११.५.२०२३ या दिवशी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा ब्रह्मोत्सव साजरा करण्यात आला. त्या वेळी फोंडा (गोवा) येथील कु. श्रिया राजंदेकर हिला आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
१. ब्रह्मोत्सव चालू होण्यापूर्वी आलेल्या अनुभूती आणि मनाची झालेली प्रक्रिया
‘आम्ही ब्रह्मोत्सवासाठी पटांगणावर आलो. तेव्हा आम्हाला सर्व संतांचे दर्शन झाले. आम्ही तिथे बसल्यावर ‘ब्रह्मोत्सव कधी चालू होणार ? आणि श्री गुरूंचे (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे) दर्शन मला कधी मिळणार ?’, असे वाटत होते. त्याचप्रमाणे पटांगणावर आल्यापासून मनाची आनंदावस्था पुष्कळ वाढत चालली होती. तो आनंद मनात मावतच नव्हता आणि ‘आता पुढे काय होईल ?’, अशी मनाला उत्सुकता होती. या संपूर्ण कालावधीत मनाची स्थिरता आणि निर्विचार स्थिती पुष्कळ वाढली.
२. ब्रह्मोत्सव चालू झाल्यावर आलेल्या अनुभूती आणि झालेली मनाची विचारप्रक्रिया
२ अ. भावजागृती होऊन कृतज्ञता व्यक्त होणे : ब्रह्मोत्सव चालू झाल्यानंतर, म्हणजे गुरुदेव उत्सवस्थळी आल्यावर पुष्कळ भावजागृती होत होती आणि मनातल्या मनात गुरुदेवांप्रती पुष्कळ कृतज्ञता व्यक्त होत होती. ‘गुरुदेव माझ्यासाठी आणि सर्व साधकांसाठी किती करत आहेत !’, असे विचार माझ्या मनात येत होते, तसेच श्रीगुरुचरणी सतत कृतज्ञता व्यक्त होत होती.
२ आ. गुरुदेवांचे उत्सवस्थळी आगमन झाल्यावर वातावरणातील गारवा वाढणे : गुरुदेव उत्सवस्थळी येण्यापूर्वी वातावरणामध्ये पुष्कळ उष्णता जाणवत होती. जसे गुरुदेवांचे पटांगणावर आगमन झाले, तसा वातावरणातील गारवा वाढू लागला.
२ इ. रथयात्रा चालू झाली, त्या वेळी वातावरणातील गारवाही पुष्कळ वाढला होता.
२ ई. श्री गुरूंचा रथ साधकांच्या जवळून जात होता. तेव्हा मला वाटले, ‘गुरुदेव प्रत्येक साधकाच्या हृदयामध्ये विराजमान होत आहेत.’
२ उ. अखंड भावजागृती होऊन मन निर्विचार होणे : ब्रह्मोत्सवाच्या संपूर्ण कालावधीत माझी अखंड भावजगृती होत होती आणि ब्रह्मोत्सव चालू असतांना माझे मन संपूर्ण निर्विचार स्थितीमध्ये गेले होते. मला माझे ध्यान लागल्यासारखे वाटत होते.
३. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्याकडे बघितल्यावर आलेल्या अनुभूती
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्याकडे बघितल्यानंतर भावजागृती होत होती, तसेच त्यांच्याकडे बघितल्यानंतर वेगळ्याच शक्तीचा झोत माझ्या दिशेने आल्यासारखे वाटत होते. त्यांच्याकडे बघत असतांना माझ्या आज्ञाचक्रावर संवेदना जाणवत होत्या. त्याचप्रमाणे मला शरिराभोवती गारवा जाणवत होता. त्यांच्या भोवती मला गुलाबी रंगाचे वलय दिसत होते. ‘त्या वलयामधून शक्तीच्या रंगाचे, म्हणजे लाल रंगाचे किरण प्रक्षेपित होत आहेत आणि त्या किरणांमधून सर्व साधकांना साधना करण्यासाठी शक्ती मिळत आहे’, असे मला जाणवत होते.
४. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्याकडे बघितल्यावर आलेल्या अनुभूती
मी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्याकडे बघत होते. तेव्हा मनात वेगळाच उत्साह जाणवत होता. त्यांच्याकडे पाहिल्यानंतर पारदर्शकपणा जाणवत होता, म्हणजे त्या तिथे असून नसल्यासारख्या वाटत होत्या. त्यांना पाहिल्यानंतर मनाची निर्विचार स्थिती अखंड अनुभवता येत होती. त्याचप्रमाणे त्यांच्याभोवती पांढर्या रंगाचे वलय दिसत होते. ‘त्या वलयातून पांढरा प्रकाश बाहेर पडत आहे’, असे मला जाणवत होते. ‘ते पांढर्या रंगाचे प्रकाशकिरण सर्व साधकांपर्यंत जात आहेत आणि सर्व साधकांना त्या किरणांमधून चैतन्य मिळत आहे’, असे मला जाणवत होते.
५. श्री गुरूंच्या रथाचे दर्शन घेतांना आलेल्या अनुभूती
सर्व साधकांना श्री गुरूंच्या रथाचे दर्शन घेण्यास सांगितले. रथाचे दर्शन घेतांना मला वाटत होते, ‘त्या रथामध्ये गुरुदेव सूक्ष्मरूपाने अखंड विराजमान आहेत. गुरुदेव त्या रथामध्ये बसल्याने त्याच्यातील चैतन्य पुष्कळ मोठ्या प्रमाणात वाढले आहे.’ त्याचप्रमाणे रथाचे दर्शन घेतांना मला ‘तो रथ श्री गुरूंचे चैतन्य देत आहे आणि साधना करण्यासाठी शक्ती देत आहे’, असे जाणवत होते. ‘रथाला नमस्कार करतांना मी श्री गुरूंना नमस्कार करत आहे’, असे मला जाणवत होते.
६. ब्रह्मोत्सव संपल्यानंतर झालेली मनाची स्थिती
ब्रह्मोत्सवानंतर ३ – ४ दिवस श्री गुरूंचे ते दिव्यरूप माझ्या डोळ्यांसमोर सतत येत होते आणि ते डोळ्यांसमोर आल्यानंतर माझी पुष्कळ भावजागृती होत होती. ब्रह्मोत्सवानंतर माझे मन निर्विचार स्थितीत असल्याचे मला जाणवत आहे. त्याचप्रमाणे ‘प्रत्येक क्षणी माझे मन स्थिर आहे’, असे मला जाणवत आहे.
७. या अनुभूती लिहितांना मला ब्रह्मोत्सव पुन्हा अनुभवल्यासारखे वाटत होते, तसेच वातावरणामध्ये गारवा जाणवत होता.
‘हे परम पूज्य गुरुदेव, आज आपल्या अनंत कृपेने आपला हा ब्रह्मोत्सव मला अनुभवण्याची संधी मिळाली. हे गुरुदेव, आपल्याच अनंत कृपेने मला हा लेख लिहिण्याची संधी मिळाली. हे गुरुदेव, या लेखाच्या माध्यमातून तुम्ही आम्हाला आपला हा ब्रह्मोत्सव पुन्हा अनुभवण्याची संधी दिली. याबद्दल आपल्या कोमल चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्प आहे. गुरुदेव, कोटीशः कृतज्ञता !’
– कु. श्रिया राजंदेकर (वय १२ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६६ टक्के), फर्मागुडी, फोंडा, गोवा. (१९.५.२०२३ )
|