मोपा, पेडणे येथे सनबर्न कार्यक्रम घेण्यास अनुज्ञप्ती देणार नाही ! – आमदार प्रवीण आर्लेकर, भाजप, गोवा 

पणजी, २२ जुलै (वार्ता.) – मोपा येथे सनबर्न कार्यक्रम घेण्याचा विचार असल्यास मी त्याला तीव्र विरोध करीन, असे वक्तव्य पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर यांनी २१ जुलै या दिवशी विधानसभेत केले. या अगोदर विधानसभेत ४ दिवसांचा सनबर्न कार्यक्रम घ्यावा कि नाही ? या सूत्रावर बरीच चर्चा झाली. त्या चर्चेत एका सदस्याने हा कार्यक्रम वागातोर ऐवजी ओल्ड गोवा किंवा मोपा येथे घ्यावा, अशी सूचना केली होती.

त्या वेळी पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर यांनी त्याला तीव्र विरोध केला. ते म्हणाले, ‘‘पेडणे तालुक्यात आम्हाला सनबर्न नको आहे.’’

याविषयी पर्यटनमंत्री रोहन खवंटे म्हणाले, ‘‘मोपा येथे सनबर्न कार्यक्रम घेण्याविषयी कुणीही विनंती केलेली नाही. या कार्यक्रमाला पर्यटन खात्याकडून अनुज्ञप्ती घ्यावी लागेल; परंतु अशा प्रकारच्या कार्यक्रमांमुळे पर्यटनाला चालना मिळते.’’ (पर्यटनाला चालना देतांना अमली पदार्थांच्या व्यवहारांना चालना मिळेल, असे कार्यक्रमही टाळले पाहिजेत. शासनाने चांगल्या मार्गाने महसूल मिळवण्याचा प्रयत्न केल्यास देवही त्यांना सहकार्य करील, यावर श्रद्धा ठेवावी ! – संपादक) सनबर्न संगीत रजनीच्या आयोजकांनी ‘आगामी डिसेंबर मासात ४ दिवस हा कार्यक्रम होणार आहे’, असे अलिकडेच घोषित केले आहे.

पोलिसांकडून पर्यटकांना त्रास दिला जातो, या विषयीच्या प्रश्नावर मंत्री रोहन खंवटे म्हणाले, ‘‘जेव्हा वाहतूक नियमांचा भंग करण्याचा प्रश्न येतो, तेव्हा पोलीस गोमंतकीय आणि परप्रांतीय असा भेदभाव करू शकत नाहीत. सर्वांना समान वागणूक दिली पाहिजे. पोलिसांनी वाहतूक नियमांचे पालन करणार्‍या वाहनांना अडवू नये.’’