कुणालाही पाठीशी न घालता वरिष्ठ पातळीवर चौकशी करून दोषींवर कारवाई करू ! – देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री

  • विधान परिषदेतून…

  • भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या आक्षेपार्ह प्रकरणाचे विधीमंडळात तीव्र पडसाद !

  • विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पेनड्राईव्ह सादर केला !

किरीट सोमय्या आणि देवेंद्र फडणवीस

मुंबई – भाजपचे माजी खासदार आणि नेते किरीट सोमय्या यांच्या कथित आक्षेपार्ह व्हिडिओ प्रकरणी ठाकरे गटाचे नेते तथा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांच्याकडे संबंधित आक्षेपार्ह व्हिडिओचा समावेश असणारा ‘पेनड्राईव्ह’ सुपुर्द केला. याविषयी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, या आक्षेपार्ह व्हिडिओ प्रकरणाच्या चौकशीअंती योग्य ती कारवाई केली जाईल. सरकारने या प्रकरणाची गंभीर नोंद घेतली आहे. या प्रकरणी कुणालाही पाठीशी न घालता वरिष्ठ पातळीवर सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई केली जाईल. अन्वेषण करण्यासाठी पोलिसांना महिलेची ओळख दिली जाईल. पोलीस कायद्याच्या चौकटीत राहून महिलेची ओळख पटवतील. अशा प्रकारचे कोणतेही प्रकरण दाबले किंवा लपवले जाणार नाही.

एका मराठी वृत्तवाहिनीने हा व्हिडिओ प्रसारित केल्यानंतर या प्रकरणाचे पडसाद विधान परिषदेत उमटले. याविषयी अंबादास दानवे यांनी विधान परिषद नियम २८९ अन्वये हा विषय उपस्थित केला.

ते म्हणाले की,

१. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर यांच्या महाराष्ट्रातील संस्कृतीला काही राजकारणी छेद देण्याचा प्रयत्न करत आहेत.

२. राज्यसभा, विधानपरिषद आणि महामंडळ अशा ठिकाणी विविध पदांचा प्रलोभने दाखवून, अंमलबजावणी संचानालय (ईडी), केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) यांसारख्या यंत्रणांची भीती दाखवून, तसेच काही महिला अधिकार्‍यांना धमकी देऊन त्यांची पिळवणूक आणि शोषण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या माध्यमातून काही लोकांना फसवणे आणि खंडणी गोळा करणे असे काम केले जात असल्याचे उघड झाले आहे.

३. पेनड्राईव्हमध्ये मराठी स्त्रियांविषयी अश्लील भाषेत संभाषण आहे. त्याचे योग्य ते अन्वेषण करावे. मराठी महिलांविषयी अशा शब्दांत संभाषण करणारे किरीट सोमय्या खर्‍या अर्थाने महाराष्ट्रद्रोही आहेत. जे राजकीय पक्ष नैतिकतेचे धडे देतात, त्याच पक्षाचा मोठा पदाधिकारी असलेल्या व्यक्तीने जे काही केले आहे, ते अतिशय धक्कादायक आहे.

४. या प्रकरणात गुन्हा करणारी व्यक्ती कोण आहे ? ती कोणत्या पक्षात आहे ? हा विषय महत्त्वाचा नाही. ही प्रवृत्ती महत्त्वाची आहे. यासाठी माझ्याकडे काही व्हिडीओ आले आहेत. काही माता-भगिनींनी अतिशय हिंमत करून हे व्हिडिओ माझ्यापर्यंत पोचवले आहेत. त्या भगिनींना मी सलाम करीन; कारण हे कृत्य करणार्‍या व्यक्तीला केंद्र सरकारची सुरक्षितता आहे. या सुरक्षिततेचा वापर महिलांकडून खंडणी मिळवण्यासाठी केला जातो कि काय ? अशी स्थिती आहे.

किरीट सोमय्या यांचे स्पष्टीकरण !

किरीट सोमय्या यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे प्रकरणाची सत्यता पडताळण्याची मागणी केली आहे. पत्रात म्हटले आहे की, मी अनेक महिलांवर अत्याचार केले, अनेक महिलांच्या तक्रारी आल्या आहेत आणि त्यांच्या अनेक व्हिडिओ क्लिप आहेत, असे दावे केले जात आहेत; मात्र माझ्याकडून कोणत्याही महिलेवर अत्याचार झालेला नाही. त्यामुळे अशा सर्व आरोपांची आपण चौकशी करावी. यासंदर्भातील सर्व व्हिडिओ क्लिपची सत्यता पडताळावी. त्याची चौकशीही करावी, अशी मी आपणास विनंती करतो.

डॉक्टर आणि महिला पोलीस अधिकारी यांच्याकडून आक्षेपार्ह व्हिडिओची माहिती घेऊ ! – नीलम गोर्‍हे, उपसभापती, विधान परिषद

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या आक्षेपार्ह व्हिडिओ प्रकरणात पीडित महिलेने अद्याप तक्रार प्रविष्ट केलेली नाही. त्यामुळे या प्रकरणाच्या अन्वेषणात काय निष्पन्न होणार ? विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिलेला पेनड्राईव्ह पहाणे ही मोठी कठीण परीक्षा आहे; पण महिला पोलीस अधिकारी आणि महिला डॉक्टर यांना पेनड्राईव्हमधील माहिती घेण्यास सांगून त्यांचे या प्रकरणी मत जाणून घेण्यात येईल, असे प्रतिपादन विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोर्‍हे यांनी १८ जुलै या दिवशी विधान परिषदेत केले.

नीलम गोर्‍हे म्हणाल्या की, जर ती महिला हे सर्व पहात असेल, तर त्यांनी सभागृहावर विश्वास ठेवायला हवा, तसेच वृत्त वाहिन्यांनी व्हिडिओ दाखवतांना थोडी काळजी घ्यावी. या प्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशी घोषित केली आहे. या प्रकरणातील माहिती गोपनीयरित्या पोलिसांना द्यावी, त्यातून पोलिसांना पीडित महिलेपर्यंत पोचण्यास साहाय्य होईल.