कोल्‍हापूर येथील मंदिरांचे सुव्‍यवस्‍थापन आणि अन्‍य प्रश्न सांघिकपणे सोडवणार ! – मंदिर विश्वस्‍त, पुजारी यांच्‍या बैठकीत निर्धार

मंदिर विश्‍वस्‍त-पुजारी यांच्‍या बैठकीत मार्गदर्शन करतांना श्री. सुनील घनवट

कोल्‍हापूर – येथील विविध मंदिरांचे सुव्‍यवस्‍थापन होण्‍यासाठी प्रत्‍येक मासात मंदिरांची बैठक घेणे, यात नियोजनपूर्वक अन्‍य मंदिरांना संपर्क करून संघटन वाढवणे यांसह मंदिरात वस्‍त्रसंहिता लागू करण्‍यासाठी प्रयत्न करणे, याचसमवेत मंदिराचे विविध प्रश्न सोडवण्‍यासाठी सांघिकपणे प्रयत्न करणे, असा निर्धार मंदिरांच्‍या बैठकीत करण्‍यात आला. शाहूपुरी येथील राधाकृष्‍ण मंदिर येथे मंदिरांच्‍या विविध प्रश्नांसाठी, तसेच व्‍यापक संघटनासाठी हिंदु जनजागृती समितीच्‍या पुढाकाराने एक बैठक घेण्‍यात आली. त्‍या बैठकीत हा निर्धार करण्‍यात आला. या बैठकीसाठी २१ मंदिरांचे ३० विश्‍वस्‍त, पुजारी, पदाधिकारी उपस्‍थित होते.

प्रारंभी हिंदु जनजागृती समितीचे कोल्‍हापूर जिल्‍हा समन्‍वयक श्री. किरण दुसे यांनी बैठकीमागील उद्देश स्‍पष्‍ट केला. हिंदु जनजागृती समितीचे महाराष्‍ट्र आणि छत्तीसगड संघटक श्री. सुनील घनवट यांनी मंदिरांचे सरकारीकरण झाल्‍यावर होणारे दुष्‍परिणाम, तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिरात वस्‍त्रसंहितेच्‍या संदर्भात लावण्‍यात आलेला फलक आणि त्‍याला झालेला विरोध, यानंतर मंदिर महासंघाच्‍या वतीने राज्‍यभरात राबवण्‍यात आलेले वस्‍त्रसंहिता अभियान, याला मिळालेला प्रतिसाद, तसेच मंदिरांच्‍या विविध प्रश्नांविषयी माहिती दिली. या बैठकीत कोल्‍हापुरातील मंदिरांमध्‍येही वस्‍त्रसंहिता लागू करण्‍याविषयी चर्चा करण्‍यात आली. (वस्‍त्रसंहिता म्‍हणजे मंदिरात प्रवेश करतांना परिधान करायच्‍या कपड्यांच्‍या संदर्भातील नियमावली)

विविध मंदिर विश्वस्‍त, पुजारी आणि हिंदुत्‍वनिष्‍ठ यांनी व्‍यक्‍त केलेले मनोगत  

१. श्री. संतोष लाड – मंदिरांचे संघटन होण्‍यासाठी आमच्‍या भागात बैठकांचे आयोजन करू.

२. श्री. दीपक देसाई, जिल्‍हाप्रमुख, हिंदु एकता आंदोलन – शाळांमधून हिंदूंना धर्मशिक्षण दिले जात नाही, ते शिक्षण मंदिरांमधून दिले जावे.

३. श्री. सुभाष सुर्वे, उत्तरेश्वर महादेव मंदिर – मंदिरात प्रवेश करतांना शुचिर्भूत होऊन प्रवेश केला पाहिजे, तसेच मंदिरांवर होणार्‍या आघातांविषयी प्रत्‍येकाला माहिती मिळावी.

४. श्री. संतोष गोसावी – अन्‍य धर्मीय ज्‍याप्रमाणे त्‍यांच्‍या प्रार्थनेसाठी एकत्र येतात, त्‍याप्रमाणे आपणही आरतीसाठी एकत्र येणे आवश्‍यक आहे.

५. श्री. अक्षय पाच्‍छापुरे – हिंदूंंना धर्मशिक्षण देण्‍यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत.

६. श्री. हसमुखभाई शहा, विश्वस्‍त, हिंदु धर्म मंडळ – आपण सर्वांनी एकत्र येऊन एक दिशा ठरवली पाहिजे आणि त्‍यासाठी मंदिर विश्वस्‍तांनी संघटित झाले पाहिजे. ती दिशा आपल्‍याला या बैठकीतून मिळाली.

मंदिर विश्‍वस्‍त-पुजारी यांच्‍या बैठकीत मनोगत व्‍यक्‍त करतांना विविध मंदिरांचे विश्‍वस्‍त, पुजारी, प्रतिनिधी