१. पू. वामन यांनी खेळण्यांच्या माध्यमातून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा रथोत्सव सोहळा साजरा करणे
‘या वर्षी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या आधी साधारण मार्च ते एप्रिल २०२३ या कालावधीत पू. वामन सतत कुटुंबियांना सांगत होते, ‘‘या वर्षीसुद्धा नारायणांचा रथोत्सव होणार आहे. नारायणांचा रथ मुकुटाप्रमाणे आहे.’’ पू. वामन त्यांच्या खेळण्यांशी खेळतांनासुद्धा रथोत्सव-रथोत्सव असेच खेळत होते. त्यांच्याकडे प्लास्टिकचे ठोकळे आहेत. ते ठोकळे एकात एक असे अडकवून त्याचा रथ सिद्ध करून त्यात ३ सिंहासने सिद्ध केलेली असायची. त्यातील एक सिंहासन नारायणांचे (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे) मोठे आणि त्यांच्या पुढे दोन लहान सिंहासने असायची. त्यातील एक श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि दुसरे श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे असायचे. पू. वामन हा खेळ ९.५.२०२३ पर्यंत प्रतिदिन खेळत होते. ‘वेगवेगळे रथ बनवायचे आणि रथयात्रा करायची’, हा त्यांचा नित्याचाच खेळ झाला होता.
२. ‘रथोत्सवाचा खेळ खेळतांना पू. वामन सूक्ष्मातून कसलीतरी सिद्धता करत आहेत’, हे इतक्या दिवसांच्या सत्संगातून लक्षात येणे अन् ‘हे सर्व खेळतांना त्यांच्याभोवती वेगळीच शक्ती कार्यरत आहे’, असे जाणवणे
रथोत्सवाचा खेळ खेळतांना पू. वामन स्वतः भजन म्हणायचे, ‘‘नारायण नारायण गुरुवर नारायण ।’’ तसेच हा रथ साधकांनी (आपण) ओढायचा. घोडे नको; परंतु पाटीलकाका (श्री. परशुराम पाटील (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय ५३ वर्षे) पाहिजेत’, असे पू. वामन म्हणायचे. (श्री. परशुराम पाटील हे रामनाथी आश्रमातील वाहनाशी संबंधित सेवा करतात.) पू. वामन मध्येच कधीतरी म्हणायचे, ‘‘पुष्कळ साधक येणार आहेत. मला पुष्कळ बसेस पाहिजेत. अग्नीशमनची गाडी आणि रुग्णवाहिका पाहिजे. आपल्याला पुष्कळ टँकर (पाणी वाहून नेणारे अवजड वाहन) भरून पाणी लागणार आहे. मला ते भरून आणायचे आहेत. रथासमवेत ते या सर्व गाड्या (त्यांच्या खेळण्यांतील) एकत्र एका रांगेत उभे करायचे. मला याचा त्या वेळी अर्थ लक्षात येत नव्हता; परंतु हे काहीतरी वेगळे आहे आणि ‘पू. वामन सूक्ष्मातून कसलीतरी सिद्धता करत आहेत’, हे त्यांच्या इतक्या दिवसांच्या सत्संगातून लक्षात येत होते. विशेष म्हणजे त्यांनी यातील कोणत्याही कृतीचे मला चित्रीकरण करू दिले नाही. याचे कारण मला लक्षात आले नाही; पण ‘हे खेळ खेळत असतांना त्यांच्याभोवती वेगळीच शक्ती कार्यरत आहे’, असे मला जाणवायचे.
३. पू. वामन यांनी निसर्गातील सर्वांना नारायणांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) जन्मोत्सवाविषयी सांगणे आणि त्यांच्याशी सूक्ष्मातून संवाद साधणे
३ अ. आकाशातील ढग आणि उडणारे पक्षी यांना नारायणांचा (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा) जन्मोत्सव असल्याने त्यांचे स्मरण करण्यास सांगणे : आमच्या घरापासून रामनाथी आश्रमाकडे जाणार्या मार्गावरील सर्व लहान-मोठी झाडे, फुले, पाने, वेली, दगड, माती आणि डोंगरावरील झाडे हे ‘सर्वच नारायणांची वाट पहात आहेत’, असे पू. वामन म्हणायचे. ते मला विचारायचे, ‘‘आई, हे सर्व जण काय म्हणत आहेत ? ते तुला ऐकायला येत आहे का ग ?’’ त्यावर मी त्यांना म्हणायचे, ‘‘हे सर्व नारायण नारायण गुरुवर नारायण ।’’ असे भजन सतत म्हणत आहेत. या सर्वांकडे बघून पू. वामन यांना पुष्कळ आनंद होत होता.
३ आ. पू. वामन यांनी आकाशातील ढग आणि उडणारे पक्षी यांनाही नारायणांचा जन्मोत्सव असल्याचे सांगणे आणि त्यांचे बोलणे सहजतेने असल्याने सर्व पक्षी अन् ढग यांनाही ते समजत आहे’, असे जाणवणे : आम्ही दुचाकीवरून बाहेर जातांना ते मध्येच आकाशाकडे बघत. ते ‘आकाशातील ढग आणि उडणारे पक्षी यांना आता नारायणांचा जन्मोत्सव आहे. तुम्ही त्यांचे स्मरण करा’, असे सांगायचे. काही वेळा एखाद्या ढगाकडे बघून म्हणायचे, ‘हा ढग कसे ‘नारायण नारायण’, असे म्हणत आहे. आमच्या घराच्या आगाशीत उभे असतांना झाडांवर आणि घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर बसणार्या पक्ष्यांना पू. वामन सांगायचे, ‘नारायणांचा जन्मोत्सव आहे. मी आता आश्रमात चाललो आहे. तुम्हीसुद्धा माझ्या समवेत या आणि त्यांचे स्मरण करा.’ पू. वामन यांचे हे बोलणे इतके सहज असते की, ‘ते सर्व पक्षी आणि ढग यांनाही समजत आहे’, असे मला जाणवायचे.
३ इ. ‘श्री गुरूंचे गुणगान चराचर सृष्टीने करावे’, यासाठी निसर्गातील विविध घटकांशी सूक्ष्मरूपाने संवाद साधणारे पू. वामन राजंदेकर ! : पू. वामन यांचा निसर्गातील विविध घटकांशी होणारा हा संवाद ऐकणे, म्हणजे आपल्या ‘श्री गुरूंचे गुणगान चराचर सृष्टीने करावे’, यासाठी असलेली शिष्याची तळमळ आहे. श्री गुरूंच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) जन्मोत्सवाचा आनंद स्वत: पुरता न ठेवता ‘सजीव अणि निर्जीव यांमध्येही नारायणच असतात अन् अशा सर्वच घटकांनी तो आनंद अनुभवावा’, यांसाठीचे पू. वामन यांचे प्रयत्न बघून निःशब्द कृतज्ञताच व्यक्त करत होते. प.पू. गुरुदेव, ‘हे सर्व केवळ अलौकिक आणि अद्वितीयच असून आपल्या अफाट सामर्थ्याची ही एक प्रचीतीच आहे’, हे पू. वामन यांच्याकडे पाहून मला जाणवते. संतांच्या अंतर्मनात जो आनंद असतो, तोच त्यांना सर्वत्र जाणवतो आणि ते त्या आत्मानंदाची अनुभूती घेऊन त्याचेच प्रक्षेपणही करतात.
४. ‘सेवा करणार्या साधकांना त्रास होऊ नये’, यासाठी वरुणदेवाला प्रार्थना करणारे पू. वामन राजंदेकर !
४ अ. पू. वामन यांनी वरुणदेवाला ‘तू पाऊस पाडायचा नाही, म्हणजे तू येऊ नकोस; पण दिवसभर आकाशात आभाळ येऊ दे, म्हणजे मैदानात सेवा करणार्या साधकांना उन्हाचा त्रास होणार नाही’, असे सांगणे आणि त्या दिवसापासून दिवसभरातील बराच वेळ आकाशात ढग (आभाळ) असणे : परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या ४ – ५ दिवस आधी पू. वामन यांना जेव्हा समजले की, नारायणांचा जन्मोत्सव या वर्षी मोठ्या मैदानात आहे. त्यासाठी साधक दिवसभर मैदानात उन्हात सेवा करत आहेत. तेव्हा ते धावत घराच्या आगाशीत गेले आणि आकाशाकडे बघून म्हणाले, ‘मित्रा अरे मित्रा, ऐकतोस का ? आपल्या नारायणांचा जन्मोत्सव आहे ना !’ त्यावर मी त्यांना विचारले, ‘‘कुणाला हाक मारत आहात.’’ त्या वेळी ते म्हणाले, ‘‘अगं आई, मी माझ्या मित्राशी म्हणजे पावसाशी (वरुणदेवाशी) बोलत आहे. त्याला सांगतो की, ‘तू पाऊस पाडायचा नाही, म्हणजे तू येऊ नकोस; पण दिवसभर आकाशात आभाळ येऊ दे, म्हणजे मैदानात सेवा करणार्या साधकांना उन्हाचा त्रास होणार नाही.’ ‘त्या दिवसापासून दिवसभरातील बराच वेळ आकाशात ढग (आभाळ)असायचे’, असे माझ्या लक्षात आले. त्या वेळी आकाशात आभाळ आलेले पाहून पू. वामन बाहेर आगाशीत जाऊन आकाशाकडे बघून कृतज्ञता म्हणायचे, ‘कृतज्ञता मित्रा, तू आलास. नारायणांनाही तुला बघून आनंद झाला असेल.’ हे वाक्य ते न चुकता प्रतिदिन म्हणत होते.
४ आ. आकाशात ढगांचा गडगडाट ऐकू आल्यावर पू. वामन यांनी वरुणदेवाला आर्ततेने प्रार्थना करणे आणि लगेचच ढगांचा गडगडाट पूर्णपणे थांबणे : ९.५.२०२३ या दिवशी आम्ही संध्याकाळी साधारण ५.३० वाजता दुचाकीने रामनाथी आश्रमात जाण्यासाठी निघालो. तेवढ्यात आकाशात ढगांचा गडगडाट ऐकू आला. तो आवाज येताक्षणीच पू. वामन आकाशाकडे बघून म्हणाले, ‘अरे, मी तुला केवळ आभाळ आणायला सांगितले होते ना ? तू असा गडगड करून पडलास, तर सर्व साधक नारायणांची सेवा कशी करणार ? तू आता शांत हो. परत गडगड करू नकोस.’ हे त्यांनी इतके प्रेमाने सांगितले की, जणू काही ते प्रत्यक्षच वरुणदेवांशीच बोलत आहेत. त्या वेळी ‘आकाशातील वरुणदेवांनी पू. वामन यांचे बोलणे ऐकले’, असे मला वाटले आणि आश्चर्य म्हणजे त्या क्षणी ढगांचा गडगडाट पूर्णपणे थांबला. ‘पू. वामन यांच्या गोड आवाजातील प्रेमळ आर्त प्रार्थनेला वरुणदेवही कसे नकार देणार’, असे मला वाटले.
४ इ. ‘देवाशी अनुसंधानात रहाण्यासाठी स्थळ काळाचे बंधन नसते’, हे प्रत्यक्ष कृतीतून शिकवणारे पू. वामन राजंदेकर ! : आम्ही दुचाकीने रामनाथी आश्रमाजवळ पोचत असतांनाच गाडीवर (पू. वामन दुचाकीवर पुढे उभे असतात.) पू. वामन यांनी वरुणदेवांकडे कृतज्ञता व्यक्त केली. साधकांसाठी वरुणदेवाला प्रेमाने आणि आर्ततेने प्रार्थना करणारे पू. वामन यांनी तेवढ्याच तत्परतेने त्यांच्याप्रती कृतज्ञताही व्यक्त केली. ‘देवाशी अनुसंधानात रहाण्यासाठी स्थळ काळाचे बंधन नसते’, हे पू. वामन यांनी त्यांच्या कृतीतून शिकवले.
५. ‘सतत अनुसंधानात कसे रहावे ?’, याचीच पू. वामन यांनी त्यांच्या सहज कृतीतून शिकवण देणे
‘पू. वामन यांनी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवापूर्वी त्यांच्या सहज खेळण्यातून, तसेच निसर्गातील विविध घटकांशी केलेल्या दैवी संवादातून ते परात्पर गुरुदेवांशी अंतर्यामी कसे जोडलेले आहेत’, याची मला अनुभूती आली. ‘सतत अनुसंधानात कसे रहावे ?’, याचीच पू. वामन यांनी त्यांच्या सहज कृतीतून शिकवण दिली. ‘संतांची प्रत्येकच कृती साधना म्हणून कशी असते ?’, हेही पुन्हा एकदा शिकायला आणि अनुभवायला मिळाले. ‘त्याच समवेत इतरांचा विचार, निरपेक्ष प्रेम, निर्मळता, सहजता यांत किती दैवी सौंदर्य असते’, हे अनुभवायला मिळाले. ‘ईश्वराचे सगुण रूप म्हणजे संत’, हे वचन सिद्ध करणारी पू. वामन यांची प्रत्येक कृती आणि विचार बघितल्यावर मनात अखंड कृतज्ञताभावच निर्माण होतो.’
कृतज्ञता !
– सौ. मानसी राजंदेकर, (पू. वामन यांच्या आई) (आध्यात्मिक पातळी ६० टक्के, वय ३९ वर्षे), फोंडा, गोवा. (१८.५.२०२३)
|