गोवा : ‘स्मार्ट सिटी’च्या कामांची सभागृह समितीच्या माध्यमातून अन्वेषण करण्याची विरोधकांची मागणी

पणजी शहरात ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पाच्या नावाने घिसाडघाईने चाललेली कामे !

पणजी, १९ जुलै (वार्ता.) – गोव्याची राजधानी पणजी शहरात ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पाच्या नावाने घिसाडघाईने कामे करण्यात आली आहेत. या कामांचे अन्वेषण करण्यासाठी सभागृह समिती नेमण्याची मागणी विरोधकांनी विधानसभेत केली.

(सौजन्य : Prudent Media Goa) 

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव म्हणाले, ‘‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पाचे काम करतांना जनतेचे कोट्यवधी रुपये पाण्यात गेले आहेत आणि याचे अन्वेषण करून दोषींवर कारवाई होण्यासाठी सभागृह समिती स्थापन करावी.’’

यावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, ‘‘या प्रकरणात काहीतरी चुकले आहे आणि ही चूक सुधारली जाणार आहे. मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी या प्रकरणी अन्वेषण करण्यास प्रारंभ केल्याचे म्हटले आहे. या प्रकरणी विविध खात्यांतर्गत समन्वयामध्ये सुसूत्रता आणणे आवश्यक आहे.’’ पणजीचे आमदार तथा मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी उत्तर देतांना स्मार्ट सिटी’ प्रकल्पाचे खापर ‘आय्.पी.एस्.सी.डी.एल्.’ या आस्थापनाचे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यावर फोडले. ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पाच्या प्रलंबित कामांविषयी मंत्री मोन्सेरात म्हणाले, ‘‘पुढील ६ मासांत सर्व प्रलंबित कामे पूर्ण होणार आहेत.’’