत हेरगिरी करणारे फुगे सोडण्यात आले होते. त्यानंतर चीन आणि अमेरिका यांच्यातील संबंध ताणले होते. त्या वेळी गैंग यांनी आक्रमक भूमिका घेत अमेरिकेला फटकारले होते.