विरोधकांचा चहापानावर बहिष्कार !
मुंबई, १६ जुलै (वार्ता.) – राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडालेला आहे. गेल्या अधिवेशनात कांद्याला ३५० रुपये घोषित केले होते; परंतु शेतकर्याला एक रुपयाचेही अनुदान मिळालेले नाही. प्राथमिक अपेक्षा पूर्ण करण्यातच सरकार अपयशी ठरले आहे, तसेच शेतकर्यांच्या विरोधातील हे सरकार आहे. सर्व क्षेत्रांत अपयशी ठरलेल्या कलंकित सरकारसमवेत आम्ही चहापान करू शकत नाही. या चहापानावर विरोधी पक्षांनी बहिष्कार घातला आहे, असा घणाघात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी १६ जुलै या दिवशी विधानभवनात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केला.
Live | घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या चहापानाला जाण्यात स्वारस्य नाही: विरोधी पक्षनेते अंबादास दानवे https://t.co/8cZadsgfpY
— Max Maharashtra (@MaxMaharashtra) July 16, 2023
१७ जुलैपासून चालू होणार्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांची १६ जुलै या दिवशी बैठक पार पडली. त्यानंतर विधानभवनात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे एकनाथ खडसे, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, अशोक माने, भाई जगताप उपस्थित होते.
राज्यात लोकशाहीची हत्याच केली आहे !
अंबादास दानवे म्हणाले की, ठाकरे गट, शेकाप, सपा, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या सर्व पक्षांनी बैठक घेऊन घटनाबाह्य सरकारने आयोजित केलेल्या चहापानात स्वारस्य नसल्याचे कळवले आहे. विविध राजकीय पक्ष फोडून पक्षच पळवून नेण्याचे चालू असलेले राजकारण पहाता राज्यात लोकशाहीची हत्या केली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष फोडण्याचे पाप या सरकारला लागेल. जनतेचा जीव घेणारा मार्ग म्हणजे ‘समृद्धी महामार्गा’ची स्थिती निर्माण झाली आहे. नैसर्गिक संकटांमुळे राज्यात लाखो हेक्टर क्षेत्रावरच्या पिकांची हानी झाली असून शेतकरी त्रस्त झाला आहे. तरीही सरकारने शेतकर्यांना साहाय्य केलेले नाही. राज्यात कायदा-सुुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक खून घडले आहेत. माता-भगिनींवर अत्याचार झाले आहेत. सरकारपुरस्कृत जातीय दंगली घडल्या आहेत. सरकारच्या मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत.
महाराष्ट्रातील शेतकर्यांच्या आत्महत्या रोखण्यात सरकार अपयशी ठरले !
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे म्हणाले की, महाराष्ट्रातील शेतकर्यांच्या आत्महत्या रोखण्यात सरकार अपयशी ठरले आहे. आदिवासी क्षेत्रात मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. या सरकारच्या काळात शालेय पोषण आहार योजनेत अपव्यवहार झाला आहे. केवळ विकासकामे करण्याच्या घोषणा दिल्या जात असून विकासकामे ठप्प झाली आहेत. सत्ताधारी फोडाफोडीचे राजकारण करत असल्याने राज्याचा विकास कसा होणार ? ‘सरकार आपल्या दारी’ हा कार्यक्रम घेण्यासाठी लाखो रुपये व्यय करूनही या कार्यक्रमाचे फलित काहीच नाही.
राज्यातील बेपत्ता ५ सहस्र महिलांकडे सरकारचे दुर्लक्ष !
काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, शेतकर्यांनी पेरणी करूनही पाऊस नाही. शेतकरी आता दुबार पेरणी करू शकत नाही. सरकारने घोषणा करूनही कापूस उत्पादन करणार्या शेतकर्यांना साहाय्य मिळालेले नाही. राज्यात महागाई वाढलेली असून चोर्यांचे प्रमाणही वाढलेले आहे. राज्यात ५ सहस्र महिला आणि तरुणी बेपत्ता असतांनाही सरकारचे याकडे लक्ष नाही.