खलिस्तान्यांना तुमच्या देशाचा वापर करू दिल्यास संबंध बिघडतील ! – परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर

  • कॅनडासह अन्य देशांना चेतावणी !

  • खलिस्तानवाद्यांकडून कॅनडामध्ये भारतविरोधी भित्तीपत्रक प्रसारित

  • ८ जुलैला भारतीय दूतावासावर काढणार मोर्चा

नवी देहली – कॅनडामध्ये खलिस्तानवाद्यांनी भारतीय दूतावासातील अधिकार्‍यांना धमकी दिली आहे. या संदर्भातील एक भित्तीपत्रक सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे. यात येत्या ८ जुलैला मोर्चा काढण्याचेही म्हटले आहे.

यावरून भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी चेतावणी देतांना म्हटले आहे की, आम्ही कॅनडा, अमेरिका, ब्रिटन आणि ऑस्ट्रेलिया यांसारख्या देशांना खलिस्तान्यांना त्यांच्या देशाचा वापर न करण्याची विनंती केली आहे. जर त्यांनी असे केले, तर दोन्ही देशांच्या संबंधांवर त्याचा थेट परिणाम होईल. ‘भित्तीपत्रकाचे सूत्र कॅनडाच्या सरकारसमोर उपस्थित केले जाईल’, असेही त्यांनी सांगितले.

खलिस्तानी भित्तीपत्रक

भित्तीपत्रकामध्ये खलिस्तानी आतंकवादी हरदीपसिंह निज्जर याला ‘हुतात्मा’ ठरवण्यात आले आहे. तसेच भारताच्या २ राजनैतिक अधिकार्‍यांना ‘खुनी’ म्हटले आहे. निज्जर याला गेल्या मासामध्ये कॅनडामध्येच अज्ञातांनी ठार केले होते. तसेच या भित्तीपत्रकात कॅनडाची राजधानी ओटावा शहरातील भारताचे उच्चायुक्त संजयकुमार वर्मा आणि कॅनडाच्याच टोरँटोमधील भारताच्या महावाणिज्य दूतावासातील अधिकारी अपूर्वा श्रीवास्तव यांना धमकी देण्यात आली आहे. तसेच ८ जुलै या दिवशी ‘खलिस्तान फ्रीडम रॅली’ नावाने मोर्चा काढण्यात येणार आहे. हा भारतीय दूतावासावर काढण्यात येणार आहे.