दोन्ही बाजूंचा जमाव समोर आल्याने तणावाचे वातावरण !
इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) – इचलकरंजी शहरातील एका महाविद्यालयात २१ जुलैला मुसलमान विद्यार्थिनी हिजाब घालून महाविद्यालयात आल्या, तर मुसलमान विद्यार्थीही डोक्यावर गोल टोपी घालून महाविद्यालयात आले. याला प्रत्युत्तर देण्यासाठी हिंदू विद्यार्थीही भगवी पट्टी घालून महाविद्यालयात आले; मात्र शाळा प्रशासनाने दोन्ही बाजूच्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या बाहेर काढले. दोन्ही गटाच्या विद्यार्थ्यांना बाहेर काढल्यावर मुसलमान समर्थक मोठ्या प्रमाणात महाविद्यालयासमोर आले. हे कळताच हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्तेही तेथे आले. दोन्ही बाजूंनी घोषणाबाजी झाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी आले आणि सौम्य लाठीमार करून जमावास पांगवले.
कोल्हापूर शहरातील एका महाविद्यालयात भगवी पट्टी घालणार्या विद्यार्थ्यास वर्गाबाहेर काढल्याची घटना ताजी असतांनाच इचलकरंजी येथेही या प्रकाराची पुनरावृत्ती झाली. ‘जर मुसलमान विद्यार्थिनींचा बुरखा-हिजाब चालतो, तर हिंदु विद्यार्थ्यांनी गळ्यात घातलेली भगवी पट्टी का चालत नाही ? ’, असा प्रश्न विद्यार्थी आणि हिंदू संघटना यांनी उपस्थित केला आहे.