दरड प्रवण गावांवर लक्ष द्या ! – रत्नागिरी जिल्हाधिकारी एम्. देवेंदर सिंह

रत्नागिरी (जि.मा.का.) – दरड प्रवण गावांवर विशेषत: डोंगराच्या पायथ्याशी असणार्‍या गावांवर सर्व यंत्रणांनी समन्वयाने लक्ष द्या. ग्रामस्थांशी बोलून त्यांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करा, अशा सूचना जिल्हाधिकारी एम्. देवेंदर सिंह यांनी दिल्या. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची दूरदृश्यप्रणालीद्वारे जिल्हाधिकार्‍यांनी बैठक घेतली. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पूजार, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी उपस्थित होते. तालुकानिहाय आढावा घेवून जिल्हाधिकारी श्री. सिंह म्हणाले, ‘‘तलाठी, सरपंच, पोलीस पाटील यांच्या साहाय्याने दरड प्रवण गावांची माहिती घ्या. विशेषत: भविष्यात अपघात घडण्याची शक्यता आहे, अशा ठिकाणची वस्ती संवाद साधून स्थलांतरित करा त्यासाठी बैठक घ्या. पाण्यामध्ये असणार्‍या घरांविषयीही सतर्क राहून त्यांना तेथून हालवण्याचे नियोजन करा. नातेवाईक, समाजमंदिर, सभागृहांत त्यांची सोय करा.

शिवभोजनाच्या माध्यमातून त्यांना जेवणाची सुविधा द्या. अशा प्रत्येक गावांमध्ये तरुण मंडळांच्या सहाय्याने गावांमध्ये अधिकारी-कर्मचारी नियुक्त करून सेवा द्या. जिल्ह्यातील ग्रामीण भागांत असणारे लाकडी साकव, लोखंडी साकव याविषयीही सद्य:स्थिती पाहून त्यांचा अहवाल करा. कोणतीही दुर्घटना घडणार नाही, याविषयीही सर्वांनी समन्वयाने अधिक सतर्क रहा.’’