चिपळूण, १३ जुलै (वार्ता.)- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडूनही (मनसेकडूनही) गड-दुर्गांवरील इस्लामी अतिक्रमणाविषयी कृतीच्या स्तरावर प्रयत्न आम्ही करत आहोत, माहीम खाडीतील अवैध दर्गा हटवणे, हा त्यातीलच प्रयत्न आहे. आपण गड-दुर्गांवरील इस्लामी अतिक्रमणाविषयी विस्तृतपणे चर्चा करू, असे आश्वासन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळाला दिले.
१३ जुलै या दिवशी चिपळूण येथे ‘मनसे’च्या नूतन विभागीय जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन आणि कार्यकर्ते यांना मार्गदर्शन, असा श्री. राज ठाकरे यांचा कार्यक्रम होता.
या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘नवी मुंबई येथे शीघ्र कृती दल (रॅपिड ॲक्शन फोर्स) परिसरात ‘हज हाऊस’ बांधण्यासाठी जागेची अनुमती देण्याचा धक्कादायक प्रकार घडला असून सुरक्षेच्या दृष्टीने हा हलगर्जीपणा केला जात आहे. ही अनुमती तात्काळ रहित करण्याविषयी मनसेकडूनही प्रयत्न व्हावेत’, याविषयीचे निवेदन समितीच्या वतीने देण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी समितीच्या वतीने श्री. ठाकरे यांना ‘हलाल जिहाद’ हा ग्रंथ भेट देण्यात आला. ‘हलाल अर्थव्यवस्थेविषयी आम्ही प्रबोधन करण्याचा प्रयत्न करत आहोत’, असे त्यांनी सांगितले.
राज ठाकरे यांच्या व्यस्त कार्यक्रमातही मनसे सरचिटणीस श्री. वैभव खेडेकर, जिल्हा सचिव श्री. संतोष नलावडे आणि चिपळूण शहराध्यक्ष श्री. अभिनव भुरण यांनी समितीच्या शिष्टमंडळाला भेट देण्यासाठी पुढाकार घेऊन संधी दिली. या वेळी समितीच्या वतीने डॉ. हेमंत चाळके, सर्वश्री विश्वनाथ पवार आणि निवळकर हे उपस्थित होते.