सिंधुदुर्ग : आंबोली धबधबा परिसरात कायदा मोडणार्‍यांवर कारवाई होणार  !

(प्रतिकात्मक चित्र)

सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का.) – सावंतवाडी तालुक्यातील आंबोली येथे  पर्यटनासाठी येणार्‍या सर्व पर्यटकांनी धबधब्याच्या ठिकाणी, आंबोली घाट परिसरात आणि तेथील वन विभागाच्या सीमेत कचरा करू नये, तसेच वन आणि पर्यावरण यांना बाधा पोचवणारे कोणतेही कृत्य करू नये. शासकीय जंगलात अवैधपणे प्रवेश केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी चेतावणी सावंतवाडी वन विभागाचे उपवनसंरक्षक एस्. नवकिशोर रेड्डी यांनी दिली आहे.

येथे वन आणि पर्यावरण यांना बाधा येऊ नये, यासाठी येथे येणार्‍या पर्यटकांकडून ‘उपद्रव शुल्क’ वसूल करण्यात येणार आहे. हे शुल्क वसूल करतांना कोणत्याही व्यक्तीने अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्यावर ‘शासकीय कामकाजामध्ये अडथळा आणला’; म्हणून फौजदारी गुन्हा नोंद करण्यात येईल. कायदा आणि सुव्यवस्था याचा भंग झाल्यास पोलिसांचे साहाय्य घेतले जाईल, तसेच संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे रेड्डी यांनी सांगितले.