तरुणीच्या कमरेवर हात ठेवून नृत्य करणार्‍या पाद्रयाचा व्हिडिओ प्रसारित करणार्‍या हिंदु तरुणाला अटक

  • व्हिडिओद्वारे हिंदु तरुणाने धर्मांतरित हिंदूंना विचार करण्याचे केले होते आवाहन !

  • हिंदु मुन्नानी संघटनेकडून निदर्शने करत हिंदु तरुणाच्या अटकेला विरोध !

कनाल कन्नन्

चेन्नई (तमिळनाडू) – येथे सामाजिक माध्यमांतून एका पाद्रयाला त्याच्यापेक्षा लहान असणार्‍या आणि तोकडे कपडे घातलेल्या तरुणी समवेतच्या नृत्याचा व्हिडिओ प्रसारित केल्यावरून कनाल कन्नन् यांना अटक करण्यात आली. सत्ताधारी द्रमुकच्या (द्रविड मुन्नेत्र कळघम् – द्रविड प्रगती संघ) ऑस्टिन बेनेट या नेत्याने केलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली. कन्नन् हे दक्षिण भारतीय चित्रपटांमध्ये साहसी दृश्यांचे तज्ञ आहेत. या व्हिडिओ समवेत कन्नन् यांनी लिहिले होते, ‘विदेशी धर्मांची हीच वस्तूस्थिती आहे. धर्मांतरित हिंदूंना याविषयी विचार केला पाहिजे आणि त्यांना पाश्‍चाताप वाटला पाहिजे.’

१. कन्नन् यांच्या अटकेचा हिंदु मुन्नानी या संघटनेने विरोध केला आहे. या संघटनेने पोलीस ठाण्यासमोर निदर्शने केली. या संघटनेचे राज्य प्रवक्ते एलंगोवन् यांनी म्हटले की, ज्या व्हिडिओवरून कन्नन् यांना अटक करण्यात आली तो व्हिडिओ यापूर्वीच सामाजिक माध्यमांतून प्रसारित झालेला आहे. त्यांची अटक अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आक्रमण आहे. द्रमुक राजकारण करत आहे. स्वतःच्या विचारसरणीपेक्षा वेगळा विचार करणार्‍या प्रत्येक व्यक्तीला त्रास दिला जात आहे.

२. विशेष म्हणजे कन्नन् यांनी गेल्या वर्षी पेरियर यांच्या विरोधात विधान केल्यावरूनही त्यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर मद्रास उच्च न्यायालयाने कन्नन् यांना सशर्त जामीन संमत केला होता.

संपादकीय भूमिका 

पाद्रयांचे खरे स्वरूप विदेशातील जनतेला ठाऊक झाल्यामुळेच तेथील चर्च ओस पडू लागले आहेत. सहस्रो ख्रिस्ती नास्तिक होऊ लागले आहेत. या वस्तूस्थितीकडे केवळ मतांच्या राजकारणासाठी दुर्लक्ष करणारे द्रमुक सारखे राजकीय पक्ष हिंदु राष्ट्र अपरिहार्य करतात !