भारतीय नागरिकांवर आज ‘एका डोळ्यात हसू, तर एक डोळ्यात आसू’ अशी वेळ आली आहे. १४ जुलै २०२३ या दिवशी ‘चंद्रयान-३’चे अंतराळात प्रक्षेपण झाले. या महत्त्वपूर्ण मोहिमेचा एक टप्पा पूर्ण झाल्याचा सर्वच भारतियांना अभिमान आणि तितकाच आनंदही होत आहे; पण दुसरीकडे उत्तर भारतात पावसाने केलेल्या कहरामुळे सर्वांच्याच डोळ्यांतून आसवे येत आहेत. ही दुर्दैवाची गोष्ट म्हणावी लागेल. मुसळधार पावसामुळे देशाची राजधानी देहलीत हाहा:कार उडाला आहे. लाल किल्ल्याच्या भागात, तसेच सर्वाेच्च न्यायालय परिसरातही मोठ्या प्रमाणात पाणी साठले आहे. त्यामुळे लाल किल्ला २ दिवस बंद ठेवण्यात आला आहे. काही ठिकाणी तर रुग्णालयाच्या इमारतींमध्येही पाणी शिरल्याने तेथील रुग्णांना अन्यत्र हालवण्याची बिकट स्थिती निर्माण झाली. शाळा, महाविद्यालये, काही सरकारी कार्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. ‘राजधानीसारख्या ठिकाणी अशी स्थिती कशी काय उद्भवू शकते ?’, असा प्रश्न प्रत्येक नागरिकाच्या मनात निर्माण झाला आहे. देहलीत महापुरामुळे निर्माण झालेली आपत्तीजनक स्थिती म्हणजे राजधानीला लागलेले गालबोटच म्हणावे लागेल. ‘राजधानीत खरेतर सुसज्ज सोयीसुविधा, आपत्ती प्रतिबंधक व्यवस्था, सुनियोजित प्रशासन असते. मग तेथे संकट आलेच कसे ?’, हा सर्वसामान्यांना पडणारा प्रश्न आहे. ‘राजधानीच जर बुडत असेल, तर उर्वरित देशाला कोण वाचवणार ?’, याचाही विचार करायला हवा. ‘देहली हे गटार झाले आहे’, अशी टीका भाजपचे खासदार गौतम गंभीर यांनी देहली सरकारवर केली आहे. देहलीच्या झालेल्या वाताहातीला उत्तरदायी कोण ? गेल्या ४१ वर्षांतील पावसाचा विक्रम देहलीतील पावसाने मोडला आहे. अशा भीषण पूरस्थितीत झालेली वाताहात पहाता अनेकांकडून अरविंद केजरीवाल यांच्या त्यागपत्राची मागणी केली जात आहे.
निसर्गाला ओरबाडले !
‘अल्प कालावधीत पडलेला अधिक पाऊस आणि यमुना नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात साठलेला गाळ यांमुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. तेथे मोठ्या प्रमाणात वाळूचे पट्टे निर्माण झाले आहेत. नदीच्या वहात्या प्रवाहात असणारे २० पेक्षा अधिक पुलांमुळेही हा गाळ पुढे सरकण्यास अडथळा निर्माण होत आहे’, असे तज्ञांचे म्हणणे आहे. आधुनिकता, विकास या दिशेने आपण जात आहोत खरे; पण त्याची दुसरी बाजू तितकीच भीषण, भयानक आणि जीवघेणी ठरत आहे’, याकडेही गांभीर्याने पहायला हवे. विकासासाठी निसर्गाला ओरबाडल्यावर यापेक्षा आणखी वेगळे काय होणार ? त्यामुळे विकास आणि निसर्गाचे रक्षण यांचा समतोल राखणे हेच कालसुसंगत ठरेल !
जलसंकटाचे परिणाम !
हरियाणामधील हथनीकुंड धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्यामुळे गेल्या ४५ वर्षांचा विक्रम मोडत यमुना नदीने २०८.६६ मीटरच्या वर तिची पातळी ओलांडली आहे. हेही या जलप्रलयामागील महत्त्वाचे कारण आहे. पाण्याच्या वाढत्या पातळीमुळे जलप्रक्रिया केंद्रे बंद करावी लागल्याने पाणीपुरवठ्यात कपात करण्यात आली आहे. सगळीकडे पाणीच पाणी दिसत असले, तरी या कपातीमुळे पाणीटंचाईचे भीषण संकट ओढवले आहे. आता चढ्या दराने पाणी विकत घ्यावे लागू शकते. आपत्कालीन स्थितीतही लूट केली जाते. हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसामुळे १ सहस्र रस्ते बंद ठेवण्यात आले आहेत. तेथे ८८ जणांना जीव गमवावा लागला असून १०० जण घायाळ झाले आहेत. हरियाणात असणार्या आशियातील सर्वांत मोठ्या कपड्यांच्या बाजारपेठेत पाणी शिरल्याने उच्चतम दर्जाचे चांगले कपडे वाहून गेले. दुकानदारांवर रडण्याची वेळ आली आहे. एका दुकानदाराने सांगितले, ‘‘पाणी साठू नये; म्हणून आम्ही नाला स्वच्छतेसाठी महानगरपालिकेकडे वारंवार मागणी केली; पण ती विलंबाने चालू करण्यात आली आणि पाऊस आल्याने काम अपूर्ण राहिले.’’ दुकानदारांची झालेली हानीभरपाई आता महापालिका भरून देणार आहे का ? स्वतःला नेमून दिलेली कामे प्रशासन त्या त्या वेळी पूर्ण का करत नाही ? याविषयीही प्रशासनाला खडसावायला हवे. उन्हाळ्यात कामे करायची नाहीत आणि पाऊस तोंडावर आला की, गाळ उपसण्यास प्रारंभ करायचा, हे सर्वच ठिकाणी नित्याचे झाले आहे. यात खरोखर समाजकर्तव्याचे भान ठेवून कामे केली जातात कि केवळ पैसे मिळवण्याचा एकमेव हेतू साध्य केला जातो, हेही पहायला हवे. अन्यथा प्रतिवर्षी असे प्रकार होतच रहाणार. प्रशासकीय स्तरावर सर्वत्रच दिसून येणारी अनास्था दूर करण्यासाठी केंद्र सरकारनेही प्रयत्न करायला हवेत. जलप्रलयामुळे अनेक ठिकाणी पर्यटन बंद करण्यात आले आहे. अनेक धंदे आणि व्यवसाय ठप्प झालेले आहेत. अनेकांना पुन्हा घरूनच त्यांचे कार्यालयीन काम करावे लागत आहे. या भीषण वाताहातीमुळे राज्याराज्यांतील आर्थिक गणिते कोलमडली आहेत. ती पुन्हा सुधारण्यासाठी अधिक वेळ द्यावा लागेल.
निसर्गाचा प्रकोप !
राजधानी देहलीमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढलेले असून अवैध बांधकामे, तसेच रोहिंग्या आणि घुसखोर यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. हे सर्व थांबवण्यासाठी सरकार काहीच प्रयत्न करत नसेल, तर त्याला आळा घालणार कोण ? धरतीवर चालू असणारी ही नतद्रष्ट कृत्ये पहाता यातून रज-तमाचे प्रमाणच वाढत आहे, हे लक्षात येते. निसर्गाने याआधीही अनेकदा देशातील अन्य राज्यांमध्ये जलप्रकोप दाखवलेला आहे. त्यातून तरी मनुष्याने शिकून शहाणे व्हायला हवे. तसे न झाल्यास निसर्ग भविष्यात याहीपेक्षा रौद्र रूप धारण करेल आणि त्यात सर्वच्या सर्व मानवजात नष्ट होईल. ‘निसर्गाचा हा वाढता प्रकोप टाळण्यासाठी या भूमीवर वेळीच धर्माचरण केले जाणे हितावह आहे. ‘निसर्गाने आपल्याला साथ द्यावी आणि अनुकूल रहावे’, असे वाटत असेल, तर धर्माचरण करणे हा एकमात्र उपाय आहे, हे प्रत्येकाने लक्षात घेऊन त्यासाठी कृतीशील व्हावे आणि जीव वाचवण्यासाठी आतातरी भगवंताची आराधना करावी !
‘निसर्गाने साथ द्यावी’, असे वाटत असेल, तर धर्माचरणाचा मार्ग अवलंबण्यातच हित आहे, हे मनुष्याने लक्षात घ्यावे ! |