श्री. प्रकाश मराठे यांना पत्नी पू. (कै.) सौ. शालिनी प्रकाश मराठे यांची जाणवलेली गुणवैशिष्‍ट्ये आणि देहावसानानंतर जाणवलेली सूत्रे

पू. (सौ.) शालिनी मराठे यांचे यजमान श्री. प्रकाश मराठे (आध्‍यात्मिक पातळी ६८ टक्‍के) यांना पत्नीची जाणवलेली गुणवैशिष्‍ट्ये आणि त्‍यांच्‍या देहावसानानंतर अन् त्‍यांना संत घोषित केल्‍यावर जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

१. घरात साधकांची सकाळपासून वर्दळ असूनही सौ. शालिनीने कधीही गार्‍हाणे न करणे

पू. (कै.) सौ. शालिनी प्रकाश मराठे

‘वर्ष १९९३ मध्‍ये मी, पू. आई (पू. सीताबाई मराठे (सनातच्‍या २१ व्‍या (व्‍यष्‍टी) संत)) आणि पत्नी सौ. शालिनी असे तिघेही जण सनातन संस्‍थेच्‍या मार्गदर्शनानुसार साधना करू लागलो. दैनिक ‘सनातन प्रभात’ चालू झाल्‍यापासून आमचे घर जणू सनातनचा आश्रमच झाला होता. सर्व गोष्‍टी आमच्‍या पाळे येथील घरातूनच व्‍हायच्‍या. सकाळी लवकर दैनिक ‘सनातन प्रभात’चे गठ्ठे घरी यायचे आणि रात्री ९ ते १० वाजेपर्यंत साधक घरी असायचे. साधक सत्‍संग घेऊन आपापल्‍या घरी यायचे. मी चोडण, आसगाव, वास्‍को, पणजी इत्‍यादी ठिकाणी सेवेसाठी जायचो. त्‍यामुळे मला घरी यायला विलंब होत असे. आमच्‍या घरी साधक सर्व सेवांचे नियोजन करायचे. सत्‍संगातील साधकही उत्‍पादने किंवा आकाशकंदिल सिद्ध करण्‍यासाठी, ग्रंथ वितरण, तसेच गुरुपौर्णिमेच्‍या पावती पुस्‍तकांतील अर्पण आणि हिशोब यांसाठी आमच्‍या घरी यायचे. साधक दैनिक आणि साप्‍ताहिक ‘सनातन प्रभात’ यांचे वेगवेगळे अहवाल, उत्‍पादनांचा साठा-अहवाल इत्‍यादी करून पाठवायचे. साधक पुष्‍कळ वेळ बसून सेवा करत असल्‍यामुळे त्‍यांच्‍यासाठी चहा-बिस्‍किटेही दिली जायची. या सर्व गोष्‍टींना सौ. शालिनी यांची पूर्ण संमती असे. साधकही सर्व गोष्‍टी विचारून आणि समजून करायचे.

२. अहं अल्‍प असल्‍यामुळे प्रतिमा न जपता सर्व सेवा करू शकणार्‍या सौ. शालिनी मराठे !

सौ. शालिनी यांच्‍यात पहिल्‍यापासून इतरांचा विचार करणे, भोळा भाव आणि अहं अल्‍प होता. त्‍यामुळे कुणाकडेही जाऊन काही मागायचे असेल, तर त्‍या लगेच जायच्‍या. त्‍यांच्‍या मनात ‘वस्‍तू द्यायला कुणी ‘नाही’ म्‍हणाले, तर ?’, असा प्रतिमेचा विचार येत नव्‍हता. आवश्‍यक असतील, त्‍या वस्‍तू देवाच्‍या कृपेने त्‍यांना मिळायच्‍या.

श्री. प्रकाश रामचंद्र मराठे

३. परिचयात येणार्‍या सर्वांशी जवळीक करणे

त्‍या नातेवाईक, विद्यार्थी, गावातील लोक, शिक्षक, साधक अशा सर्वांमध्‍ये मिसळायच्‍या. त्‍यांच्‍या मनात ‘लहान-थोर’ किंवा ‘गरीब-श्रीमंत’, असा भेदभाव नव्‍हता. कुणीही काहीही मागितले आणि ते स्‍वतः जवळ असेल, तर त्‍या कधीच मागेपुढे पहात नव्‍हत्‍या, तर ते द्यायच्‍या. त्‍यामुळे समाजातील सर्व स्‍तरांवरील लोकांशी त्‍यांची जवळीक होती. घरी कुणीही आले, तर माझी आई (पू. सीताबाई मराठे) किंवा पत्नी सौ. शालिनी त्‍यांना काहीतरी खाऊ दिल्‍याविना परत पाठवत नसत.

४. आसक्‍ती नसणे

अ. त्‍यांनी कधीच माझ्‍याकडे दागिने आणि कपडे यांसाठी हट्ट केला नाही. जे आहे, त्‍यात त्‍या समाधानी असायच्‍या.

आ. मला वाटते, ‘साधारण २०२१ पासूनच त्‍यांना विरक्‍ती आली होती.’ वर्ष २०२१ मध्‍येच आम्‍ही आम्‍हा दोघांचे इच्‍छापत्र (मृत्‍यूपत्र) केले; पण त्‍यांना आर्थिक व्‍यवहारात रस नव्‍हताच. मी सांगेन, ते त्‍यांना मान्‍य असायचे.

इ. शेवटच्‍या आजारपणात साधारण १६.२.२०२२ पासून त्‍यांना पुष्‍कळ शारीरिक त्रास होत होते. सतत होणार्‍या उलट्यांमुळे त्‍यांचा जीव पिळवटून निघायचा. ते मला पहावत नसे आणि पुष्‍कळ दुःख व्‍हायचे; पण मी काही करू शकत नव्‍हतो. तेव्‍हा त्‍याच मला धीर द्यायच्‍या.

५. साधनेच्‍या आढाव्‍यात त्‍या त्‍यांच्‍याकडून झालेल्‍या चुका प्रांजळपणे सांगायच्‍या.

६. कर्करोगाने गंभीर रुग्‍णाईत स्‍थितीतही त्‍या सतत इतरांंचा विचार करायच्‍या.

७. सौ. शालिनी मराठे रुग्‍णाईत असतांना त्‍यांच्‍या साहाय्‍यासाठी असलेल्‍या साधकांना जाणवलेले त्‍यांचे गुण

७ अ. सौ. सुचेता नाईक

१. प्रत्‍येक कृती करतांना प.पू. डॉक्‍टरांचे स्‍मरण करणे

२. इतरांचा वेळ जाऊ नये; म्‍हणून दक्ष असणे

३. सतत देवाच्‍या अनुसंधानात रहाणे

४. इतरांना आनंद मिळण्‍यासाठी प्रत्‍येक कृती करणे

७ आ. सौ. छाया नाफडे

१. अपेक्षा नसणे

२. स्‍थिरता

३. परात्‍पर गुरु डॉक्‍टरांप्रती सतत कृतज्ञताभावात असणे

७ इ. सौ. देवी कापडिया (आध्‍यात्मिक पातळी ६३ टक्‍के)

१. स्‍वावलंबी

२. प्रेमभाव

३. भावामुळे अप्रतिम लेख आणि कविता लिहिणे

७ ई. वैद्य मेघराज पराडकर

१. मरणप्राय वेदना होतांनाही चिडचिड न करणे

२. अतिशयोक्‍ती न करता त्रास नेमक्‍या शब्‍दात सांगणे

३. ईश्‍वरेच्‍छा म्‍हणून त्रास स्‍वीकारणे

७ उ. सौ. प्रार्थना देव

१. गुरुपौर्णिमेला रुग्‍णाईत असतांनाही इतरांना आनंद देण्‍यासाठी चांगली साडी नेसणे

२. साधक त्‍यांच्‍या सेवेतून वेळ काढून भेटायला आल्‍याविषयी कृतज्ञता वाटणे

३. स्‍वभावदोष आणि अहं निर्मूलन यांसाठी प्रयत्न होत नसल्‍याची खंत वाटणे

७ ऊ. सौ. मीनल राजेंद्र शिंदे

१. त्रास होत असूनही देवावर दृढ श्रद्धा असणे

८. सौ. शालिनी यांची परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍यावरील दृढ श्रद्धा आणि अत्‍युत्‍कट भाव !

सौ. शालिनी यांच्‍यामधील भोळ्‍या आणि उत्‍कट भावामुळे सर्वांना त्‍यांचे बोलणे अन् लिहिणे आवडत असे. त्‍यांचा चेहरा आणि बोलणे यांतून सर्वांना आनंद अन् कृतज्ञताभाव जाणवायचा. रुग्‍णाईत असतांना पुष्‍कळ शारीरिक त्रास होत असूनही त्‍यांना करायला सांगितलेले नामजपादी उपाय त्‍या पूर्ण करायच्‍या आणि सर्व भार परात्‍पर गुरु डॉक्‍टरांवर सोपवून सतत त्‍यांच्‍या अनुसंधानात रहाण्‍याचा प्रयत्न करायच्‍या. त्‍या प.पू. भक्‍तराज महाराज यांची भजने सतत ऐकत असत. त्‍यांच्‍यातील साधनेची तळमळ, श्रद्धा आणि आर्तभाव इत्‍यादी गोष्‍टी त्‍यांच्‍या साधनेला साहाय्‍यभूत झाल्‍या. केवळ परात्‍पर गुरु डॉक्‍टरांवरील श्रद्धेच्‍या बळावरच त्‍या कर्करोगासारख्‍या कठीण दुखण्‍याला अत्‍यंत धैर्याने सामोर्‍या गेल्‍या.

९. अवघ्‍या २९ दिवसांत ४ टक्‍के पातळी वाढून संतपदी विराजमान होणे

निर्मळता, प्रांजळपणा आणि साधनेची तीव्र तळमळ यांमुळे त्‍यांनी वर्ष २०२२ मध्‍ये ६७ टक्‍के आध्‍यात्मिक पातळी गाठली आणि निधनानंतर परात्‍पर गुरु डॉक्‍टरांच्‍या कृपेने अवघ्‍या २९ दिवसांत त्‍यांची आध्‍यात्मिक पातळी ४ टक्‍क्‍यांनी वाढून त्‍यांना संतपद प्राप्‍त झाले.

१०. परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या ८० व्‍या जन्‍मोत्‍सवानिमित्त झालेल्‍या रथोत्‍सवात त्‍यांचे दर्शन झाले, तेव्‍हाच जणू ‘शालिनी यांनी त्‍यांचा देह काया-वाचा-मने श्री गुरुचरणी समर्पित केला’, असे त्‍या दिवशी त्‍यांनी केलेल्‍या कवितेवरून जाणवणे

१६.७.२०२२ या दिवशी त्‍यांनी देह ठेवला. त्‍याच दिवशी त्‍यांची एक कविता दैनिक ‘सनातन प्रभात’मध्‍ये प्रसिद्ध झाली होती. त्‍या कवितेचे शिर्षक होते, ‘लागला जिवाला आनंदाचा छंद !’ आणि कवितेवर दिनांक होता २२.५.२०२२ ! २२.५.२०२२ या दिवशी परात्‍पर गुरु डॉक्‍टरांचा ८० वा जन्‍मोत्‍सव होता. त्‍या दिवशी रथोत्‍सवाच्‍या वेळी त्‍यांना परात्‍पर गुरु डॉक्‍टरांचे पावन दर्शन झाले. त्‍या कवितेत त्‍यांनी ‘श्रीसत्‌शक्‍तीचा साद, अनाहत नाद, आनंद, आनंदाने घट भरला’, अशा आशयाचे लिहिलेले शब्‍द वाचून ‘त्‍यांना त्‍या दिवशी निर्गुण तत्त्वाची अनुभूती आली असावी आणि त्‍याच दिवशी त्‍यांनी आपला जीव गुरुचरणी समर्पित केला असावा’, असे मला वाटते.

११. सौ. शालिनी यांनी देहत्‍याग करण्‍याआधी आणि केल्‍यावर त्‍यांच्‍या संतपदाविषयी मिळालेल्‍या पूर्वसूचना !

११ अ. सौ. शालिनी यांच्‍यावर झालेली संतांची कृपा ! : सौ. शालिनी कर्करोगाने रुग्‍णाईत असल्‍याचे कळल्‍यावर श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ सौ. शालिनी यांना भेटायला आल्‍या होत्‍या. तेव्‍हा त्‍या सौ. शालिनी यांना म्‍हणाल्‍या, ‘‘काकू, आता तुमचे थोडेच प्रारब्‍ध शिल्लक आहे.’’ त्‍यानंतर सौ. शालिनी यांच्‍या देहत्‍यागाच्‍या आधी १ – २ दिवस श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) गाडगीळ पुन्‍हा सौ. शालिनी यांना भेटायला आल्‍या होत्‍या. श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) गाडगीळ यांच्‍या समवेत सदगुरु डॉ. मुकुल गाडगीळही सौ. शालिनी यांना भेटायला आले होते. श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) गाडगीळ यांनी सद़्‍गुरु गाडगीळकाकांना सांगितले, ‘‘श्री. प्रकाश मराठे आणि सौ. शालिनी मराठे यांना नमस्‍कार करूया.’’ त्‍याप्रमाणे त्‍या दोघांनी आम्‍हाला वाकून नमस्‍कार केला.

सौ. शालिनी यांच्‍यावर संतकृपा झाली. श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) गाडगीळ, सद़्‍गुरु डॉ. गाडगीळकाका, पू. (सौ.) परांजपेआजी आणि पू. परांजपेआजोबा यांनी सौ. शालिनी यांना भेटून त्‍यांचा पुढचा मार्ग गुरुकृपेने सुकर करून दिला.

११ आ. श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी दिलेली पूर्वसूचना ! : १६.७.२०२२ या दिवशी सौ. शालिनी यांनी देेहत्‍याग केला. तेव्‍हा माझ्‍याशी बोलतांना श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ मला म्‍हणाल्‍या, ‘‘सौ. शालिनीकाकू संतपदाच्‍या दिशेने वाटचाल करत आहेत.’’

११ इ. प.पू. दास महाराज यांनी ‘सौ. शालिनी यांची कविता म्‍हणजे संतांचा अभंग आहे’, असे सांगणे : प.पू. दास महाराज म्‍हणाले, ‘‘१६.७.२०२२ या दिवशी सौ. मराठे यांची दैनिक ‘सनातन प्रभात’मध्‍ये छापून आलेली कविता म्‍हणजे संतांचा अभंग आहे. त्‍या लवकरच संतपदाला पोेचणार आहेत. काकूंना देवाकडून आधीच पूर्वसूचना मिळाली असावी. त्‍यामुळे कवितेतून त्‍या चराचरातील आनंदस्‍वरूप भगवंताला अनुभवत होत्‍या.’’

११ ई. कु. मधुरा भोसले यांनी त्‍यांच्‍या सूक्ष्म परीक्षणात ‘सौ. मराठेकाकू संत झाल्‍या आहेत’, असे सांगणे : १६.७.२०२२ या दिवशी कु. मधुरा भोसले यांनी कै. (सौ.) शालिनी यांच्‍या देहत्‍यागानंतर त्‍यांचा अंत्‍यसंस्‍कार विधी आणि त्‍यांच्‍या लिंगदेहाचा मृत्‍यूनंतरचा प्रवास याचे सूक्ष्म परीक्षण केले होते. त्‍यात मधुराताईंनी लिहिले होते, ‘साधक ते संत हा सौ. शालिनी मराठे यांचा आध्‍यात्मिक प्रवास पूर्ण झाला असून प.पू. डॉ. आठवले लवकरच त्‍यांच्‍या संतपदाची घोषणा करतील.’

प.पू. डॉक्‍टरांनी माझ्‍याकडून पू. (कै.) सौ. शालिनी प्रकाश मराठे यांचा साधनाप्रवास लिहून घेतल्‍याबद्दल त्‍यांच्‍या चरणी कृतज्ञता व्‍यक्‍त करतो.’

(समाप्‍त)

– श्री. प्रकाश रा. मराठे (आध्‍यात्मिक पातळी ६८ टक्‍के, वय ७९ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१०.६.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक