१. भक्तीसत्संगात श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी ‘गुरुमाऊली स्वतःच्या हृदयमंदिरात सिंहासनावर विराजमान होणार आहे’, असा भावप्रयोग घेेणे
‘एकदा सकाळी मला त्रास होत होता. मला ग्लानी येत होती. त्या वेळी परात्पर गुरु डॉ. आठवले यांंची आठवण येऊन मला रडू आले. दुपारी गुरुवारचा भक्तीसत्संग ऐकत असतांना श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताईंनी पुढील भावप्रयोग घेतला. ‘गुरुमाऊली आज माझ्या हृदयमंदिरात सिंहासनावर विराजमान होणार आहे. तेव्हा स्वतःच्या मनात काळजी, चिंता, भीती राहिली असेल, तर ती माऊलीला आत्मनिवेदन स्वरूपात सांगून आत्मनिवेदनरूपी पुष्पे तिच्या चरणांवर अर्पण करूया.’
२. साधिकेच्या हृदयमंदिरात परात्पर गुरु डॉक्टर बसलेले दिसणे आणि एकेक साधक त्यांच्या चरणांजवळ येऊन आत्मनिवेदनात मनातील विचारमंथन सादर करत असल्याचे दिसणे
त्याच क्षणी मला परात्पर गुरु डॉक्टर माझ्या हृदयमंदिरात बसलेले दिसले. ते साध्या पोषाखात होते. तेथेही त्यांच्या हातात कागद आणि पेन होते. आम्ही सर्व साधक त्यांच्या चरणांजवळ बसलो होतो. त्यांनी सर्वांवर त्यांची दृष्टी फिरवली. नंतर त्यांना सर्व साधकांनी भावपूर्ण नमस्कार केला. एक एक साधक त्यांच्या चरणांजवळ येऊन आत्मनिवेदनात त्यांच्या मनातील विचारमंथन सादर करत होता.
३. मनातील विचार हृदयमंदिरातील परात्पर गुरु डॉक्टरांनी कागदावर लिहिल्याचे पाहून त्यांना साधकांच्या मनातील सर्वकाही कळत असल्याचे लक्षात येणे
शेवटी मी त्यांच्या चरणांजवळ गेले. त्यांनी माझ्याकडे पाहिले आणि त्यांनी त्यांच्याजवळ असलेल्या कागदावर माझ्या मनातील विचार लिहून काढले. नंतर ते मला दाखवले. त्यानंतर ते मला म्हणाले, ‘काळजी करू नकोस’ आणि हसले. यावरून माझ्या लक्षात आले की, राजाला प्रजेच्या मनात काय चालू आहे हे ठाऊक असते; परंतु ‘प्रजा स्वत:हून सांगते का ?’, हे राजा पहात असतो. राजाचे प्रजेवर प्रेम आणि विश्वास असतो. त्याप्रमाणे परात्पर गुरु डॉक्टरांना सर्व ठाऊक आहे. त्यांचे साधकांवर पुष्कळ प्रेम आहे. साधकांसाठी ‘काय करू किंवा किती करू’, असे त्यांना होत असते. (सत्संग चालू झाल्यापासून तो संपेपर्यंत आणि नंतरही मला गुरुमाऊली माझ्या हृदयमंदिरात बसलेली दिसत होती.)
४. प्रत्येक प्रसंगात स्वत:च्या मागे भगवंत उभा आहे, हे साधक पहात नसल्यामुळे शेवटी भगवंतालाच पुढे येऊन साधकाला कुणाच्या तरी माध्यमातून साहाय्य करावे लागणे
परात्पर गुरु डॉक्टर ‘साधकांचे मन निश्चल, निर्भय आहे का ?’ हेे पहात असतात. ते साधकांची श्रद्धा पहात असतात. प्रत्येक प्रसंगात ते धावून येतात आणि आपल्या पाठीशी उभे रहातात. आपण मात्र प्रसंगात अडकतो. प्रसंगात मार्ग काढत असतो. त्यामुळे आपण कधी कधी अस्थिर असतो. यामध्ये प्रसंग पुढे असतो. आपण मध्ये असतो. (म्हणजे प्रसंगाला चिकटून रहातो); पण आपण ‘आपल्यामागे भगवंत उभा आहे’, हे पहातच नाही. मग भगवंतालाच दया येते आणि तो पुढे येऊन साहाय्य करतो. तेव्हा तो कुणाच्या ना कुणाच्या माध्यमातून साहाय्य करत असतो. हे सर्व आपल्याला त्या वेळी लक्षात येत नसेल किंवा त्या वेळी सुचत नसेल, तर नंतर लक्षात येते. देव आपला हात धरून असतो.
५. प्रत्येक प्रसंगात देवाने आपल्याला साथ दिलेली असणे
प्रसंग हा देव असतो, तसेच प्रसंग हा आपला जीवनसाथीही असतो, म्हणजेच प्रसंग घडतांना, घडल्यानंतर आपण देवालाच शोधत रहायला हवे. प्रत्येक वेळी जीवनातील अनेक प्रसंगांत देवाने आपल्याला साथ दिलेली असते, तर भगवंताला (गुरुमाऊलीला) विसरून कसे चालेल ?’
– सुश्री (कु.) प्रतीक्षा हडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
जन्मोजन्मी पदोपदी गुरुमाऊलीने दिली आम्हाला साथजन्मोजन्मी पदोपदी गुरुमाऊलीने (टीप) दिली आम्हाला साथ । त्यांचाच हात धरून चालू अध्यात्मातील वाटा । सोडून जाणार नाही तुझा हात रे भगवंता । या पावन मनमंदिरातून जयजयकार करतो, तुझा रे प्राणनाथा । करुणाकरा, तुझ्याविना काही नको आता । टीप : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले – सुश्री (कु.) प्रतीक्षा हडकर |
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |