समष्‍टी साधनेच्‍या माध्‍यमातून साधकांमध्‍ये समष्‍टी गुणांची निर्मिती करून त्‍यांना घडवणारे परात्‍पर गुरु डॉ. आठवले !

सनातनचे १०२ वे संत पू. शिवाजी वटकर (वय ७६ वर्षे) यांचा साधनाप्रवास

‘पू.  शिवाजी वटकर यांना संतांचा लाभलेला अनमोल सहवास’, याविषयी आपण १८.७.२०२३ या दिवशी प्रसिद्ध झालेल्‍या भागात पाहिले. आजच्‍या भागात ‘परात्‍पर गुरु डॉक्‍टरांचे निवासस्‍थान असलेल्‍या मुंबई सेवाकेंद्रात केलेल्‍या सेवा आणि साधकांकडून समष्‍टी साधना करून घेऊन त्‍यांना घडवणारे परात्‍पर गुरु डॉ. आठवले’ यांविषयीची सूत्रे बघणार आहोत.                    

(भाग ५)

भाग ४ वाचण्यासाठी येथे क्लिक करा. https://sanatanprabhat.org/marathi/702473.html
पू. शिवाजी वटकर

१२. परात्‍पर गुरु डॉक्‍टरांचे निवासस्‍थान असलेल्‍या मुंबई सेवाकेंद्रात केलेल्‍या सेवा !

१२ अ. मुंबई सेवाकेंद्रात परात्‍पर गुरु डॉक्‍टरांचा प्रत्‍यक्ष सत्‍संग मिळून ते सांगतील, त्‍या सर्व सेवा करणे : ‘वर्ष १९९० ते १९९९ या काळात मी माझ्‍या कार्यालयातील कामकाज पूर्ण झाल्‍यानंतर सायंकाळी ७ ते रात्री ११ वाजेपर्यंत परात्‍पर गुरु डॉक्‍टरांचे निवासस्‍थान असलेल्‍या मुंबईतील सेवाकेंद्रात जात असे. तेथे मी ग्रंथांचे मुद्रितशोधन, साप्‍ताहिक ‘सनातन प्रभात’च्‍या संदर्भातील सेवा, मुंबई-ठाणे-रायगड या जिल्‍ह्यांतील प्रचाराच्‍या नियोजनाची सेवा किंवा परात्‍पर गुरु डॉक्‍टर सांगतील, त्‍या सर्व सेवा करत होतो. प्रतिदिन माझ्‍याकडे सेवेसाठी ४ घंटे वेळ असायचा. परात्‍पर गुरु डॉक्‍टर माझ्‍यासाठी १० घंट्यांची सेवा उपलब्‍ध करून ठेवायचे. तेथील सेवांमुळे मला परात्‍पर गुरु डॉक्‍टरांचा प्रत्‍यक्ष सत्‍संग मिळून त्‍यांच्‍याकडून शिकता आले.

१२ आ. परात्‍पर गुरु डॉक्‍टरांच्‍या लिखाणाचे वर्गीकरण करतांना पुष्‍कळ आनंद मिळणे : परात्‍पर गुरु डॉक्‍टर मला त्‍यांच्‍या लिखाणाची कात्रणे द्यायचे. त्‍या कात्रणांवर ‘भक्‍तीयोग’, ‘कर्मयोग’, ‘साधना’, आदी लिहिलेले असे. त्‍यानुसार त्‍यांचे वाचन करून मी वर्गीकरण करत असे. ही सेवा करतांना मला पुष्‍कळ आनंद मिळत असे. नंतर मी निवृत्त झाल्‍यावर काही आस्‍थापनांनी माझ्‍या अनुभवाचा लाभ घेण्‍यासाठी मला नोकरीसाठी बोलावले; मात्र सेवा करतांना मिळणार्‍या आनंदामुळे मला अशा नोकरीत रस राहिला नव्‍हता.

१२ इ. ग्रंथांचे मुद्रितशोधन करणे : मी मुंबई येथून ग्रंथ लिखाणाच्‍या काही प्रकरणांच्‍या प्रती घेऊन घरी जात असे आणि मला वेळ मिळेल, तसे त्‍यांचे मुद्रितशोधन करत असे.

१२ ई. प.पू. डॉक्‍टरांच्‍या प्रवचनांच्‍या नोंदीतून एक लेख बनवणे, तो वाचल्‍यावर प.पू. डॉक्‍टरांनी लेखातील चुका सांगणे आणि शरणागतभावाने त्‍यांची क्षमायाचना करून सुधारणा केल्‍यावर त्‍यांना तो लेख आवडणे : वर्ष १९९५ च्‍या गुरुपौर्णिमेनंतर प.पू. भक्‍तराज महाराज रुग्‍णाईत होते. त्‍यामुळे प.पू. डॉक्‍टर त्‍यांच्‍या समवेत गेले होते. मी त्‍यांच्‍या प्रवचनांच्‍या नोंदीतून एक लेख बनवला आणि त्‍याची प्रत त्‍यांच्‍याकडे पन्‍हाळा (जि. कोल्‍हापूर) येथे पाठवली. त्‍यांनी त्‍यामध्‍ये काही सुधारणा केल्‍या. त्‍या लिखाणात व्‍याकरण, शब्‍द आणि वाक्‍यरचना यांच्‍या पुष्‍कळ चुका होत्‍या. त्‍यावर प.पू. डॉक्‍टरांनी लिहिले होते, ‘पुष्‍कळ चुका आहेत. तुम्‍हाला एवढेही कसे येत नाही !’

तेव्‍हा ‘माझे लिखाण अशुद्ध असून मला काहीच येत नाही’, याची मला जाणीव झाली. मी शरणागतभावाने त्‍यांच्‍याकडे क्षमायाचना केली. त्‍यांनी सुचवल्‍यानुसार लेखात सुधारणा केल्‍या. त्‍यानंतर ते म्‍हणाले, ‘‘आता हा लेख पुष्‍कळ छान झाला आहे. याचा आपण ग्रंथ छापू. जिज्ञासू, तसेच प्रवचन किंवा सत्‍संग घेणारे साधक यांना प्रत्‍यक्ष साधना करण्‍यास याचा उपयोग होईल.’’ त्‍यानंतर ३०.७.१९९६ या दिवशी त्‍यांनी ‘अध्‍यात्‍माचे प्रास्‍ताविक विवेचन’ हा ग्रंथ प्रकाशित केला.

१२ उ. कार्यालयात जाण्‍या-येण्‍याच्‍या वेळेचा सेवेसाठी करून घेतलेला लाभ ! : वर्ष २००६ पर्यंत, म्‍हणजे मी निवृत्त होईपर्यंत मला नोकरी करत असतांनाच साधना आणि सेवा यांत सातत्‍य ठेवता आले. मला कार्यालयात जाण्‍या-येण्‍यासाठी ३ घंटे लागायचे. या प्रवासाच्‍या वेळी मला नामजप करणे, सेवेचा समन्‍वय करणे, ग्रंथांचे वाचन करणे, सत्‍संग किंवा अभ्‍यासवर्ग यांची सिद्धता करणे इत्‍यादी सेवा करता आल्‍या. कार्यालयात गेल्‍यानंतर मी माझी सर्व कर्तव्‍ये तत्‍परतेने पूर्ण करून राहिलेला वेळ साधना आणि सेवा यांसाठी देत असे. काही अर्पणदाते आणि धर्माभिमानी माझ्‍या संपर्कात होते. त्‍यांच्‍याकडून मी गुरुकार्यासाठी विज्ञापने आणि अर्पण घेत असे.

१३. साधकांकडून समष्‍टी साधना करून घेऊन त्‍यांना घडवणारे परात्‍पर गुरु डॉ. आठवले ! 

१३ अ. आरंभी परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी स्‍वतः सत्‍संग घेऊन शिकवणे आणि नंतर साधकांना समाजात जाऊन सत्‍संग घेण्‍यास प्रवृत्त करणे : आरंभी परात्‍पर गुरु डॉक्‍टर त्‍यांच्‍या मुंबई येथील निवासस्‍थानी आम्‍हा १० – १२ साधकांसाठी सत्‍संग घेऊ लागले. ६ मासांनंतर त्‍यांनी आम्‍हाला बाहेर समाजात जाऊन सत्‍संग घेण्‍याचे नियोजन करण्‍यास सांगितले. तेव्‍हा मला वाटले, ‘येथे परात्‍पर गुरु डॉक्‍टर सत्‍संग घेत असल्‍याने त्‍यांच्‍या आकर्षणाने १० – १२ जण येतात. आम्‍ही बाहेर सत्‍संग घेतल्‍यावर सत्‍संगाला कोण येणार ?’; मात्र त्‍यांचे आज्ञापालन म्‍हणून आम्‍ही प्रत्‍येक रविवारी दादर येथील एक साधक श्री. कुबल यांच्‍या माहीम येथील औद्योगिक वसाहतीतील गाळ्‍यामध्‍ये दुपारी १ ते ५ सत्‍संग आणि अभ्‍यासवर्ग घेण्‍यास आरंभ केला. त्‍यानंतर आम्‍ही माहीम येथे ‘सिटी ऑफ लॉस एंजल्‍स’ या महानगरपालिकेच्‍या इंग्रजी शाळेत सत्‍संग आणि अभ्‍यासवर्ग घेऊ लागलो. आश्‍चर्य म्‍हणजे परात्‍पर गुरु डॉक्‍टरांच्‍या संकल्‍पामुळे तेथे साधकांची उपस्‍थिती पुष्‍कळ वाढली. परात्‍पर गुरु डॉक्‍टर आवश्‍यकतेनुसार त्‍या सत्‍संगात येऊन मार्गदर्शन करत असत.

१३ आ. परात्‍पर गुरु डॉक्‍टरांच्‍या कृपेने प्रवचने आणि सत्‍संग घेता येऊन त्‍यांना उत्तम प्रतिसाद लाभणे : आरंभी परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी मला मुंबई, ठाणे आणि रायगड येथे साप्‍ताहिक सत्‍संग घेण्‍यास सांगितले. मी भगवद़्‍गीता, महाभारत किंवा इतर आध्‍यात्मिक ग्रंथ यांंचे वाचन केले नव्‍हते. प्रवचने, कीर्तने आदी ऐकली नव्‍हती किंवा पोथीपुराणांतील कथा वाचल्‍या आणि ऐकल्‍या नव्‍हत्‍या. माझ्‍यावर लहानपणापासून साधनेचे संस्‍कार झाले नव्‍हते. असे असतांना केवळ परात्‍पर गुरु डॉक्‍टरांच्‍या कृपेने मला प्रवचने आणि सत्‍संग घेता आले अन् त्‍यांना उत्तम प्रतिसादही मिळाला.

१३ इ. साधकांच्‍या सेवेतील चुका सांगणारे, तसेच सेवा चांगली झाल्‍यावर सत्‍संगात कौतुक करून प्रोत्‍साहन देणारे परात्‍पर गुरु डॉ. आठवले ! : सेवा केल्‍यानंतर ‘प्रत्‍येक वेळी मी कुठे न्‍यून पडलो ?’, याविषयी परात्‍पर गुरु डॉक्‍टर मला सांगायचे. त्‍याचप्रमाणे जी सेवा त्‍यांच्‍याच कृपेने झालेली असायची, तिचे कौतुक करून ते मला प्रोत्‍साहनही द्यायचे. ‘इतरांना शिकता यावे’, यासाठी ते सत्‍संग आणि अभ्‍यासवर्ग या ठिकाणी त्‍या सेवेविषयी सांगायचे. ‘चुका सांगणे आणि कौतुक करणे’, हे सर्व त्‍यांचे आशीर्वादात्‍मक अमृतवचनच आहे’, असे मला वाटायचे.

१३ ई. परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी साधकाच्‍या व्‍यष्‍टी प्रकृतीचे समष्‍टी प्रकृतीमध्‍ये रूपांतर करणे : लहानपणापासून माझी ‘एकलकोंडेपणाने रहाणे, मनमोकळेपणाने न बोलणे, मी भला आणि माझे काम भले’, अशी संकुचित, म्‍हणजे व्‍यष्‍टी प्रकृती होती. ‘परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी माझ्‍या व्‍यष्‍टी प्रकृतीचे समष्‍टी प्रकृतीमध्‍ये कधी रूपांतर करून घेतले’, हे मला कळलेच नाही. विशेष म्‍हणजे त्‍यांनी माझ्‍यात व्‍यापकत्‍व वाढवून समष्‍टी कार्य करवून घेत माझी आध्‍यात्मिक प्रगतीही करवून घेतली.

१३ उ. प.पू. भक्‍तराज महाराज यांनी परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांनी घडवलेल्‍या साधकांचे कौतुक करणे : मुंबई येथे मी प.पू. बाबांच्‍या समवेत असतांना त्‍यांचे भक्‍त मला विचारायचे, ‘‘तुम्‍हाला प.पू. बाबांनी अनुग्रह किंवा गुरुमंत्र दिला आहे का ?’’ तेव्‍हा मी त्‍यांना सांगायचो, ‘‘मी परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी सांगितलेला माझ्‍या ‘कुलदेवते’चा नामजप करतो.’’ असे असतांनाही ‘प.पू. बाबा मला एवढे जवळ का करतात ?’, याचे त्‍या भक्‍तांना आश्‍चर्य वाटायचे. काही वेळा प.पू. बाबा आमच्‍याकडे (परात्‍पर गुरु डॉक्‍टरांच्‍या शिष्‍यांकडे) बोट दाखवून त्‍यांच्‍या भक्‍तांना सांगायचे, ‘‘डॉक्‍टरांची मुले (शिष्‍य) लाखमोलाची आहेत ! त्‍यांच्‍यासारखी सेवा करायला शिका.’’ तेव्‍हा ‘परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी मला कसे घडवले ?’, याची जाणीव होऊन माझी भावजागृती व्‍हायची.

‘मी कसा होतो आणि परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी मला कसे घडवले ?’, याचा विचार केल्‍यावर ‘त्‍यांचे माझ्‍यावर अनंत कोटी ऋण आहेत. हे ऋण मी कणभरही फेडू शकत नाही’, याची मला पावलोपावली जाणीव होते.

(क्रमशः)

– (पू.) शिवाजी वटकर (सनातनचे १०२ वे संत), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२.५.२०२०)


भाग ६ वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/703058.html