|
सिंधुदुर्गनगरी – महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या राज्यांत घरफोडी केल्याचे ४५ गुन्हे नोंद असलेला प्रकाश विनायक पाटील (वय ३७, मूळ रहाणार घाटवाडा, पडोसे, सत्तरी, गोवा) या गुन्हेगाराला सिंधुदुर्ग जिल्हा गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने कणकवली तालुक्यातील वागदे येथे १२ जुलैला अटक केली आहे. या वेळी त्याच्याकडून गावठी कट्टा, बंदूक, जिवंत काडतूसे, ५ तलवारी, रोख रक्कम, भ्रमणभाष, दुचाकी, चारचाकी, असा एकूण ३० लाख ४८ सहस्र ७८४ रुपयांचा मुद्देमाल कह्यात घेतला आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
(सौजन्य : Sindhudurg 24 taas)
या कारवाईविषयी माहिती देण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयात १३ जुलै या दिवशी या पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या वेळी जिल्हा पोलीस अधीक्षक अग्रवाल पुढे म्हणाले, ‘‘आरोपी पाटील याच्यावर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ८ गुन्हे, कोल्हापूर जिल्ह्यात ९ गुन्हे, गोवा राज्यात ४, कर्नाटक राज्यात २४, असे एकूण ४५ गुन्हे नोंद आहेत. तसेच काही गुन्ह्यांसाठी पोलीस त्याचा शोध घेत होते, तर काही गुन्ह्यांमध्ये तो पसार असल्याचे घोषित करण्यात आले आहे. पाटील याला अटक करण्याची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप भोसले, साहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र घाग, पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र शेळके, साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुरुनाथ कोयंडे आणि त्यांचे अन्य सहकारी यांच्या पथकाने केली.