‘चंद्रयान-३’च्या प्रक्षेपणाची शेवटची सिद्धता : अंतराळ यानाला जोडले रॉकेट !

बेंगळुरू (कर्नाटक) – ‘चंद्रयान-२’च्या अपयशानंतर आता भारतीय अंतराळ  संशोधन संस्था म्हणजेच ‘इस्रो’ चंद्रयान-३ या अंतराळ यानाचे यशस्वी उड्डाण आणि चंद्रावर ‘सॉफ्ट लँडिंग’साठी (यानाला कोणतीही हानी न पोचवता उतरवण्यासाठी) युद्धस्तरावर प्रयत्न करीत आहे. गेल्या काही वर्षांच्या अथक परिश्रमांचे फळ काय मिळते, याची केवळ इस्रोच्या वैज्ञानिकांनाच नव्हे, तर सर्व भारतीय नागरिकांना उत्कंठा लागली आहे. ‘चंद्रयान-३’च्या प्रक्षेपणाची सिद्धता शेवटच्या टप्प्यात आहे.

श्रीहरिकोटा येथील ‘सतीश धवन स्पेस सेंटर’ येथून ‘चंद्रयान-३’चे प्रक्षेपण होणार असून ५ जुलै या दिवशी अंतराळात सोडणारे रॉकेट ‘एल्.व्ही.एम्. ३’ची त्याला जोडणी करण्यात आली.

या वेळी इस्रोच्या एका अधिकार्‍याने सांगितले की, १३ जुलै ते १९ जुलै या कालावधीत ‘चंद्रयान-३’चे प्रक्षेपण केले जाईल. ‘१३ जुलैलाच प्रक्षेपण करण्याचा आमचा प्रयत्न असेल’, असेही या अधिकार्‍याने सांगितले.