कृषीमंत्री अब्‍दुल सत्तार यांच्‍यावर फौजदारी खटला प्रविष्‍ट करण्‍याचा न्‍यायालयाचा आदेश !

निवडणूक शपथपत्रात चुकीची माहिती दिल्‍याचे प्रकरण

कृषीमंत्री अब्‍दुल सत्तार

छत्रपती संभाजीनगर – राज्‍याचे कृषीमंत्री अब्‍दुल सत्तार यांनी वर्ष २०१४ आणि वर्ष २०१९ मध्‍ये निवडणूक आयोगाला सादर केलेल्‍या शपथपत्रात मालमत्तेसंबंधी माहितीत तफावत असल्‍याचे मान्‍य करत सिल्लोड येथील न्‍यायालयाने त्‍यांच्‍याविरुद्ध फौजदारी खटला चालवण्‍याचे आदेश १२ जुलै या दिवशी दिले. हे आरोप सिद्ध झाल्‍यास सत्तार यांची आमदारकी जाणार आहे, तसेच ६ वर्षे निवडणूक लढण्‍यास ते अपात्र ठरतील.

महेश शंकरपल्ली आणि डॉ. अभिषेक हरिदास यांनी याविषयी २७ ऑक्‍टोबर २०२१ या दिवशी न्‍यायालयात याचिका प्रविष्‍ट केली होती. न्‍यायालयाने पोलिसांना चौकशीचे आदेश दिले होते; पण त्‍यावर समाधान न झाल्‍याने शंकरपल्ली यांनी २ वेळा न्‍यायालयात अर्ज केले होते. तिसर्‍यांदा न्‍यायालयाने मुद्देनिहाय अन्‍वेषणाचे आदेश दिले. सत्तार यांचा जबाबही नोंदवला. ११ जुलै या दिवशी न्‍यायाधीश मीनाक्षी धनराज यांनी सत्तारांविरुद्ध प्रथमदर्शनी पुरावे असल्‍याचे मान्‍य करत फौजदारी खटला चालवण्‍याचे आदेश दिले.