सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे घरे, पूल, रस्ते, डोंगर खचल्याने हानी 

दोडामार्ग तालुक्यात मुसळधार पाऊस; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

सिंधुदुर्ग – जिल्ह्यात गेले ३ दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने शेती, बागायती यांसह खासगी आणि शासकीय संपत्तीची हानी झाली आहे. काही ठिकाणी भूस्खलनाचा धोका लक्षात घेऊन ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे. वीजवाहिन्या तुटणे; रस्ते आणि पूल खचणे, डोंगर खचणे यांमुळे वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. जिल्ह्यातील बहुतांश धरणे तुडुंब भरली असून जिल्ह्यातील सर्वांत मोठे तिलारी धरण भरल्याने २२ जुलैपासून यातील अतिरिक्त पाणी सोडण्यात येत आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी झालेली हानी

१. खोक्रल – मांगेली धबधबा, खोक्रल धार – मांगेली कुसगेवाडी, देऊळवाडी या ठिकाणी रस्ता वाहून गेला आहे, तर काही ठिकाणी चिखल झाला आहे. काही ठिकाणी रस्त्यावर मोठे दगड आणि माती आल्याने रस्ते बंद झाले आहेत.

२. कणकवली – जानवली आणि गडनदीला पूर आल्याने लगतच्या भागांना पुराचा वेढा पडला. कणकवली-आचरा मार्गावर पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली.

३. सावंतवाडी – तालुक्यातील बांदा-दाणोली मार्गावर सपतनाथ देवस्थान नजिक मार्गावर चारचाकी मालवाहतुकीचे वाहन पाण्यात कलंडले. स्थानिकांच्या साहाय्याने ते बाहेर काढण्यात आले. २ दिवसांपूर्वी याच ठिकाणी अशीच घटना घडली होती. आंबोली घाटात दरड कोसळल्याने वाहतूक बंद झाली होती. दुपारनंतर दरड हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आली. आंबोली घाटातील धबधब्यावर पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असल्याने या वेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

४. कुडाळ – कुडाळ-नेरुरपार-मालवण या मुख्य रस्त्यावरील नेरुर जकातनाका ते नागदा मारुति मंदिर कलमेवाडी येथे असलेल्या ओढ्यावरील पुलाचा काही भाग अतिवृष्टीमुळे पूर्णपणे ढासळल्याने या मार्गावरील अवजड वाहतूक बंद करण्यात आली आहे. शहरातील आंबेडकर नगरानजीकच्या सार्वजनिक स्मशानभूमीत पुरामुळे अडकलेल्या व्यक्तीला येथील ग्रामस्थ, पोलीस, महसूल प्रशासन यांनी बाहेर काढले. तर नगरसेवक विलास कुडाळकर यांनी त्या व्यक्तीची अनथाश्रमात रहाण्याची व्यवस्था केली.

५. मालवण – तालुक्यातील पराड गावातील नदीकिनारी असलेला भाग मोठ्या प्रमाणात खचला आहे. त्यामुळे नदीकिनार्‍याच्या ५० फूट अंतरावर असलेल्या घरांना धोका निर्माण झाला आहे. ग्रामस्थांनी एक होडी बुडण्यापासून वाचवली.

जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनी केली तिलारी धरणाची पहाणी

तिलारी धरणाची पहाणी करतांना जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी आणि अन्य अधिकारी

दोडामार्ग – तालुक्यातील तिलारी धरण पूर्ण क्षमतेने भरले असून अतिरिक्त पाणी तिलारी नदीत सोडले जात आहे. या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या गावांना सतर्कतेची चेतावणी देण्यात आली आहे. २४ जुलैपर्यंत अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याने सर्वांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. तिलारी नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने परिसरातील नदी, नाले, ओहोळ परिसरातील नागरिकांना सतर्कतेची चेतावणी देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी आणि पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी तिलारी प्रकल्पाच्या अधिकार्‍यांसह धरण क्षेत्री जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला.

 

(सौजन्य : Sindhudurg 24 taas)

उपवडे येथे शाळेचे छप्पर, तर चाफेखोल येथे शाळेची इमारत कोसळली

कुडाळ तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा उपवडे या शाळेच्या एका वर्गाचे छप्पर कोसळले

मालवण – तालुक्यातील चाफेखोल येथील प्राथमिक शाळा चाफेखोल क्रमांक १ ची इमारत कोसळली. सुदैवाने शाळेला सुट्टी होती. कुडाळ तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा उपवडे या शाळेच्या एका वर्गाचे छप्पर कोसळले. या इमारतीच्या दुरुस्तीसाठी ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत स्तरावरून गेले वर्षभर प्रयत्न चालू होते. ‘मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर यांच्यासह संबंधित अधिकार्‍यांनी शाळेची पहाणी करून इमारतीची दुरुस्ती तातडीने करण्याचे आदेश दिले होते; मात्र पुढील प्रक्रियेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने ही घटना घडली’, असा आरोप ग्रामस्थांनी केला.