गुरुवर्य पू. संभाजी भिडेगुरुजी यांना सतत विशेष सुरक्षाव्यवस्था द्यावी !

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान लांजाच्या वतीने प्रशासनाला निवेदन

लांजा येथील तहसीलदार प्रमोद कदम यांना निवेदन देतांना श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी

लांजा, २४ जुलै (वार्ता.) –  १६ जुलै २०२३ या दिवशी घाटकोपर (मुंबई) येथे गुरुवर्य पू. संभाजी भिडेगुरुजी यांची सभा होती. ते कार्यक्रम स्थळी पोचताच ४ समाजकंटक त्यांच्या गाडीच्या आडवे आले आणि त्यांनी गाडी रोखण्याचा प्रयत्न करून घोषणाबाजी केली. केवळ वैयक्तिक द्वेषापोटी समाजा-समाजात तेढ निर्माण होईल, असे वातावरण जाणीवपूर्वक निर्माण केले जात असल्यामुळे शांतता अन् सुव्यवस्था यांना बाधा पोचण्याची शक्यता लक्षात घेऊन समाजकंटकांकडून अनुचित कृत्य घडू नये, या कारणास्तव आदरणीय पू. संभाजी भिडेगुरुजी यांना राज्यात आणि महाराष्ट्राबाहेरही विशेष सुरक्षाव्यवस्था द्यावी, अशी विनंती येथील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने निवेदनाद्वारे प्रशासनाकडे करण्यात आली. २४ जुलै या दिवशी येथील तहसीलदार प्रमोद कदम यांना हे निवेदन देण्यात आले. या वेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी  आणि सकल हिंदु समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रशासनाला दिलेल्या या निवेदनात म्हटले आहे की, ४ समाजकंटकांना अटक करून पोलिसांनी कार्यतत्परता दाखवली, याविषयी पोलिसांचे अभिनंदन ! हिंदुत्वनिष्ठ विचार म्हणजे जातीयवादी विचार मानणार्‍या अनेक व्यक्ती, संघटना आदरणीय गुरुजींना वेळोवेळी अकारण विरोध करत असतात. गुरुजींचे विचार पूर्णपणे जाणून न घेता त्यांच्या विचारांवर त्वरित विरोधी मतप्रदर्शन करत असतात. नुकताच घडलेला प्रसंगही अशाच प्रकारचा होता. असे काही कृत्य करून समाजात जातीय तेढ निर्माण करण्याचा तो एक प्रयत्न होता. हे प्रसंग घडवून कुणीतरी स्वत:ची राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न तर करत नाही ना ? अशी शंका येते.

  • हिंदु सकल समाजाची निवेदनाद्वारे प्रशासनाकडे मागणी

  • मणीपूर आणि देशभरामध्ये महिलांवर होणार्‍या अत्याचारांच्या विरोधात ठोस कारवाई करा !  

गेल्या अनेक दिवसांपासून देशभरामध्ये महिलांवर विविध प्रकारचे अत्याचार होत आहेत. या अत्याचारांमध्ये बंगालमधील पंचायतीच्या निवडणुकीच्या वेळी एका महिला उमेदवाराला विवस्त्र करून तिची धिंड काढण्यात आली. बंगालमध्येच चोरी करणार्‍या २ महिलांना विवस्त्र करून मारहाण करण्यात आली. मणीपूर येथील चुराचंद्रपूर या भागात २ महिलांना विवस्त्र करून धिंड काढण्यात आली. या सर्व घटनांचा आम्ही तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करत आहोत. यापुढे देशभरातील सर्व राज्यांमध्ये अत्यंत कठोर नियम, कायदे करून महिलांच्या जीविताचे आणि त्यांच्या अब्रूचे रक्षण करावे, ही नम्र विनंती. तसेच या सर्व घटनांमध्ये जे कायदेशीर दोषी आहेत, त्यांच्यावर तातडीने कडक कारवाई करावी. आणि भविष्यात अशा घटना घडणार नाहीत, यासाठी सर्वतोपरी यंत्रणा कार्यरत ठेवावी, असे निवेदन येथील हिंदु सकल समाजाच्या वतीने तहसीलदार प्रमोद कदम यांना देण्यात आले.