मुंबई, १७ जुलै (वार्ता.) – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पक्षातील काही आमदारांसह सरकारला पाठिंबा दिला. यामुळे पक्षात फूट पडून राष्ट्रवादी काँग्रेसचे संख्याबळ अल्प झाल्याचे सांगत विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी काँग्रेसने दावा केला; मात्र अजित पवार यांनी सरकारला पाठिंबा देऊन १५ दिवस होऊनही महाविकास आघाडीकडून विरोधी पक्षनेत्याची निवड झालेली नाही. त्यामुळे विरोधी पक्षनेत्याविनाच विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला प्रारंभ झाला.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्याचे चित्र दिसत असले, तरी मागील २ दिवस शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीगाठी चालू आहेत. विरोधी पक्षनेतेपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे ठेवण्यासाठी या भेटीगाठी नाही आहेत ना ? यातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून काँग्रेसला शह देण्यात येत नाही ना ? असे प्रश्न निर्माण होत आहे.