हिंदु जनजागृती समितीचे महाराष्‍ट्र आणि छत्तीसगड राज्‍य संघटक श्री. सुनील घनवट यांच्‍या समवेत केलेल्‍या मुंबई जिल्‍ह्याच्‍या दौर्‍याच्‍या वेळी शिकायला मिळालेली सूत्रे अन् आलेल्‍या अनुभूती

‘१९ ते २४.१०.२०२१ या कालावधीमध्‍ये महाराष्‍ट्र आणि छत्तीसगड राज्‍य संघटक श्री. सुनील घनवट यांचा मुंबई जिल्‍ह्यात ‘संपर्क अभियान’ दौरा झाला. त्‍या वेळी मी श्री. घनवट यांच्‍या समवेत होतो. तेव्‍हा मला शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्‍या अनुभूती पुढे दिल्‍या आहेत.

श्री. सुनील घनवट

१. श्री महालक्ष्मीमातेचे दर्शन घेतांना ‘ती समोर उभी असून ‘संपर्क अभियाना’साठी वात्‍सल्‍यभावाने आशीर्वाद देत आहेे’, असे जाणवणे

१९.१०.२०२१ या दिवशी आम्‍हाला श्री महालक्ष्मी मंदिराच्‍या मुख्‍य विश्‍वस्‍तांना भेटायचे होते. त्‍यांची भेट झाल्‍यानंतर आम्‍ही श्री महालक्ष्मीमातेचे भावपूर्ण दर्शन घेतले. तेव्‍हा मला जाणवले, ‘श्री महालक्ष्मीमाता प्रत्‍यक्ष आमच्‍या समोर उभी आहे आणि ती ‘संपर्क अभियाना’साठी आम्‍हाला आशीर्वाद देत आहे. तिच्‍या तोंडवळ्‍यावरचे भाव एखाद्या आईप्रमाणे असून ती वात्‍सल्‍यभावाने आमच्‍याकडे पहात आहे.’ तिच्‍या दर्शनाने उपस्‍थित सर्व साधकांची भावजागृती झाली.

श्री. बळवंत पाठक

२. हिंदी पाक्षिक ‘सनातन प्रभात’चे वाचक आणि उद्योगपती श्री. मनोज घोलानी यांचा भाव !

२ अ. ‘श्री. सुनील घनवट भेटायला येणार आहेत’, याची पुष्‍कळ उत्‍कंठा असणे : श्री महालक्ष्मीमातेच्‍या दर्शनानंतर आम्‍ही उद्योगपती श्री. मनोज घोलानी यांना भेटण्‍यासाठी गेलो होतो. ‘श्री. सुनील घनवट भेटण्‍यासाठी येणार आहेत’, याचा त्‍यांना विलक्षण आनंद झाला होता. त्‍यांच्‍या मनात उत्‍कंठा होती. इतर वेळी कुणाकडे भेटायला जायचे असल्‍यास निघण्‍यापूर्वी ‘ते भेटणार आहेत ना ?’, याची आम्‍हाला निश्‍चिती करावी लागते; मात्र श्री. मनोज घोलानी यांनीच ‘श्री. सुनील घनवट येणार आहेत ना ?’, याची आम्‍हाला विचारून निश्‍चिती केली होती.

२ आ. श्री. घोलानी यांनी परात्‍पर गुरु डॉक्‍टरांना कधी पाहिले नसूनही केवळ ‘सनातन प्रभात’ वाचून त्‍यांच्‍या मनात भाव निर्माण होणे आणि त्‍यांनी श्री. घनवट यांच्‍या आगमनाची भावपूर्ण सिद्धता करणे : श्री. मनोज घोलानी हिंदी पाक्षिक ‘सनातन प्रभात’चे वाचक आहेत. प्रत्‍यक्षात त्‍यांनी परात्‍पर गुरुदेवांना कधी पाहिलेले नाही, तरीही केवळ ‘सनातन प्रभात’ वाचून ‘त्‍यांच्‍या मनात परात्‍पर गुरु डॉक्‍टरांप्रती पुष्‍कळ भाव निर्माण झाला आहे’, असे मला जाणवले. ‘श्री. सुनील घनवट येणार आहेत’, यासाठी त्‍यांनी भावपूर्ण सिद्धताही केली होती.

२ इ. श्री. घोलानी यांना ‘मी अर्पण दिलेली भांडी आश्रमात सेवा करतात’, याचे पुष्‍कळ समाधान वाटणे : श्री. मनोज घोलानी यांनी आश्रमासाठी काही भांडी अर्पण दिली आहेत. आमच्‍याशी बोलतांना त्‍यांनी त्‍यांच्‍या मनातील भाव व्‍यक्‍त केला. ते म्‍हणाले, ‘‘माझ्‍या कामाच्‍या व्‍यस्‍ततेमुळे मी आश्रमामध्‍ये येऊ शकत नाही; मात्र माझी भांडी (मी अर्पण दिलेली भांडी) आश्रमात सेवा करतात’, याचे मला समाधान वाटते.’’

३. श्री. ऋत्‍विक औरंगाबादकर यांच्‍या घरी गेल्‍यावर तेथील ‘श्री रेणुकामातेची मूर्ती जागृत असून ती हिंदु राष्‍ट्र-स्‍थापनेसाठी आशीर्वाद देत आहे’, असे जाणवणे

श्री. ऋत्‍विक औरंगाबादकर यांनी आम्‍हाला भेटीसाठी त्‍यांच्‍या घरी बोलावले होते. भेटीच्‍या वेळी त्‍यांनी त्‍यांच्‍या घरातील श्री रेणुकामातेची मूर्ती दाखवली. ‘श्री रेणुकामातेची मूर्ती जागृत असून तिच्‍यामध्‍ये देवीतत्त्व मोठ्या प्रमाणावर कार्यरत आहे’, असे मला जाणवले. आम्‍ही हिंदु राष्‍ट्र-स्‍थापनेसाठी तिला प्रार्थना केल्‍यावर ‘ती आशीर्वाद देत असून ‘तिच्‍या चैतन्‍याने ‘संपर्क अभियान’ निर्विघ्‍नपणे पार पडणार आहे’, असे मला जाणवले.

 ४. ‘संपर्क अभियाना’तील प्रत्‍येक संपर्क हा ईश्‍वरी नियोजनाप्रमाणे होत आहे’, असे जाणवणे 

आम्‍ही ‘या ‘संपर्क अभियाना’त कुणाकुणाला भेटायचे ?’, याचे नियोजन केले होते; मात्र प्रत्‍यक्षात ‘आमची ज्‍यांच्‍याशी भेट घडणे आवश्‍यक आहे’, अशाच मान्‍यवरांशी आमची भेट होत होती. एका उद्योगपतींच्‍या भेटीनंतर आम्‍ही एका आधुनिक वैद्यांना भेटण्‍याचे नियोजन केले होते; परंतु त्‍या उद्योगपतींच्‍या दुकानाच्‍या जवळच एका मंदिराच्‍या  विश्‍वस्‍तांचे कार्यालय आहे. अनेक दिवसांपासून त्‍यांचा संपर्क होत नव्‍हता; मात्र उद्योगपतींचा संपर्क पूर्ण होण्‍यापूर्वी त्‍या मंदिर विश्‍वस्‍तांचा संपर्क झाला आणि त्‍यांनी लगेच आम्‍हाला भेटण्‍यासाठी बोलावले. असे या दौर्‍यात २ – ३ प्रसंग घडले. तेव्‍हा ‘या संपर्क अभियाना’तील प्रत्‍येक संपर्क हा ईश्‍वरी नियोजनाप्रमाणे होत आहे’, असे मला जाणवले.

श्री. सुनील घनवट यांच्‍यासह आमच्‍या विविध लोकप्रतिनिधी, हिंदुत्‍वनिष्‍ठ, उद्योजक आणि अधिवक्‍ता यांच्‍या भेटीगाठी होत होत्‍या. सर्वांचा प्रतिसाद सकारात्‍मक आणि उत्‍साहवर्धक होता. ‘संतांचा संकल्‍प आणि त्‍यांचा आशीर्वाद’ यांमुळेच हे सर्व कार्य होत आहे’, असे मला जाणवले.’

– श्री. बळवंत पाठक, वडाळा, मुंबई. (२३.१०.२०२१)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक