नेपाळमध्ये चीनने उभारलेल्या विद्युत् प्रकल्पांमध्ये निर्माण केलेली वीज भारत खरेदी करणार नाही !

चीनने पैसा गुंतवला असेल, तर ती वीज घेणार नाही’, असे भारताने स्पष्ट केले

काठमांडू – भारताने नेपाळशी १० सहस्र मेगावॅट वीज खरेदी करण्याचा करार केला आहे. ‘नेपाळमध्ये निर्माण होणारी वीज आम्ही विकत घेणार आहोत; पण तो प्रकल्प चीनने उभारला असेल किंवा चीनने त्यात पैसा गुंतवला असेल, तर ती वीज घेणार नाही’, असे भारताने स्पष्ट केले आहे. नेपाळमार्गे भारतीय बाजारपेठेत पोचण्याचा चीन अनेक दिवसांपासून प्रयत्न करत आहे. आता चीनमधून टोमॅटोची भारतीय बाजारपेठेत तस्करी होत आहे. श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्याप्रमाणे नेपाळमध्ये विविध प्रकल्प राबवून त्याला कर्जबाजारी करू पहाणार्‍या चीनला भारताने असा निर्णय घेऊन मोठा धक्का दिला आहे.

१. भारताने नेपाळमध्ये निर्माण होणार्‍या विजेची चौकशी चालू केली आहे. नेपाळ ज्या वीज प्रकल्पांमधून वीज निर्यात करू इच्छित आहे, त्यामध्ये चीनच्या गुंतवणुकीची काही भूमिका आहे का, याचा शोध भारत घेत आहे. नेपाळ सध्या भारताला ४५२ मेगावॅट वीज विकतो. नेपाळला आता आणखी १८ जलविद्युत् प्रकल्पांमधून वीजनिर्मिती करायची आहे. त्यांची एकूण क्षमता १ सहस्र मेगावॅट आहे. भारताने आता या सर्व ऊर्जा प्रकल्पांचे आर्थिक टाळेबंदीविषयीचे तपशील मागवले आहेत.

२. नेपाळी अधिकार्‍यांनी सांगितले की, भारत आता जलविद्युत प्रकल्पांची संपूर्ण चौकशी करू पहात आहे. अशा परिस्थितीत आता चीनने निर्माण केलेली वीज नेपाळ भारताला विकू शकणार नाही.